भारतीय संस्कृती व परंपरेत ब्रह्मवादिनी स्त्रियांचा वाटा महत्त्वाचा आहे. मध्यंतरीच्या हजारो वर्षांच्या काळात पौरोहित्य या क्षेत्रातही पुरूषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना हद्दपार केले. तथापि, अनेक विरोध सहन करून डोंबिवलीतील पहिल्या महिला पुरोहिता होण्याचा मान गौरी खुंटे यांनी मिळविला आहे.
गौरी यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नाशिक येथील ‘गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल’मध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण धुळे येथील ‘एसएसव्हीपीएस’ या महाविद्यालयात झाले. त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली. त्याचबरोबर लघुलेखनासह टंकलेखनाचे प्रशिक्षण घेतले आहे. लग्नापूर्वी त्या सरकारी नोकरी करीत होत्या. लग्नानंतर काही काळ त्या कोकणात राहत होत्या. १९८५ला त्या डोंबिवलीत राहण्यास आल्या. गौरी यांच्या आई अतिशय धार्मिक होत्या, पण कर्मठ नव्हत्या. सासरी पण तशीच परिस्थिती. त्यांचे सासरे दररोज सकाळी निरनिराळी स्तोत्रे म्हणत असत. ते स्वत:ही उत्कृष्ट पौरोहित्य करीत होते. शहरात पूजेसाठी ब्राह्मण मिळत नव्हते व एखादा ब्राह्मण मिळालाच तर त्यांच्या सोयीने पूजा करून घ्यावी लागत असे. त्यामुळे आपणच पौरोहित्य शिकून घ्यावे, असा विचार गौरी यांच्या मनात आला. त्यातूनच डोंबिवलीत महिलांच्या माध्यमातून १९९७ साली ‘मैत्रेयी पौरोहित्य मंडळा’ची स्थापना करण्यात आली. ‘विश्व हिंदू परिषदे’च्या अधिपत्याखाली आजतागायत हे वर्ग सुरू आहेत. सुरुवातीला ६० ते ७० महिला पुरुषांच्या उपस्थितीत वेदमूर्ती सुनीलशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा वर्ग सुरू झाला. गौरी त्यांच्या सहकारी मैत्रिणींच्या मदतीने गेल्या १७ वर्षांपासून आठवड्यातून तीन दिवस हा वर्ग विनामूल्य चालवित आहेत. या वर्गात सुरुवातीला पुराणोक्त पूजा, सर्व प्रकारची स्तोत्रे (उदा. अथर्वशीर्ष, श्रीसूक्त पुरूषसूक्त, सौरसूक्त, सप्तशती, रूद्र इ.) शिकविले जाते. या वर्गात महिला व पुरुषांसोबत युवा वर्गाचाही चांगलाच सहभाग आहे. पौरोहित्य वर्गाला कुठल्याही जातीचे बंधन नाही. ज्यांची इच्छा असेल तो प्रत्येकजण या वर्गात प्रवेश घेऊ शकतो. विधवा महिलाही या वर्गामध्ये प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या आहेत. महिला सगळ्या पूजांबरोबर वास्तुशांत, सहस्रचंद्रदर्शन, साखरपुडा, विवाह, उपनयन असे सगळे विधी यथासांग करतात. त्या केवळ विधी न करता त्यांचा अर्थही सांगतात. विज्ञानाच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व काय, हेही सांगण्याचा प्रयत्न करतात. यातून जी काही दक्षिणा मिळते ती सामाजिक संस्था, आश्रमशाळा यांना देणगीरूपाने दिली जाते. या महिलांनी २००४ साली प्रथम ‘गणेशयागाच्या’ संपूर्ण पौरोहित्याची जबाबदारी समर्थपणे पार पडली. २०११ पासून दरवर्षी एक याग वांगणीला दासनवमी उत्सवात परागबुवांच्या ‘रामदाससेवा आश्रमा’त करतात. हा याग ‘संपूर्ण सेवा’ म्हणून केला जातो.
१९९९मध्ये कारगील युद्धात जे जवान हुतात्मा झाले त्या जवानांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून ‘विश्व हिंदू परिषदे’ने ‘राष्ट्ररक्षा यज्ञा’चे आयोजन केले होते. या यज्ञाचे संपूर्ण पौरोहित्य महिलांनी केले. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला ५० वर्षे पूर्ण झाली. तेव्हा ठिकठिकाणी जलाभिषेकाचे कार्यक्रम आयोजित केले होते. डोंबिवलीतील ६० ते ७० कार्यक्रमांचे पौरोहित्य महिलांनी केले आहे. गौरी यांनी ‘विश्व हिंदू परिषदे’च्या माध्यमातून केला जाणारा ‘घरवापसी’ हा विधीदेखील आतापर्यंत अनेक वेळा केला आहे. पौरोहित्यासोबतच गेल्या १३ वर्षांपासून ‘गर्भसंस्कार विधी’ हा एक आगळावेगळा उपक्रमही चालू केलेला आहे. त्यात गर्भरक्षकसूक्त, मेधासूक्त, श्रीसूक्त, आशीर्वाद व शेवटी औक्षण चालू केले आहेत. यामध्ये कोणतेही कर्मकांड नाही. गौरी या मंत्र म्हणतात व त्यांच्या मैत्रीण शमिका कुलकर्णी त्यांचा अर्थ सांगतात. गणेशोत्सवात गुरूजींची अत्यंत आवश्यकता असते. ही गरज ओळखून गेल्या १२ वर्षांपासून ‘पार्थिव गणेशपूजन कार्यशाळा’ हा उपक्रम विनामूल्य राबविण्यात येतो. आपल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना आपणच करावी, हा यामागचा हेतू आहे. गौरी या सध्या ‘विश्व हिंदू परिषदे’च्या कल्याण जिल्हा उपाध्यक्षा आहेत. ‘स्वस्ति न्यास अनाथाश्रमा’च्या विश्वस्त व डोंबिवली शहराचे ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिर संस्थानच्याही विश्वस्त म्हणून त्या कार्यरत आहेत.
पौरोहित्य वर्गाकरिता प्रत्येकाकडून वर्षाला ५०० रुपये शुल्क आकारले जाते. यंदाच्या वर्षी या शुल्कातील काही अंशी रक्कम मराठी शाळा टिकवण्यासाठी ‘भारत विकास परिषदे’चा उपक्रम चालतो, त्या उपक्रमाला देणगी म्हणून देण्यात आला. यंदाच्या वर्षी २३ हजार रुपयांची देणगी देण्यात आली आहे. गौरी यांच्या जडणघडणीत त्यांच्या कुटुंबीयांसह अलका मुतालिक, डॉ. सुधीर कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी यांचा ही मोठा वाटा आहे. भारतात पुरातन काळात स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. ‘मनुस्मृती’त त्यांचा उल्लेख आढळतो. पुरुषांची मक्तेदारी असलेली सर्वच क्षेत्रे स्त्रियांनी पादाक्रांत केली. काही क्षेत्रांत पुरूषांचा विरोध सहन करून तर काही क्षेत्रात त्यांच्या सहकार्याने उत्तुंग भरारी घेत आहे. अनेक क्षेत्रांपैकी पौरोहित्य हेदेखील एक क्षेत्र आहे. प्राचीन वाङ्मयात अनेक स्त्रिया वेदशास्त्र संपन्न आहेत. मैत्रेयी, गार्गी, कात्यायनी यांनी वेदांचे पूर्णपणे अध्ययन केले होते. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या पौरोहित्य क्षेत्रामध्ये अनेकांचा स्त्रियांनी पौरोहित्य करण्यास आजही विरोध आहे. कारण, वैदिक मंत्र हे नाभीपासून म्हणायचे असतात. हे मंत्र म्हणताना शरीरात प्रचंड उष्णता निर्माण होते. त्याचा परिणाम स्त्रियांच्या गर्भाशयावर होतो म्हणून महिलांनी मंत्र म्हणू नये, असे काहींचे म्हणणे आहे. पण चाळीशीनंतरच्या महिलांनी या क्षेत्राकडे वळण्यास काहीच हरकत नाही, असे काही तज्ज्ञांचे मत असल्याचे गौरी यांनी सांगितले. गौरी या क्षेत्राकडे २४ वर्षांपूर्वी वळल्या होत्या. त्यावेळी समाजातील नतद्रष्ट लोकांनी सुरुवातीला खूप त्रास दिला होता. त्यांना धमक्यांचे अनेक फोनही आले. वर्ग बंद करण्याच्या धमक्याही दिल्या. तुम्ही कसे वर्ग चालू ठेवता ते आम्ही बघतो, असेही सांगितले जात होते. एकदा तर तीन ते चार वर्षांपूर्वी मुंबईच्या ‘एमटीएनएल’ कार्यालयात पूजा सांगण्याचा योग आला. या कार्यालयात ४०० महिला कर्मचारी होत्या. युनियनच्या सदस्यांनी महिला पुरोहिताला विरोध केला होता. पण या धमकीला न जुमानता त्यांनी पूजा व्यवस्थित पार पाडली. आपली संस्कृती टिकावी म्हणून तरी महिलांनी पौरोहित्य करावे, असे त्या सांगतात.
- जान्हवी मोर्ये