
दासबोधातील विचारांचे अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावता येतील. काही ओव्यांचे पाठांतर करून, त्यांचा संभाषणात वापर करून पांडित्य प्रदर्शन करता येईल. पण, त्याने ज्ञानाहंकार वाढेल आणि ‘माझ्यासारख्या ज्ञानी व दासबोध अभ्यासक कोणी नाही,’ अशी गर्वोक्ती केली जाईल. तसे झाले तर पारमार्थिकदृष्ट्या ते योग्य वाटत नाही. त्याने नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. हे टाळायचे असेल, तर दासबोधातील नुसत्या शब्दज्ञानापेक्षा पारमार्थिक प्रगतीसाठी दासबोधात सांगितलेल्या बद्ध, मुमुक्षू, साधक या अवस्था समजून घेऊन त्या पायर्या चढत चढत सिद्ध या अवस्थेची अनुभूती घेता आली पाहिजे.
मध्यंतरीच्या कोरोना महामारीचा काळ सोडला, तर दासबोध मंडळे महराष्ट्रात अनेक ठिकाणी चालवण्यात येत असल्याची वृत्ते मधून मधून वाचायला ऐकायला मिळत. आता आपण पुन्हा पूर्वपदावर येत आहोत. सर्व सुरळीत होत आहे, तेव्हा ही दासबोध मंडळे ही आपापल्या पद्धतीने कार्य करू लागतील. परंतु, ही मंडळे दासबोध व इतर समर्थवाड्.मयाच्या अभ्यासाला कितपत चालना देतात, ते सांगता येत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, मागील लेखात सांगितल्याप्रमाणे, ही दासबोध मंडळे चालवणार्या मुख्यालयातून येणारे आदेश. या दासबोध मंडळांतील सभासदांना असे सांगितले जाते की, ‘मंडळातील सभासदांनी आम्ही सांगतो त्याव्यतिरिक्त इतर कोणाचे विचार वाचू नयेत, ऐकू नयेत, अन्यथा त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येईल.’ काही शंका असतील, तर त्या मुख्य कार्यालयाकडे पाठवाव्यात. योग्य वाटल्यास त्यांचे निरसन करण्यात येईल. दासबोध नव्हे, तर इतर कुठल्याही ग्रंथातून ज्ञान संपादन करायचे ठरवल्यास असा एकांगी विचार करता येत नाही. सर्व साधनांचा विचार करून ज्ञान प्राप्त करावे लागते. त्यासाठी अभ्यासाचे कष्ट करावे लागतात. आळस सोडावा लागतो, इतर करमणुकीच्या साधनांना मुरड घालावी लागते. समर्थांनाही हेच मान्य आहे.
समर्थ सांगतात-
धूर्तपणे सकळ जाणावे।
अंतरीं अंतर बाणावें।
समजल्यावीण सिणावें। कासयासी(दा.19.2.23)
समर्थवाड्.मयाचा अभ्यास करणार्यांच्या हे लक्षात येते की, समर्थ, ज्ञानसंपादनाचा एकांगी मार्ग सांगत नाहीत. समर्थांचा भर अनुभूतीवर, प्रचितीवर आहे. समर्थांच्या मते आपण सर्व ऐकावे. परंतु, त्यात जे सार आहे, म्हणजे शाश्वत आहे ते शोधावे आणि असार त्याचा त्याग करावा.
ऐसें हें अवघे ऐकावें।
परंतु सार शोधुनि घ्यावें।
असार तें जाणोनि त्यागावें। या नाव श्रवणभक्ति। (दा.4.1.29)
वरील ओवीत समर्थ स्पष्टपणे सांगतात की, ‘असारसुद्धा प्रथम जाणून घेऊन विवेकाने त्यातील असारत्व ओळखून बुद्धीला पटल्यावर त्याचा त्याग करावा. समर्थांची ही कार्यपद्धती पाहिल्यावर ‘आमच्याशिवाय इतर कोणाचे विचार ऐकू नका, वाचू नका’ असे दासबोध मंडळांनी लोकांना सांगणे कितपत योग्य आहे? खरं म्हटलं, तर ते समर्थविचारांच्या विरोधी आहे, असे म्हणावे लागते. या मंडळांनी लोकांना सार काय आणि असार काय, हे ओळखायला शिकवावे. समर्थांचा सर्व भर आत्मप्रचितीवर आहे, हे ध्यानात ठेवावे. समर्थांच्या मते, लोक सांगतात ते खूप ऐकावे. परंतु, स्वत: अनुभव घेऊन त्यांच्या सांगण्याची किंमत आपण ठरवावी. खरे काय खोटे काय, हे आपल्या अंतरंगात बुद्धीने ठरवावे.
समर्थ सांगतात-
उदंडाचें उदंड ऐकावे। परी तें प्रत्ययें पाहावे।
खरेंखोटें निवडावे। अंतर्यामी॥ (दा. 15.6.11)
समर्थांनी असे बुद्धिनिष्ठ शिष्य तयार केले. समर्थांचा हा आदर्श दासबोध मंडळांनी समोर ठेवावा. लोकांना गतानुगतिक, अंधानुयायी बनवणे ही दासबोध अभ्यास मंडळांची विचारसरणी नसावी. समर्थांना ते कदापि मान्य होणारे नाही. असो. काही दासबोध मंडळे लोकांना एकत्र जमवून दासबोध ग्रंथाचे पारायण करतात. तसेच, काही समर्थभक्त कोणत्याही मंडळात न जाता आपापसात ठरवून एकत्र येतात व दासबोध ग्रंथाचे पारायण करतात. त्यामुळे ‘ग्रंथ पारायण’ या विषयावर सविस्तर विचार मांडायला हरकत नसावी. दासबोध पारायणाच्या निमित्ताने एकत्र येणारे हे सज्जन, सद्शील समर्थांवर प्रेम करणारे भक्त निरपेक्ष मनाने एकत्र येतात. समर्थविचारांच्या सान्निध्यात वेळ घालवतात आणि सात्त्विक मैत्रीचा अनुभव घेतात. त्यांना काही काळ का होईना समर्थविचारांची, ज्ञानसान्निध्याची, त्यातील शिकवणींची अनुभूती मिळत असते. पारायणाच्या वेळी दासबोध ग्रंथातील परमार्थ संकेत, प्रपंच परमार्थाची सांगड कशी घालावी, त्यातील प्रपंचविज्ञान, स्वामींनी सांगितलेले व्यवहारज्ञान यांची ओळख होत जाते. तसेच मूर्खलक्षणे, पढतमूर्ख लक्षणे व त्यातून सांगितलेले मानवी वागणुकीचे, स्वभावाचे नमुने हे सर्व ऐकल्याने, वाचल्याने दासबोध ग्रंथाच्या अंतरंगात डोकावण्याची इच्छा निर्माण होते.
ग्रंथाच्या पारायणाने त्याचे अंतरंग जाणण्याची इच्छा उत्पन्न होणे, ही त्या ग्रंथाच्या अभ्यास प्रक्रियेची सुरुवात म्हणावी लागेल. तसं पाहिलं तर कुठल्याही अध्यात्म ग्रंथाचे पारायण करणे म्हणजे देवळाला बाहेरून प्रदक्षिणा करण्यासारखे आहे. त्याने मंदिराच्या आतील देवाचे दर्शन होत नाही. मंदिराच्या आत जाऊन प्रत्यक्ष देवाच्या मूर्तीचे दर्शन घेणे म्हणजे त्या ग्रंथाचा आत्मीयतेने अभ्यास करणे. म्हणजे तो ग्रंथ, त्यातील विचार, उद्दिष्टे समजून घेणे होय. देवळातील देवाच्या दर्शनाने काही काळ समाधान मिळते, पण ते चिरकाळ टिकणारे नसते. त्यासाठी विवेकाने आपले आचरण सुधारून भगवंताच्या काही गुणांशी एकरूपता साधता आली, तर अखंड समाधानाची स्थिती अनुभवता येते. त्याप्रमाणे दासबोध ग्रंथाच्या अभ्यासाने उदंड शब्दज्ञान प्राप्त करून घेता येईल. दासबोधातील विचारांचे अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावता येतील. काही ओव्यांचे पाठांंतर करून, त्यांचा संभाषणात वापर करून पांडित्य प्रदर्शन करता येईल. पण, त्याने ज्ञानाहंकार वाढेल आणि ’माझ्यासारख्या ज्ञानी व दासबोध अभ्यासक कोणी नाही,’ अशी गर्वोक्ती केली जाईल. तसे झाले तर पारमार्थिकदृष्ट्या ते योग्य वाटत नाही. त्याने नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. हे टाळायचे असेल, तर दासबोधातील नुसत्या शब्दज्ञानापेक्षा पारमार्थिक प्रगतीसाठी दासबोधात सांगितलेल्या बद्ध, मुमुक्षू, साधक या अवस्था समजून घेऊन त्या पायर्या चढत चढत सिद्ध या अवस्थेची अनुभूती घेता आली पाहिजे. भक्तीच्या बाबतीत बोलायचे झाले, तर दासबोधातील ‘नवविधाभक्ती’ समजून घेऊन त्यांचा व्यवहारात, प्रपंचात वापर करून लोक समुदायात भक्तिप्रेमरसाचा आस्वाद घेता आला पाहिजे.
समर्थ म्हणतात, त्याप्रमाणे ‘नवविधाभक्ती’ केल्याने माणसाला ‘सायुज्यमुक्ती’ अनुभवता येते. ही एकच मुक्ती अशी आहे की, तेथून पुन्हा पतन नाही.
ऐसी हे नवविधा भक्ती।
केल्यां पाविजे सायोज्यमुक्ती।
सामोज्यमुक्तीस कल्पांती।
चळण नाही॥ (दा. 4.9.26)
दासबोधातील प्रपंचविज्ञान अनुभवून व्यावहारिक शहाणपण शिकता येते. आत्मज्ञान नसलेल्या प्रापंचिक जनांची म्हणजे मूर्खांची लक्षणे आणि शहाणे असून मूर्खपणाने वागणारे पढतमूर्ख यांची लक्षणे टाळता आली नाही, तर त्यातून आपल्या ठिकाणी चातुर्य प्रगट होते, असा स्वामींचा अभिप्राय आहे. दासबोधातील प्रपंच विज्ञानाच्या, व्यवहारज्ञानाच्या अभ्यासाने वैयक्तिक, सामाजिक चारित्र्य, नैतिकता, चातुर्य, प्रामाणिकपणा इत्यादी गुणांचा लाभ होऊन समाजाला रामराज्याच्या दिशेने नेता येईल. दासबोध ग्रंथाच्या पारायणाची ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन पारायणाला बसायला हरकत नाही. केवळ शाब्दिक उच्चार करून आपण चालती बोलती यंत्रे बनू नये, एवढीच अपेक्षा. दासबोध ग्रंथ पारायणासंबंधी विशेष माहिती पुढील लेखात पाहू. (क्रमश:)
सुरेश जाखडी
7738778322
svjakhadi@gmail.com