मुंबई : अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने पहिला मराठी चित्रपट 'पिकासो'चा ट्रेलर सादर केला. या चित्रपटाचा विशेष वर्ल्ड प्रिमिअर १९ मार्च २०२१ रोज 'अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ'वर होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक, बालकलाकार समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकदाम यांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. यामध्ये अस्वस्थ वडील व मुलाच्या नात्याची उत्तम कथा सादर करतानाच कोकणातल्या लोकजीवनाची आणि तिथल्या सुप्रसिद्ध अशा दशावतार कलेची झलक दाखवते.
शिलादित्य बोराद्वारे निर्मित 'पिकासो'चे दिग्दर्शन व सह-लेखन पदार्पणीय अभिजीत मोहन वारंग, तसेच सह-लेखक तुषार परांजपे यांनी केले आहे. चित्रपटाच्या कथानकाबाबत बोलताना पदार्पण करणारे दिग्दर्शक व सह-लेखक अभिजीत वारंग म्हणाले की, ''मला बालपणापासूनच दशावतार या कलेचे आकर्षण आहे. मला दशावताराला अस्सल व मूळ स्वरूपात दाखवणारा पहिला चित्रपट 'पिकासो' सादर करताना आनंद होतो आहे. या चित्रपटात वास्तविकता आणण्याचा माझ्यासह प्रत्येक कलाकाराचा पयत्न होता. त्यासाठी आम्ही वास्तविक ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे."
पुढे ते म्हणाले की, "लोककथेनुसार लोककलेचा उगम तळकोकणाच्या वालावल शहरामधील लक्ष्मी-नारायण मंदिरामधून झाला आहे, तिथे आम्ही चित्रपटाचे शूटिंग केले. या चित्रपटासोबतच आम्ही कलाकाराच्या जीवनातील दैनंदिन आव्हानांना लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. सर्जनशीलतेची समर्पक, वेदनादायी, पण समाधानकारक प्रक्रिया म्हणजे स्वत:लाच प्रश्न विचारत समस्यांचा सामना करण्याच्या नवीन पद्धतींचा शोध घेणे.''