हाराकिरी सहन होईना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2021
Total Views |

Rohit Sharma_1  
 
 
 
 
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघादरम्यान सध्या सुरु असलेल्या ‘बॉर्डर-गावस्कर’ कसोटी क्रिकेट करंडक मालिकेच्या तिसऱ्या सामन्याला गुरुवार, दि. ७ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेत सध्या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला असून मालिकेत आघाडी मिळविण्याच्या दृष्टीने भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत. मात्र, तिसरी कसोटी सुरु होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटल्याने क्रिकेट विश्वातील वातावरण चांगलेच तप्त झाले आहे. नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीदरम्यान कोविड सुरक्षेच्या नियमांचे योग्यरीत्या पालन न केल्याच्या कारणात्सव ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने भारतीय संघातील पाच महत्त्वाच्या खेळाडूंना विलगीकरण कक्षात राहण्याचे आदेश दिले आहेत. नववर्षानिमित्त भारतीय खेळाडूंकडून जल्लोष करण्यात येत असताना काही ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी याची चित्रफीत समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ केली आणि यावरून वादाला सुरुवात झाली. या पार्टीदरम्यान ‘कोविड’ सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आलेले नसल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी केला आणि मग या दौऱ्याचे आयोजन करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने पाच भारतीय खेळाडूंना विलगीकरण कक्षात राहण्याचे आदेश दिले. विलगीकरण कक्षात सात दिवस राहणे बंधनकारक आहे. मात्र, तिसऱ्या सामन्याआधी या पाच महत्त्वाच्या खेळाडूंचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण होत नसल्याने त्यांच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे खेळाडू तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू न शकल्यास भारताला फार महागात पडू शकते. हे ओळखूनच ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी हा डाव आखल्याचे बोलले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने हे आदेश दिले. मात्र, या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्याची तसदी काही बोर्डाने घेतली नाही. थेट कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न समीक्षकांनी केला असून ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून अद्याप याचे उत्तर आलेले नाही. त्यामुळे केवळ हाराकिरीच्या द्वेषापोटीच हे तर केलेले नाही ना, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
 
 
‘चीटिंग’ तुमच्या रक्तातच!
 
 
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाच्या या आदेशाविरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे तक्रार नोंदवली आहे. प्रसारमाध्यमांच्या आडून ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड अशा प्रकारचे राजकारण खेळाच्या मैदानात करत असल्याचेही आरोप काही माजी क्रिकेटपटूंनी केले आहेत. क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाच्या या वागण्यामुळे गदारोळ वाढताच त्यांच्या आधीच्या गैरव्यवहारांची चर्चाही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हे मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंविरोधात नेहमी आक्रमक होताना दिसतात. आक्रमक भूमिका घेऊन प्रतिस्पर्धी खेळाडूला मैदानात डिवचणे, त्याला निराश करणे आणि मग त्याच्या खेळावर परिणाम करणे, हे ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे कारनामे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. केवळ भारतीयांनाच हे अनुभव आलेले नाहीत, तर प्रत्येक ऑस्ट्रेलिया संघाइतक्या तुल्यबळ असणाऱ्या प्रत्येक संघातील खेळाडूंना हे अनुभव अनेकदा आले आहेत. एखादा खेळाडू बादच होत नसेल तर उसळत्या चेंडूंचा मारा करून त्याला जखमी केल्याचाही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा वाईट इतिहास आहे. इतकेच नव्हे तर गेल्या दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर या दोघांनाही दक्षिण आफ्रिकेच्या एका छायाचित्रकाराने चेंडूशी छेडछाड करताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर या दोघांवरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्षभरासाठी बंदी घातली होती. या प्रकारानंंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचा खरा चेहरा समोर आल्याचे सांगत सर्वांनी यावर कडाडून टीका केली होती. इतके होऊनही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा आक्रमकपणा काही केल्या कमी झाला नसल्याचे दुसऱ्याच सामन्यात दिसून आले होते. क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची अशी अनेक प्रकरणे सर्वांच्या आठवणीत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ यावेळी काही तरी नवीन क्लृप्ती काढणार, यात काही शंकाच नव्हती, असा अंदाज क्रिकेट समीक्षकांना होताच. नेमके अपेक्षेप्रमाणे घडलेही तसेच. आता मैदानात काही कुरापत्या करता येत नसल्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंना विलगीकरण कक्षात पाठवत त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. खेळाडूंची कोणतीही तपासणी न करता थेट असा निर्णय घेणे म्हणजे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या मनाचे खच्चीकरण करण्यासारखे असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने याची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे मत क्रिकेट समीक्षकांनी व्यक्त केले आहे.
 
 
- रामचंद्र नाईक
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@