अलिबाबा आणि ‘चिनी’ चोर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2021   
Total Views |

Jack Ma_1  H x
 
 
 
 
'अलिबाबा आणि चाळीस चोर’ ही जगप्रसिद्ध गोष्ट लहानपणी प्रत्येकानेच ऐकलेली आहे. दूरदर्शनवर रामानंद सागर यांनी त्या गोष्टीचे केलेले नाट्यरुपांतरही अनेकांनी बघितले असेलच. अगदी पापभिरू आणि अल्लाचा नेक बंदा असलेल्या अलिबाबाला ४० दरोडेखोरांनी चोरीचा माल लपवून ठेवलेली गुहा सापडते. पण, नेक बंदा असलेला अलिबाबा त्या खजिन्यातून त्याला हवा तेवढाच खजिना घेतो आणि सुखाने आपला संसार करतो. पण, अलिबाबाचा मोठा भाऊ फारच लोभी असतो. अलिबाबाकडून खजिन्याचा पत्ता तो काढून घेतो आणि लोभीपणाने सर्वच खजिना हडप करतो.
 
 
 
अशा अगदी सुरस अरबी कथेची पुनरावृत्ती आता चीनमध्ये घडली आहे. म्हणजे जॅक मा या हरहुन्नरी व्यक्तीने अगदी शून्यातून ‘अलिबाबा डॉट कॉम’ ही ऑनलाईन वस्तू खरेदी-विक्रीची एक व्यवस्था निर्माण केली. संपूर्ण जगभरात ई-कॉमर्स क्षेत्रासाठी जॅक मा आणि अलिबाबा यांचे नाव समानार्थी शब्द म्हणून वापरण्यात येऊ लागले. पुढे मग अलिबाबा आणि जॅक मा यांनी अनेक क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आणि जागतिक दर्जाच्या सेवा-सुविधा पुरविण्यास प्रारंभ केला. त्यातून जॅक मा यांचीही ख्याती जगभरात पसरली. अनेक देशांनी जॅक मा यांच्या अनुभवाचा लाभ करून घेण्यास प्रारंभ केला. नवउद्योजकांना, तरुणांना तर जॅक मा एक आदर्श वाटायला लागले. मग त्यानंतर जॅक मा यांनीदेखील जगभरातील नवउद्योजकांसाठी अनेक योजना आखल्या, त्यांना हरतऱ्हेने मदत करण्यास प्रारंभ केला. तोपर्यंत मग जगातील अब्जाधीशांमध्ये जॅक मा यांचा समावेश झालाच होता. त्याचा लाभ जसा अलिबाबा समूह, जॅक मा यांना झाला, तसाच चीनलाही झाला. विशेष म्हणजे, एरवी ‘कम्युनिझम’चा ढोल पिटणाऱ्या, भांडवलदारांना शत्रू ठरविणाऱ्या ‘कम्युनिस्ट’ चीनला भांडवलशहा जॅक मा आपलेसे वाटायला लागले होते. हा आपलेपणा एवढा वाढला होता की, चीनदेखील अमेरिका आणि युरोपच्या व्यापार आणि ई-कॉमर्स वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी अलिबाबा आणि जॅक मा यांचाचा वापर करत होता. एकूणच सर्व काही व्यवस्थित सुरू होते. पण...
 
 
 
हे सर्व होत असताना जॅक मा यांनी एक मोठी चूक केली. ती म्हणजे कम्युनिस्टांविरोधात बोलण्याची. त्यातही त्यांना आव्हान दिले ते थेट कम्युनिस्ट हुकूमशहा शी जिनपिंग यांना. म्हणजे ऑक्टोबर महिन्यात जॅक मा यांनी एका ठिकाणी भाषण दिले. त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. मात्र, त्यात त्यांनी कम्युनिस्ट चीनच्या बँकिंग व्यवस्थेवर जोरदार टीका केली. “नवा व्यवसाय सुरु करणार्‍यांसाठी सध्याची बँकिंग व्यवस्था अगदीच कुचकामी आहे. नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांना माघार घ्यायला लावणे, हेच त्या व्यवस्थेचे उद्दिष्ट झाले आहे. जी व्यक्ती काहीतरी तारण ठेवण्यास तयार आहे, अशाच व्यक्तीला चिनी बँकांकडून कर्ज मिळते. त्यामुळे चिनी बँका आता व्याजखोरीची सवय लागलेल्या शेठजींसारख्या झाल्या आहेत,” असे जॅक मा यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले. अर्थात, ही टीका जरी बँकिंग व्यवस्थेवर असली तरी ती कम्युनिस्ट राजवटीवर होती, हे उघड आहे. मात्र, त्यामुळे कम्युनिस्टांचा चांगलाच तीळपापड झाला.
 
 
 
मग एकेकाळी कम्युनिस्ट पक्षाचे ‘आवडते’ भांडवलदार असलेले जॅक मा अचानक ‘नावडते’ भांडवलदार झाले. जॅक मा आणि अलिबाबा समूहाने अवैधरित्या संपत्ती जमवून त्याचे केंद्रीकरण केले आहे. त्यामुळे समाजात आर्थिक विषमता अधिकच वाढत आहे, असे कारण सांगून कम्युनिस्ट राजवटीने अलिबाबा समूहाच्या मुसक्या आवळल्या. मात्र, कम्युनिस्ट असल्याने केवळ तसे करून त्यांचे समाधान झाले आहे. मुळातच खुनशी विचारसरणीच्या कम्युनिस्ट सरकारने जॅक मा यांनाच गायब केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा काहीही पत्ता नाही. ते जीवंत आहे की त्यांना ठार मारले, याचीही काहीच कल्पना नाही. अर्थात, आपल्याविरोधात बोलणाऱ्याचा आवाज कायमचा बंद करणे म्हणजेच त्याला ठार मारणे, ही जगभरातील कम्युनिस्टांची सवय आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कदाचित कम्युनिस्ट चीनने तीच पुनरावृत्ती केल्याचे दिसते. आता आगामी काळात याविषयी जे काही सत्य आहे, ते बाहेर येईलच. कारण, एवढ्या मोठी कंपनीचा हा मालक असा एकाएकी गायब होणे ही नक्कीच साधीसुधी गोष्ट नाहीच. पण, या मुस्कटदाबीमुळे मात्र पुन्हा एकदा चीनचे जागतिक पातळीवर पितळ उघडे पडले आहे, हे मात्र नक्की!
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@