सर्व धर्मीयांनी एकत्र नांदावे, मात्र ख्रिश्चन वा मुस्लिमांनी बळजोरीने, प्रलोभनाने हिंदूंचे धर्मांतर करू नये, एवढीच भाजपची अपेक्षा आहे. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील राजकारणात ख्रिश्चन व मुस्लिमांकडून होणाऱ्या हिंदूंच्या बेकायदेशीर धर्मांतराविरोधात आवाज उठवण्याचे काम भाजपनेच सातत्याने केलेले आहे, हे मोदी-पोप भेटीवर टीका करणाऱ्या शिवसेनेने लक्षात ठेवावे.
"मोदींनी बायबलची प्रत मस्तकी लावली, अंधभक्तांनी आता काय करावे,” असा सवाल शिवसेनेने ‘सामना’तून विचारला. त्याला पार्श्वभूमी होती, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच ‘व्हॅटिकन सिटी’त घेतलेल्या पोप फ्रान्सिस यांच्या भेटीची. शिवसेनेला यातून पंतप्रधान मोदींवर टीका करतानाच, भाजप, रा. स्व. संघ आणि त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांच्या विशाल संघटनाला व त्यांच्या हिंदुत्वनिष्ठेला खिजवायचे होते. ‘तुम्ही हिंदुत्वाचा विचार मांडता, पण तुमच्याच विचारधारेचे पंतप्रधान ख्रिश्चन धर्मगुरूची भेट घेतात, मोदींनी हिंदुत्वाचा त्याग केल्यानेच असे झाले,’ हे शिवसेनेला यातून म्हणायचे आहे. कारण, नरेंद्र मोदींसह भाजप, रा. स्व. संघ आणि त्यांचे कार्यकर्ते हिंदुत्वनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात ख्रिश्चन धर्माविषयी द्वेष आणि द्वेषच भरलेला असल्याचा शिवसेनेचा समज झालेला आहे. पण, शिवसेनेसारख्या मुंबई, ठाणे वा उर्वरित महाराष्ट्रातील चार-दोन जिल्ह्यांत बागडणाऱ्या कूपमंडुक पक्षाची आंतरराष्ट्रीय राजकारण-मुत्सद्देगिरी, त्यातले अनेकानेक पदर, त्यातून देशाला होणारे फायदे-तोटे समजून घेण्याची पात्रता नाही. त्यामुळे त्या पक्षाने मोदी-पोप भेटीवरून ठणाणा करणे साहजिकच. पण, तसे करताना शिवसेनेला स्वतःचे गेल्या दोन वर्षांतले वर्तन आठवलेले नाही.
मराठीच्या मुद्द्यावरून जन्माला आलेल्या शिवसेनेने नंतरच्या काळात व्याप वाढवण्यासाठी व मतांसाठी हिंदुत्वाची शाल पांघरली. त्यातून शिवसेनेची हिंदुत्ववादी प्रतिमा तयार झाली, पण २०१९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेने हिंदुत्वाची शाल भिरकावून दिली आणि मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी हिरवा चोळणा ओढला. आजन्म मुस्लिमानुनय करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. दोन्ही काँग्रेसशी जवळीक केल्यापासून शिवसेनेलाही त्यांचा गुण लागला आणि तिने मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यात कसलीही कसर ठेवली नाही. शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धेचे आयोजन केले, तर शिवसेनेचे दक्षिण-मध्य मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन चिश्ती यांचे नाव देण्याची मागणी केली, तर शिवसेनेचे रत्नागिरीतील आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याजिल्ह्यात उर्दू भवन बांधण्याचे निर्देश दिले, तर अल्पसंख्याक अर्थात मुस्लीम उमेदवारांना पोलीस कॉन्स्टेबल पदासाठीच्या भरतीकरिता प्रशिक्षण, वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्याक अर्थात मुस्लीम विद्यार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपये रोख देण्याचे निर्णयही तथाकथित हिंदुत्ववादी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाखालीच झालेत.
म्हणजेच, आतापर्यंत हिंदूंच्या मतांवर पोसलेल्या, हिंदूंच्या मतावर बेरीज करून का होईना सत्तेत बसण्याइतकी आमदार संख्या मिळवणाऱ्या शिवसेनेला सत्ता मिळाल्यानंतर मात्र हिंदूंना वाऱ्यावर सोडून मुस्लिमांची दाढी कुरवाळताना जराही लाज-शरम वाटल्याचे दिसले नाही. त्या शिवसेनेने पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात कसे वागावे, काय करावे, काय करू नये, हे सांगण्याचा वा त्यावर टीका करण्याचा उपद्व्याप करू नये. तसेच आज मोदी-पोप भेटीवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या शिवसेनेने स्वतःला आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही सांभाळावे. कारण, छत्तीसगढमधील स्थानिक हिंदूंचे तांदूळ वा सोयाबीन वड्या देऊन ख्रिश्चन धर्मात घाऊक धर्मांतर करण्यात शिवसेनेच्या तिथल्या कोणाकोणाचे हात गुंतलेले आहेत, याची पोलखोल दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या यंदाच्या दिवाळी अंकातील लेखातून आम्ही केलीच आहे. असे शिवसेना कार्यकर्ते फक्त छत्तीसगढमध्येच आहेत असे नाही, ते इतरत्रही, महाराष्ट्रातही असू शकतात. म्हणूनच, ‘नाव ठेवी लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला’छाप शिवसेनेने स्वतःचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते नेमके काय करतात ते पाहावे, मोदी वा भाजपला अक्कल शिकवण्याचा उद्योग करु नये.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस भेटीवर टीका करणाऱ्या शिवसेनेसह इतरांनीही एक महत्त्वाची बाब कायमची लक्षात ठेवावी. ती म्हणजे भाजपची भूमिका इतर धर्माच्या विरोधात कधीच नव्हती, तर हिंदू संस्कृतीने दिलेल्या ‘वसुधैव कुटुम्बकम्’ मंत्राचे पालन करताना, सर्व धर्मीयांनी एकत्र नांदावे, मात्र ख्रिश्चन वा मुस्लिमांनी बळजोरीने, प्रलोभनाने हिंदूंचे धर्मांतर करू नये, एवढीच भाजपची अपेक्षा आहे. भारताच्या राष्ट्रीय व महाराष्ट्राच्या राज्य स्तरावरील राजकारणात ख्रिश्चन व मुस्लिमांकडून होणाऱ्या हिंदूंच्या बेकायदेशीर धर्मांतराविरोधात आवाज उठवण्याचे काम भाजपनेच सातत्याने केलेले आहे. आजही पूर्वोत्तर, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ वगैरे राज्यातील ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कारवायांविरोधात भाजपच उभा ठाकतो. ख्रिश्चनांनी आपल्या धर्माचे अनुसरण करावे, पण इतरांनी ख्रिश्चन धर्माचे अनुसरण करण्यासाठी मिशनऱ्यांकडून दबाव टाकला, आमिष दाखवले तर ते सहन केले जाणार नाही, त्याचा विरोधच केला जाईल, अशी ही भूमिका आहे. त्यामागे ख्रिश्चन असो वा मुस्लीम धर्मीयांच्या द्वेषाची भूमिका नाही.
पुढचा मुद्दा म्हणजे, भाजपने सत्ता मिळाल्यानंतर अवैध धर्मांतराला आळा घालण्यासाठी घटनेच्या चौकटीत राहून उपायही केलेले आहेत. विविध भाजपशासित राज्यांनी अवैध धर्मांतराविरोधात केलेले कठोर कायदे त्याचाच दाखला. म्हणजेच, सत्तास्थानी आल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडून दिला आणि आतापर्यंत ज्यांचा द्वेष केला त्या मुस्लिमांचा अनुनय सुरू केला, तसे भाजपने ख्रिश्चन वा मुस्लिमांच्या बाबतीत केलेले नाही. तसेच, मोदी-पोप भेटीचा साद्यंत तपशील सार्वजनिकरित्या प्रकाशित झालेला नाही, पण त्यांच्यात धर्मांतरासारख्या विषयावर चर्चा झाली असेल तर पंतप्रधानांनी आपले म्हणणे अतिशय रोखठोकपणे पोप फ्रान्सिस यांच्यासमोर नक्कीच मांडले असेल. कारण, इतर नामधारी धर्मनिरपेक्ष नेत्यांप्रमाणे आपली भूमिका पोपसमोर मांडताना संकोच करण्यासारखा मोदींचा स्वभाव नाही. पण, सध्या तशी संकोच करण्याची अवस्था शिवसेनेची नक्कीच झालेली आहे. म्हणूनच कोरोनाचे कारण देऊन हिंदूंच्या सण-उत्सवांवर निर्बंधांचा वरवंटा फिरवताना शिवसेनेचे मुख्यमंत्री कट्टरपंथी मुस्लिमांसमोर मात्र शरणागती पत्करतात, रझा अकादमीसारख्या कुख्यात संघटनेने दिलेल्या धमकीनंतर ईदच्या मिरवणुकांना परवानगी देतात. अशा धर्मांध मुस्लिमांसमोर झुकणाऱ्या, मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांसाठी आपल्या विचारांचीच सुंता करणाऱ्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृतीवर टीका करू नये, त्यापेक्षा हिंमत असेल तर दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्याने मिळवलेल्या सत्तेचा अन्य धर्माचा विरोध वा द्वेष न करता किमान हिंदूहितासाठी तरी वापर करावा.