८० वर्षांच्या तरुण गोसेवकाची जिद्द!

    30-Jan-2021
Total Views | 151

Kuber Popati_1  
 
 
 
गोविज्ञान सेवाभावी संस्था संचलित जनकल्याण गोशाळेचा उद्घाटन समारंभ बुधवारी (दि. ३ फेब्रुवारी) होत आहे. सुरगाणा तालुक्यातील भिंतीघर-गुलाबी गाव येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी येणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदाचार्य अजित रावळ उपस्थित राहणार आहेत. येथे अवघ्या पाच महिन्यांत गोशाळेची उभारणी झाली. गोसेवेचे व्रत अंगीकारलेले ८० वर्षांचे सेवाव्रती कुबेर पोपटी यांच्याशी यानिमित्ताने झालेला हा संवाद...
 
एक कार्य उभे राहून स्वयंपूर्ण झाल्यावर तेथे थांबू नये ही प्रेरणा दासबोधातून मिळाली. एका जागी स्थिर झाल्यावर आसक्ती निर्माण होते. म्हणून आधीच्या कार्याची धुरा सक्षम हातांमध्ये सोपविली. सामाजिक कामातून मिळालेल्या ऊर्जेचा स्रोत मला भिंतघर येथे घेऊन आला. असे सांगून कुबेर पोपटी पुढे म्हणाले की, “नाशिकच्या शंकराचार्य न्यास संचलित मोरोपंत पिंगळे गोशाळेत प्रशिक्षण देण्यासाठी पूर्वी आलो होतो. त्या काळात वनवासी भागात तळमळीने सेवाकार्य करणाऱ्या भीमराव गारे यांच्याशी संपर्क आला होता. त्यांच्याच पुढाकाराने वनवासी सुरगाणा परिसरात पाच जागांची पाहणी केली. प्रतापगड भागात जवळ पाणी उपलब्ध असणारी २२ एकर जमीन मिळत होती. पण, तेथे सर्वच तयार असल्यावर आपण काय निर्माण करणार हा प्रश्न पडला, म्हणूनच ‘नाही रे’चे प्रतिनिधित्व करणाऱ्या भिंतघर-गुलाबी गाव येथेच गोशाळा उभी करण्याचा संकल्प केला. रघुनाथ परशुराम जाधव यांनी दोन एकर जागा दान केली. ‘लॉकडाऊन’मध्ये केवळ पाच महिन्यांत कै. काळू धर्मा जाधव यांच्या स्मरणार्थ गोशाळा सर्वांच्या सहकार्याने उभी राहिली. स्वप्नपूर्ती झाली आहे. लवकरच ती स्वयंपूर्णदेखील होईल,” असा आत्मविश्वास पोपटी यांनी व्यक्त केला.
हल्ली आपण आसपास बघतो की, बरेचजण वयाच्या पन्नाशीतच ‘थकलो बुवा’ हे रडगाणे गातात. सेवानिवृत्तीनंतर फक्त आराम व मौजमजेत वेळ घालवणारे अवतीभवती दिसतात. या पार्श्वभूमीवर ८० वर्षांचे तरुण गोसेवक कुबेर तुकाराम पोपटी यांचे सेवाकार्य तरुणाला लाजवेल असेच आहे. मेकॅनिकल इंजिनिअर ते गोपालक असा त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. मूळचे कर्नाटकातील इरकल गावचे पोपटी यांचे शिक्षण गुजरातमधील अहमदाबाद येथे झाले. रोजगारानिमित्त महाराष्ट्रात आले. मुंबईत सहा वर्षे नोकरी करून ते पुण्यात कोथरूडला स्थायिक झाले. ‘वनाझ इंजिनिअरिंग’ कंपनीत १९ वर्षे नोकरी केली. विद्यार्थीदशेत असताना पानशेत धरण फुटले, तेव्हा माहितीही नसलेल्या पुण्यात येऊन त्यांनी व मित्रांनी मदतकार्यात सक्रिय सहभाग नोंदवला. १९८५ साली त्यांनी नोकरी सोडून वारजे-शिवणे भागात स्वतःचा डायमेकिंगचा कारखाना सुरू केला. २००० साली मुलाचे लग्न होऊन सर्व स्थिरस्थावर झाल्यावर कारखान्याची पूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली. २००५ साली हरिद्वार येथे जाऊन बाबा रामदेव यांच्याकडून ते योगविद्या शिकले. पुढच्याच वर्षी योगशिक्षक प्रशिक्षण वर्ग पूर्ण केला. २००७ साली पत्नी कलावती यांच्यासमवेत पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करताना वनवासी बांधवांचा सेवाभाव, आदरातिथ्य जवळून अनुभवले. ते बघून समाजसेवेचा अभिमान गळून पडला, असे पोपटी यांनी प्रांजळपणे नमूद केले.
 
“लहानपणी सातवीत शिकत असताना मामांकडे पोपटी यांची खा. जगन्नाथराव जोशी यांची भेट झाली. त्यांनी संघविचार पेरले. तेथूनच संघपरिवाराशी जोडला गेलो,” असे सांगून पोपटी पुढे म्हणाले की, “निवृत्तीनंतर मी व पत्नीने उर्वरित जीवन गोसेवेला समर्पित करण्याचे ठरवले. २००८ साली पुण्याच्या मार्केटयार्डजवळ गोविज्ञान संशोधन संस्थेत दाखल झालो. संस्थाचालक राजेंद्र लुंकड, बापूसाहेब कुलकर्णी तेथे महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातल्या गोशाळेतून उत्पादने आणून त्यांची विक्री करीत. त्यांनीच प्रोत्साहन देऊन नागपूरजवळ देवलापूर येथे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले. तेथे आयुर्वेदाचार्य नंदिनी भोज यांनी सात दिवसांत गोमूत्र, शेण यांचा वापर करून १५ उत्पादने करण्यास शिकवले. त्यांचे फॉर्म्युले दिले. पुण्यात कोथरूडला घरी परतल्यावर छोट्या प्रमाणात दंतमंजन, गुडघेदुखी थांबवण्यासाठी मालिश तेल तसेच धुपकांडी, साबण तयार केले, लोकांना पसंत पडले, औषधांनी रुग्णांना गुण आला. नंतर अनेक गोशाळांना भेटी देऊन सर्वेक्षण केले. अभ्यास केला. १५ गायींची गोशाळा उभारण्याचे निश्चित केले. जागेचा शोध घेत असताना सीताराम कोंडाळकर या मित्राने लवासाजवळ एक एकर जागा दिली. स्नेही एच. पी. जोशी यांनी पाच गायी व एक वासरू आणून दिले. श्रीमती गऊबाई श्रीपती कोंडाळकर स्मृती गोशाळेला प्रारंभ केला. ‘मातोश्री सेवा व अनुसंधान ट्रस्ट’ची ही गोशाळा दोन वर्षांत स्वयंपूर्ण झाली. पंचगव्यावर आधारित ३२ उत्पादने सुरू केली. त्यातील १५ पोटात घेण्याची औषधे असल्याने परवान्यांचा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा डॉ. अजित रावळ यांनी मदत केली. निर्माते म्हणून त्यांचे नाव वापरण्याची परवानगी मिळाली.
 
आता ‘जनकल्याण गोशाळे’त औषध व उत्पादनांची निर्मिती होते. परिसरातील महिला बचतगटातील ११ जणींना प्रशिक्षण दिले. त्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्याने त्यांचा आत्मनिर्भरतेकडे प्रवास सुरू झाला आहे. पाच पगारी स्त्री-पुरुष येथे काम करतात.तसेच गोठ्याची कामे करण्यासाठी एक कुटुंब राहाते. वर्षभरात ही गोशाळा स्वयंपूर्ण होईल,” असा आत्मविश्वास पोपटी यांनी व्यक्त केला. “गोशाळेच्या माध्यमातून परिसरातील शेतांमध्ये विविध प्रयोग सुरू आहेत. सेंद्रिय शेतीसाठी शेण, गोमूत्र यांचा वापर वाढला आहे. रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमीन खराब होते हे शेतकऱ्यांना पटतेय. शेतमालाचे उत्पन्न थोडे कमी आले तरी गुणवत्ता चांगली होते. हे टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना कळले आहे. त्यांचे बघून नव्याने शेतकरी सेंद्रिय शेतीकडे आकर्षित होत आहेत,” असे सांगून पोपटी म्हणाले की, “कोरोनामुळे भावनिक शक्ती तर गायींपासून नैतिक बळ मिळाले. पाच वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले. मात्र, आम्ही दोघांनी ठरवलेले ध्येय गाठताना समाधान मिळते,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जिद्दीने उभा राहिलेला हा प्रकल्प परिसरातील वनवासींच्या जीवनात विकासाचे नवनवे प्रकाशझोत आणेल. त्यांना आत्मनिर्भर करेल. त्यामुळे त्यांच्यावर स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही, असा दृढनिश्चय पोपटी यांच्या चेहऱ्यावर तरळत होता.
गोशाळेच्या माध्यमातून शाश्वत ग्रामविकास
 
गोशाळेचे प्रकल्पप्रमुख भीमराव गारे म्हणाले की, “गोमातेची सेवा व गोशाळेच्या माध्यमातून दुर्गम वनवासी वस्तीत चांगले काम उभे राहील ही खात्री होती. पाच वर्षांपूर्वी कुबेर पोपटी यांच्याशी संपर्क झाला. त्यातून या प्रकल्पाला चालना मिळाली. ‘लॉकडाऊन’च्या काळात सर्व व्यवहार ठप्प असताना पोपटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बघता बघता गोशाळेची उभारणी केली. वनवासी बांधवांची संपूर्ण साथ मिळाली. अनेक ज्ञात-अज्ञात हातांनी श्रमशक्ती व अर्थशक्तीचा समन्वय साधला. शाश्वत विकासाचा पहिला टप्पा गाठला आहे. साबरदऱ्याचे कार्यकर्ते महादू भोये, हिरामण देशमुख, भिका जाधव, बिवळ गावचे विनायक कापडी, कृष्णा भोये, शिवराम बागूल, धामणकुंड गावातील मोतीराम भोये ही केवळ प्रातिनिधिक नावे. अशा अगणित कार्यकर्त्यांनी तन, मन, धनाचे बळ दिले. गोविज्ञान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाठक, उपाध्यक्ष नरहर जोशी, सचिव सुनील काण्णव, तसेच सदस्य योगिनी चंद्रात्रे, रवींद्र करंबेळकर, रघुनाथ जाधव, जयंत गायधनी व अनेकांचे सहकार्य लाभले आहे.”
महिला सबलीकरणाचा अनोखा संदेश
 
सुरगाणा तालुक्यातील गुलाबी गाव हा राज्यातील आगळावेगळा प्रयोग आहे. गुलाबी रंग हा प्रेमाचे, सौहार्दाचे, परस्परातील सलोख्याचे प्रतीक आहेच. मात्र, या वनवासी गावाने महिला सक्षमीकरण, सबलीकरण यांचा अनोखा संदेश दिला आहे. ९० घरांची वस्ती असणाऱ्या या गावासह पाच गावांची मिळून ग्रामपंचायत आहे. शिक्षक जितेंद्र गवळी यांच्या संकल्पनेतून गावातील सर्व घरे गुलाबी रंगात रंगलेली आहेत. संकल्पनेला मूर्त स्वरूप येण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेतला. लोकवर्गणीतून योजना राबवली. गावात प्लास्टिकबंदी असून, स्वच्छता वाखाणण्याजोगी दिसते. कचरा संकलन करून सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येते. येथील समाजमंदिर व सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे स्वागतासाठी सज्ज झालेल्या गुलाबी गावाला नवी झळाळी आली आहे. बचतगटाचे महिला व पुरुष पारंपरिक ‘तारपा नृत्य’ सादर करणार आहेत. या गावाला चांगली ओळख मिळाली आहे. पर्यटकांनाही येथे येण्याची उत्सुकता असते. पण, अद्याप बसदेखील पोहोचत नसल्याने अडचणी येतात. ती अडचण दूर व्हावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त आहे.
 
- संजय देवधर
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121