आयुष क्वाथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

aayush kadha _1 &nbs




आयुष मंत्रालयाने एप्रिल-मे 2020 दरम्यान कोविडविरोधी ‘सप्तपदी’ प्रसारित केली होती. यामध्ये काही प्रतिबंधात्मक उपाययोजना विस्तारितपणे सांगितल्या होत्या. जसे गरम पाणी पिणे, हळदीचे दूध पिणे, नस्य (नाकात थेंब घालणे) वाफ घेणे, कवल धारण (तोंडात पाणी धरणे), गुळण्या करणे, व्यायाम करणे इ. त्यातीलच एक म्हणजे ‘आयुष क्वाथ’ (काढा) होय.




कोविड-19’चा उगम होऊन एक वर्ष उलटून गेले. वरकरणी बघता तो आटोक्यात आला आहे, असे चित्र दिसत असले, तरी त्याचे उपप्रकार दिवसेंदिवस डोके वर काढू लागले आहेत. एकूणच ‘कोविड’मुळे जनसामान्यांचे दैनंदिन जीवनच बदलून गेले. मास्क, सॅनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ही आता काळाची गरज झाली आहे.


आयुष मंत्रालयाने एप्रिल-मे 2020 दरम्यान कोविडविरोधी ‘सप्तपदी’ प्रसारित केली होती. यामध्ये काही प्रतिबंधात्मक उपाययोजना विस्तारितपणे सांगितल्या होत्या. जसे गरम पाणी पिणे, हळदीचे दूध पिणे, नस्य (नाकात थेंब घालणे) वाफ घेणे, कवल धारण (तोंडात पाणी धरणे), गुळण्या करणे, व्यायाम करणे इ. त्यातीलच एक म्हणजे ‘आयुष क्वाथ’ (काढा) होय. यालाच 'HERBAL DECOCTION' असेही नाव आहे. आजच्या लेखात या ‘आयुष क्वाथ’बद्दल जाणून घेऊयात.

‘आयुष क्वाथ’मधील घटक पुढीलप्रमाणे आहेत- तुळस, सुंठ, दालचिनी व मिरी यांचा काढा दिवसातून एक-दोन वेळा प्यावा.
 
काढा तयार करण्याची कृती
वरील घटकांची तीन गॅ्रम भरड दोन कप पाण्यामध्ये घालून उकळवावी. (चहा उकळवतो त्याप्रमाणे) थंड झाल्यावर हा काढा गाळून त्यात चवीनुसार गूळ किंवा लिंबाचा रस घालून प्यावा. हा काढा उकळवताना काळ्या मनुका घातल्या, तर उत्तम!
आयुष मंत्रालयाने जेव्हा हा काढा प्यावा म्हणून जाहीर केले, त्या आधी विविध पैलूंवर विचार केला. जसे त्यातील घटकांची संपूर्ण भारतातील उपलब्धता, त्यांची सुलभता (अ‍ॅक्सेसिबिलिटी), काढा बनविण्यासाठी लागणारा वेळ, विकत घेण्यासाठी होणारा खर्च (खिशाला परवडेल असा) काढा बनविण्यासाठी लागणारे कौशल्य आणि प्रशिक्षण. यासाठीचा छोटासा ‘व्हिडिओ’ आयुष मंत्रालयाच्या संकेतस्थळावर बनविला गेला.
 
‘आयुष क्वाथ’चे मुख्यत: दोन उपयोग आहेत - 1) प्रतिबंधात्मक फायदा - शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती सुधारुन कुठल्याही संसर्गजन्य व्याधीपासून शरीराचे रक्षण करणे.
2) चिकित्सात्मक फायदा - जर ‘कोविड-19’ची लागण झालीच, तर त्याची लक्षणे आटोक्यात ठेवणे. (म्हणजेच तीव्रता, प्रखरता कमी ठेवणे.) भारतासारख्या अधिक लोकसंख्येच्या ठिकाणी, सर्वांनाच वैद्यकीय सुविधा या स्थितीमध्ये उपलब्ध करता येईल, अशी परिस्थिती नव्हती. अशा वेळेस ‘आपले आरोग्य आपल्या हातात’ (अवर हेल्थ इन अवर हॅण्ड)व सर्वांसाठी आरोग्य (हेल्थ फॉर ऑल) हा उद्देश समोर ठेवून ‘आयुष’ मंत्रालयाने ‘आयुष क्वाथ’ची निर्मिती केली. घरात उपलब्ध असलेले जिन्नस वापरून, ज्यांचा पूर्वापार काळापासून घरोघरी आजीबाईच्या बटव्याच्या स्वरूपात विविध आजारांवर उपयोग केला जात होता, अशा आहारीय औषधीय घटकांचा समावेश या काढ्यामध्ये केला गेला.
 
 
‘आयुष क्वाथ’ने रोगप्रतिकारशक्ती तर सुधारतेच, पण त्याचबरोबर पचनशक्तीदेखील सुधारते. शरीरात अनावश्यक, अतिरिक्त कफाचा नाश होतो, कृमिघ्न म्हणून उपयोगी ठरते. तसेच रसायन कार्यही करते. (म्हणजे शरीरातील धातू उत्कृष्ट दर्जाचे निर्माण करणे.) ‘आयुष क्वाथ’ सहसा सकाळी व संध्याकाळी घ्यावा. (दुपारची वेळ, उकाड्यात टाळावा.) ज्यांचा घराबाहेर कामानिमित्त प्रवास होतो, रहदारीच्या ठिकाणी, सार्वजनिक जागी वावर होतो आणि गंभीर आजाराने ग्रस्त आहेत किंवा संसर्गाचा/होण्याचा अधिक धोका असलेल्या व्यक्तींना हा ‘क्वाथ’ दिवसातून दोनदा घ्यावा. इतरांनी एकदा घेतल्यास पुरे! एका वेळेस वरील घटकांची मात्रा (तुळस, सुंठ, दालचिनी व काळी मिरी) तीन ग्रॅमपेक्षा जास्त नसावी. (म्हणजे यांची एकत्रित भरड तीन ग्रॅम असावी. त्यात तुळशीची मात्रा सगळ्यात जास्त, त्या खोलाखाल सुंठ, मग दालचिनी आणि सगळ्यात कमी काळी मिरीची मात्रा असावी. समप्रमाणात हे चार घटक घेऊ नयेत. तीन ग्रॅम म्हणजे साधारण अर्धा चमच्यापासून एक कप ‘आयुष क्वाथ’ बनवावा. (एक कप म्हणजे साधारणपणे १५० मिली) हा काढा चवीला थोडा तिखट लागतो. घशाला थोडं गरम जाणवू शकते. त्यामुळे हा काढा बनविताना त्यात काळ्या मनुका घालाव्यात. यामुळे त्यात थोडा गोडवा येईल व तीक्ष्णता कमी होईल. हा काढा गाळून प्यावा. तो पिताना गरम किंवा कोमट असावा. गार पिऊ नये. चवीनुसार गूळ घालावा किंवा मधुमेह असल्यास लिंबू पिळून घ्यावे. या ‘आयुष क्वाथ’च्या गोळ्याही उपलब्ध आहेत. (ज्यांना क्वाथ करून पिणे शक्य नाही, त्यांनी या गोळ्या घ्याव्यात.) 500 मिग्रॅमच्या एक-एक गोळ्या अशा दोन वेळा घ्याव्यात.
 
 
 
काही वेळेस व्यक्तीसापेक्ष, प्रकृतीनुरूप यात थोडा बदल करावा लागतो. उदा. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना या काढ्यामुळे लघवीत जळजळ, पोटात-घशात आग होणे, अधिक घाम येणे, अतिआम्लपित्त इ. लक्षणे उद्भवू शकतात. त्यावेळेस सुंठ व मिरीचे प्रमाण एकदम कमी करावे. यात ज्येष्ठमध घातल्यास कफाचे विलयन होईल, पण पित्ताचा त्रास होणार नाही. ज्यांना वारंवार सर्दी-पडसे होते, घसा धरतो, त्यांनी या काढ्यात हळद घालावी. यामुळे श्वसन संस्थेची क्षमता सुधारुन लक्षणे नाहीशी होतात.
 
उन्हाळ्यामध्ये पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी तसेच पित्ताचे त्रास/आजार असलेल्यांनी तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने हा ‘आयुष क्वाथ’ घ्यावा किंवा त्यात बदल करावा. सध्याच्या काळात ही जरी विविध उपप्रकार समोर आले असले, तरीसुद्धा शरीराची व मनाची रोगप्रतिकारक्षमता उत्तम असली, तर व्याधींशी लढताना सक्षम ढाल आपल्या हातात आहे, हे विसरु नये. दैनंदिन जीवनामध्ये बर्‍याच गोष्टी ‘न्यू नॉर्मल’च्या व्याख्येत बदलत गेल्या आहेत. झोपेच्या वेळा, खाण्याच्या वेळा, प्रवासाचे रुटिन इ. बदललेले आहे. अशा वेळेस एक सकारात्मक बदल म्हणून ‘आयुष क्वाथ’चा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात नक्की करुन घ्यावा.(क्रमशः)
 
वैद्य कीर्ती देव 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.) 
९८२०२८६४२९
@@AUTHORINFO_V1@@