स्वतंत्र महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच पिढ्या बाबासाहेबांचं शिवचरित्र ऐकत लहानाच्या मोठ्या झाल्या. काल बाबा गेल्यानंतर सोशल मिडीयावर माझ्या बहुतांश तरुण अभ्यासक, इतिहासप्रेमी मित्रांनी बाबासाहेबांबद्दल भरभरून लिहिलेलं दिसलं, हे लिहिणारे सगळे आजच्या पिढीतले, एक गोष्ट जाणवली, बाबासाहेब गेले ते आम्हा तरुणांच्या हाती शिवचरित्र देऊन ! तरुण मुलामुलींनी ज्या भक्तिभावाने त्यांच्याबद्दल लिहील त्यातून जाणवलं की ह्या १००वर्षांच्या शिवशाहीराचे शब्द आजच्या तरुणांच्याही मनातही घर करून बसले आहेत. मलाही त्यांना भेटायचं अफाट आकर्षण ! काही महिन्यांपूर्वी तो योग जुळून आला, मनातली कुतूहलं मोकळेपणाने त्यांना विचारली, ही त्यांची शेवटची मुलाखत, ऑडीओ स्वरूपात कैद झालेली ! बाबा गेले, त्यांचे अखेरचे शब्द तुमच्यासाठी केलेत शब्दबद्ध !
“शिवचरित्रातला कुठलाही प्रसंग सांगा, तारखा मी सांगतो, त्या तारखा लिहून घ्या, एकही चुकणार नाही, मी पैज लावायला तयार आहे.” आपल्या वयाची ९९ वर्ष पूर्ण करून शंभरीत प्रवेश केलेला एक वृद्ध माणूस तरण्याबांड पोराला लाजवेल अशा आवेशात माझ्याशी बोलत होता. १०० व्या वर्षी अपार आत्मविश्वास, कमालीची स्मरणशक्ती यांच्या जोडीला, शिवप्रेमाचा सागर जोरजोराने उसळत होता, समोर खुद्द शिवशाहीर ‘बाबासाहेब पुरंदरे’ बेभान होऊन बोलत होते !
साधारण सप्टेंबरचा पहिला आठवडा असेल, सावरकरांवर एक माहितीपट करण्याच्या धावपळीत होतो. बाबासाहेब पुरंदरे यांना सावरकरांवर बोलतं करायचं होतं. अमृतराव पुरंदरेंशी फोनवर सतत बोलणं व्हायचं, एक दिवस अमृतराव म्हणाले, सकाळी ११ वाजेच्या सुमारास या. कोथरूडच्या त्यांच्या घरी पोहोंचलो, आतल्या खोलीत बाबा खुर्चीत बसले होते, त्यांना नमस्कार केला, खाली जमिनीवर मांडी घालून बसू लागलो, सखाराम भाऊ म्हणाले, वर बसा, मी नको म्हणालो, तेवढ्यात, बाबांनी हात धरला, म्हणाले, “खुर्चीवर बसा, नाहीतर मीही खाली बसतो.”आता मात्र पर्याय नव्हता, गप्पा सुरु झाल्या...
म्हटलं बाबासाहेब....स्वा.सावरकरांवर माहितीपट करतोय, बाबा म्हणाले, "वा ! उत्तम कल्पना ! पण फार वैचारिक दाखवू नका, प्रतिसाद कमी मिळेल, मनाची तयारी करून ठेवा. त्यापेक्षा त्यांनी बोटीतून उडी कशी मारली, त्यासाठी किती कष्ट सोसले, अंदमानमध्ये काय भोगलं हा भाग दाखवा. माझा शिवचरित्राचा अनुभव असाय, मी पहिल्यांदा परंपारिक पद्धतीने शिवचरित्र लिहायला घेतलं, नऊ लेख ‘एकता’ मासिकात प्रसिद्ध झाले, मी दरवेळी विचारायचो, कुणाची काही प्रतिक्रिया ? कुणाचं काही पत्र ?? एकदा संपादक रागावून म्हणाले, अरे कोण वाचतंय, तू लिहितोस म्हणून छापतो आम्ही, मी तरी कुठे वाचतो तुझे लेख ! हे मी ऐकलं आणि खडबडून जागा झालो, स्वतःला म्हणालो, "यांच्याकरिता शिवचरित्र नाही, ज्यांच्याकरता ते आहे त्यांच्यापर्यन्त पोहोचवलं पाहिजे.”
बाबासाहेब नकळत त्यांच्या शिवचरित्र निर्मितीची कहाणी सांगू लागले. म्हणाले, “सोपं लिहिणं महाकठीण होतं, कारण त्यासाठी आतापर्यंत चालत आलेली वाट सोडावी लागणार होती. मग मी सहा महिने विचार केला, करू की नको, आतापर्यंत चालत आलेली वाट सोडली असती तर मला ठपका आला असता. आताही आलाय माझ्यावर तो ठपका ! पण मी त्याची पर्वा करत नाही फारशी. मी इतरांच्याच वाटेने गेलो असतो तर मी सुद्धा ‘विद्वान’, ‘पंडित’, ‘इतिहासकार’ असा कुणीतरी ओळखलो गेलो असतो. पण लोकांनी वाचलं असतं का मी लिहितो ते ?? अस्वस्थ होतो मी”
क्षणभर बाबा थांबले, म्हणाले, ‘पार्थ, शिवभारत नावाचा एक ग्रंथ छापला गेला तो इसवी सन १९२९ च्या सुमारास. शिवभारत हे संस्कृत मध्ये लिहिलं परमानंद गोविंद नेवासकर यांनी. महाराजांच्या काळात तो स्वतः होता. १९२९ च्या सुमारास त्याची पहिली आवृत्ती बाजारात आली. दुसरी आवृत्ती केंव्हा निघाली माहितीये ? दुसरी निघाली १९६५ साली ! "अरे हा महाराजांच्या वेळचा मनुष्य" असं विकत घेतांना लोक म्हणत, “अरे पण वाचलत का ?” वाचलं मात्र कुणीच नाही.”
बाबा पुढे सांगू लागले, म्हणाले, “.....मग मी विचार केला, आपण सोपं लिहिण्याचा विचार करतोय खरा, पण याआधी आपल्या मार्गाने कुणी गेलाय का ?? तर मला दिसला ज्ञानेश्वर. तो आपल्या मार्गाने गेला ? उलट त्याच्या मार्गाने मी जातोय. ज्ञानेश्वरी म्हणजे गीता. ती त्याने सोपी, म्हणजे मराठी भाषेत सांगितली. विद्वानांनी फार फार टीका केली, वामन पंडित तर म्हणाले, “कुणी एक येरु तो मी म्हणे ज्ञानेश्वरु.” इतकी टिंगल झाली, पण ज्ञानेश्वरी टिकून आहे, मूळ गीता कुणी वाचत नाही, पण ज्ञानेश्वरीची पारायणं होतात आपल्याकडे. म्हणून सोपं लिहा, मनापासून सांगा.
मध्यंतरी माझ्याकडे एकजण आला, ‘म्हणे, तीस हजार रुपये द्या बाबासाहेब ! दासबोधाचं संस्कृत मध्ये भाषांतर करायचंय, त्यासाठी द्या’ .मी म्हणालो, ‘देता येतील, पण ते तुम्ही करू नका’ ते म्हणाले का ? मी सांगितलं त्यांना, ‘एकही प्रत वाचली जाणार नाही.’ झालंही तसचं, तीस हजार रुपये गेले, पण वाचलं कुणीच नाही, आम्ही मराठीत वाचा म्हणून लोकांच्या मागे लागतो ते वाचत नाहीत, आणि संस्कृत कोण वाचणार ?? मी सोपं लिहिलं म्हणून लोकांनी ते वाचलं.
एक आठ दहा दिवसांपूर्वी माझ्याकडे एक गृहस्थ आले होते, ते आले आणि त्यांनी पायावर डोकं ठेवून मला नमस्कार केला, अहो म्हंटल हे काय करताय ? ते म्हणाले, बाबासाहेब डोकं टेकवूनच नमस्कार करायला पाहिजे. तुम्ही मनामनात घराघरात शिवचरित्र पोचवलं, तुमच्यामुळे शिवाजी महाराज समजले आम्हाला !” त्यामुळे तुम्ही सावरकरांचा माहितीपट सोपा करा, सावरकरांची गोष्ट सांगा लोकांना !
आता बाबासाहेब खुलले होते, अधूनमधून त्यांनीही सावरकर सोडून इतर काय लिहिता वगैरे विचारलं, हिमालयाएवढं कर्तृत्व समोर साक्षात असतांना त्यांना आपल्याबद्दल काय सांगणार ! टिळकांवर लिहितो बोलतो असं म्हणालो, बाबासाहेब उसळले, म्हणाले, “हे जरूर आहे, टिळकांबद्दल पुन्हा पुन्हा सांगणं फार आवश्यक ! त्यातल्या ज्या घटना आहेत त्या ठळकपणे सांगा जगाला, अगदी रंजकपणे सांगा” कारण, 'तुका म्हणे तेथे पाहिजे अनुभव, शब्दांचे वैभव कामा नये' जे घडलं ते सांगा, अभिमानाने सांगा.” बाबा पुन्हा गंभीर झाले, शांत स्वरात सांगू लागले, “टिळक मागे पडले, ते तात्यासाहेब केळकरांच्यामुळे असं माझ मत आहे. केळकर टिळकांचे वैरी होते का ? अजिबात नाही. पण त्यांनी सगळं अवघड करून ठेवलं हो टिळकांबद्दल ! त्यांनी टिळकांवर चरित्र जे लिहिलं ते कुणी वाचलं का ? भक्तिभावाने घेतलं, पण वाचलं नाही. मी म्हणालो, “बाबासाहेब, टिळकांच्या आठवणींचा संग्रह महत्वाचा आहे ना फार, बापटांनी संपादित केलेला.” ते ऐकून बाबसाहेब खुर्चीतून उठण्याचा प्रयत्न करू लागले, त्यांचे सहाय्यक सखारामभाऊ पुढे झाले, बाबासाहेबानी त्यांना खुणावलं, म्हणाले, “ते समोर दिसतात ना , ते टिळकांच्या आठवणींचे खंड. ते वाचले पाहिजेत प्रत्येकाने ! मी ते जपून ठेवलेत.”
बाबा आता तात्यांबद्दल म्हणजे सावरकरांबद्दल सांगू लागले, १९३७ साली स्थानबद्धतेमधून मुक्तता झाल्यावर तात्या पुण्याला आले, मग अडतीस ते पुढे १९५० पर्यंत बाबासाहेब अनेकदा सावरकरांना भेटले. कुतूहलापोटी मी म्हणालो, “बाबासाहेब थेट जाता यायचं सावरकरांच्या भेटीला ?” “छे ! इतकं सोपं नव्हतं ते, सावरकरांचा सहवास महागातला होता. आग होते ते आग !” बाबा पुढे सांगू लागले, “युद्ध सुरू झालेलं होतं १९३८ सालचं , आम्ही अगदी तरुण होतो. पुण्याला आले की त्यांची व्यवस्था टिळकांकडे असायची. हे आणून दे, ते पुसून ठेव, याला हाक मार, त्याला हाकलून दे अशी कामं करायचो तात्यांच्या आसपास. तेंव्हा, त्यांचं बोलणं, वागणं, उठणं बसणं, हे फार फार तेजस्वी असायचं. एक प्रसंग अगदी लख्ख आठवतोय. म .तू. कुलकर्णी, गांगुर्डे, आणि अशी सात आठ माणसं आणि तात्या बोलत बसले होते ,मी ऐकत होतो. कुलकर्णी जवळ आले म्हणाले, तात्या, आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहोत, ते म्हणाले काय ? प्रश्न ,असा होता तुम्ही मारसेलिसला ८ जुलै १९१० या दिवशी उडी मारली ती तुम्ही चूक केली. तुम्ही निसटून जाण्याचा प्रयत्न नसता केला तर शिक्षा नसती झाली, आणि हे दुर्दैव वाट्याला आलं नसत. क्षणभर शांतता पसरली, तात्या म्हणाले, अरे, ‘वेडा आहेस वेडा ! अरे , मी जर यशस्वी झालो असतो तर जे आज सुभाषबाबू करताहेत ते मी पहिल्या महायुद्धाच्या वेळेला केलं असतं" बाबासाहेब सावरकरांची नक्कल किती हुबेहूब करतात हे जाणकारांना ठाऊक असेल, “मी जर यशस्वी झालो असतो तर जे आज सुभाषबाबू करताहेत ते मी पहिल्या महायुद्धाच्या वेळेला केलं असतं" हे वाक्य बाबासाहेब पुरंदरे नाही, तात्याराव सावरकरच बोलताहेत असा भास झाला मला क्षणभर ! अगदी तेच हातवारे, तसाच हुबेहब आवाज, तापकीर ओढण्याची लकबही अगदी हुबेहुब !
बाबांनी नुसतं शिवचरित्र लिहिलं नाही तर ते मोठ्या खुबीने व्यासपीठावरून रंजकतेने सांगितलं, तरुण वयात हे समर्पणाचं बीज त्यांच्या मनात पेरलं कुणी ? बाबा म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मला बदललं, माझ्या विचारांना दिशा दिली. लहान वयात न शोभणारं गंभीरपण माझ्याकडे आलं ते संघाच्या संस्कारामुळे !” या संस्कारात बाबा घडले, पुढे ते इतके वाढले की बाबांचं वक्तृत्व ऐकत ऐकत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या, त्यांच्या वक्तृत्वाबद्दल कुतूहलाने विचारलं, बाबांनी त्याचं श्रेय दिलं त्यांच्या वडिलांना आणि माजगावकर मास्तरांना ! म्हणाले, “दत्तोपंत सखाराम माजगावकर हे आमचे मास्तर, ते वर्गात जे शिकवायचे त्याचा प्रभाव माझ्यावर पडला, आता मी जे बोलतो ते मी नाही बोलत, ते माजगावकर बोलत असतात.”
अर्धापाउण तास बाबा बोलत होते, बाहेर कुणीतरी आलंय हे सांगायला साखरामभाऊ आत आले, मी त्यांना म्हणालो, “बाबासाहेब या सगळ्या आठवणी तुम्ही त्या माहितीपटासाठी सांगाव्या अशी इच्छा आहे, सांगाल ना ?” "सांगेन ना, नक्की सांगेन, आनंदाने सांगेन” असं म्हणून त्यांनी मला आणखी जवळ बोलावलं, हातात पेढा दिला, म्हणाले, “पार्थ, तुम्ही सोन्याचा रस पाहिलाय का कधी ? सराफाकडे असतो बघा, पातळ असतो, तसे दिसायचे सावरकर, वितळवलेल्या सोन्यासारखे !”
बाबांचे शब्द ऐकून मी कानामनाने तृप्त झालो होतो. पुढे काय बोलावं सुचत नव्हतं, त्यांच्या पायावर डोकं टेकवलं, “मी फक्त वयाने मोठा आहे, १०० वर्षांचा, बाकी काही नाही ! तुम्ही खूप मोलाचं काम करत आहात, या, पुन्हा, पुन्हा या !” असं म्हणून बाबांनी पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवला.
नंतर काहीच दिवसात, मुंबईत त्यांच्यावर एक माहितीपट दूरदर्शन करणार आहे हे समजलं, त्यासाठी बाबांची मुलाखत घेण्याची संधी माझ्याकडे आली, मग पुन्हा एकदा त्या निमित्ताने अगदी मागच्या महिन्यात बाबांना भेटायला गेलो तेंव्हा मात्र ते अंथरुणावर होते, “मला फक्त १५ दिवस द्या....ठणठणीत बरा होतो मुलाखतीसाठी” असं म्हणाले होते बाबा ! बाबांचे जुने फोटो, काही चित्रफिती शोधण्याच्या कामाला अमृतराव लागले होते, आमची कॅमेरा टीम तयार झाली होती, तारीख ठरायचा अवकाश होता, त्यासाठी मी आणि अमृतराव दोनचार दिवसातून एकदातरी बोलायचो, दिवाळीच्या आधी त्यांना फोन केला तेंव्हा अमृतराव म्हणाले सुद्धा..“एवढी दिवाळी होऊद्या...लगेच शुटींग करू” आणि काल हे असं झालं...! सगळच संपलं ! अमृतराव, तुम्हाला सांत्वनाचा फोन इतक्या लवकर करावा लागेल असं वाटलं नव्हतं हो.....
-पार्थ बावस्कर