हे तर होणारच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2021
Total Views |

Tandav_1  H x W
 
 
 
‘तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक-लेखकांनी शिवशंकराचा अपमान करत, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीमुक्ती आंदोलन व श्रीराम मंदिर निर्मितीवर बोट ठेवल्याचे, आक्षेप घेतल्याचे, तसेच हिंदू देवतेच्या मुखातून डाव्या, देशविघातक विचारांच्या स्तुतीचा, गौरवाचा उद्योग केल्याचेही दिसते, म्हणजेच आम्हाला हिंदूंच्या-राष्ट्रवाद्यांच्या भावनांची पर्वा नाही, हेच त्यांना सांगायचे आहे.
 
 
हिंदूधर्मीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ वेबसीरिजवरून देशभरात गदारोळ सुरू झाल्याचे दिसते. त्याला कारण ठरले ते ‘तांडव’मधील एका दृश्यातील कलाकाराची आक्षेपार्ह वेशभूषा, रंगभूषा व त्याच्या तोंडचे वाक्य. त्यावरूनच भाजप आमदार राम कदम यांनी मुंबईत ‘तांडव’विरोधात तक्रार दाखल केली, तर उत्तर प्रदेशातही या वेबसीरिजविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’कडे वादग्रस्त चित्रण व जनभावना दुखावल्याप्रकरणी उत्तर मागितले, तर अन्य हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी संघटना, नागरिकांनी ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’च्या भारतप्रमुख अपर्णा पुरोहित व ‘तांडव’चे निर्माते हिमांशू कृष्ण मेहरा, दिग्दर्शक अली अब्बास जफर, लेखक गौरव सोलंकी व सैफ अली खान, जिशान अयूबसह अन्य कलाकारांविरोधात कायदेशीर कारवाईसह बहिष्कार आणि बंदीचे आवाहन केले. ती अनाठायी, अप्रस्तुत म्हणता येणार नाही. कारण, आज ‘तांडव’मधील एका दृश्यावरून हिंदूंच्या भावना दुखावल्याचे म्हटले जात असले तरी त्यात तेवढेच आक्षेपार्ह नाही, तर त्यापुढे या वेबसीरिजच्या निर्मात्यांना यातून आपला राजकीय अजेंडा जनतेच्या गळी उतरवायचा आहे, विरोध त्यालाच आहे किंवा असायला हवा.
 
 
 
दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात हिंदू देवी-देवतांची सर्वाधिक चेष्टा कुठे होत असेल किंवा त्यांना मानवी पातळीवर आणले जात असेल तर ते लोकवाङ्मयात. भारुड, गण-गवळणी, दशावतार, तमाशा यांसारख्या लोकवाङ्मयांत राधा-कृष्ण, इंद्र, ब्रह्मदेव, विष्णू, महादेव आदी दैवतांनी माणसांशी व माणसांनी दैवतांशी संवाद साधल्याची, परस्परांची मस्करी केल्याची अनेक कथानके असतात. पण, त्यातला गाभ्याचा भाग जनप्रबोधनाचा असतो व यामुळे हिंदू समाजही त्या प्रसंगी सहिष्णूच असतो, प्रबोधनाचा भाग स्वीकारून तो बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जात असतो. वर्षानुवर्षांपासून लोकानुरंजनाचा हा वाङ्मय प्रकार कोणत्याही आक्षेप-विरोधाशिवाय टिकून आहे तो याचमुळे. पण, ‘तांडव’चे तसे नाही, या वेबसीरिजबाबत सुरू असलेला वादंग सर्वांनीच विचार करण्यासारखा आहे. ‘तांडव’मध्ये प्रबोधनाचा भाग नाही, तर हिंदू देवी-देवतांची खिल्ली उडवताना, अपमान करताना आपल्याला भावणार्‍या राजकीय विचारसरणीच्या प्रचारार्थ ही वेबसीरिज काम करते आणि विरोधाचा मुद्दा हाच आहे.
 
 
 
‘तांडव’च्या पहिल्याच भागातील व्हीएनयु (जेएनयु?) विद्यापीठाच्या एका दृश्यात मंचावरील कलाकार जिशान अयूब-शिवा सूट-बूट घालून चेहर्‍यावर निळ्या रंगाचा क्रॉस रंगवून, हातात त्रिशूळ-डमरू घेऊन शंकराच्या रूपात दाखवला आहे. त्याचे सहकलाकारही त्याला ‘प्रभू, भोले, ईश्वर’ वगैरे नावाने आवाज देत असून, नंतर आलेल्या नारदरूपी कलाकाराच्या तोंडी, “प्रभू कुछ किजिए, रामजी के फॉलोअर्स लगातार सोशल मीडिया पर बढते ही जा रहे हैं,” असा संवाद आहे, तर त्यापुढे शिव्या देण्यापासून ते जिशान आणि मंचासमोरील दर्शकांदरम्यानचे आझादी, आझादी (तुकडे तुकडे गँगच्या पठडीतले) वगैरे संवाद आहेत. अर्थात, इथे ‘तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक-लेखकांनी शिवशंकराचा अपमान करत, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीमुक्ती आंदोलन व श्रीराम मंदिर निर्मितीवर बोट ठेवल्याचे, आक्षेप घेतल्याचे, तसेच हिंदू देवतेच्या मुखातून डाव्या, देशविघातक विचारांच्या स्तुतीचा, गौरवाचा उद्योग केल्याचेही दिसते, म्हणजेच आम्हाला हिंदूंच्या-राष्ट्रवाद्यांच्या भावनांची पर्वा नाही, हेच त्यांना सांगायचे आहे. या पार्श्वभूमीवर इथे ‘होस्टेज’ वेबसीरिजचे उदाहरण विचारणीय ठरावे, यात एका दहशतवादी-शल्यचिकित्सकाचे नाव असगर नबी दाखवले असून, पृथ्वीसिंग सदर डॉक्टरला, “मेरे लिए तो तुम ही खुदा हो,” असे म्हणतो. तेव्हा त्याच्या उत्तरार्थ नबी त्याला, “ही तर ईशनिंदा आहे (अल्लाहशी तुलना केल्याने), तू मला जहन्नूममध्ये पाठवशील,” असे सुनावतो. तसे पाहता इथे जहन्नूमच्या उल्लेखाचा संवाद लिहिण्याची अजिबात गरज नव्हती. पण, वेबसीरिजच्या निर्माता-दिग्दर्शकांनी इस्लामच्या भावना दुखावू नये म्हणून एकेश्वरवादाशी निष्ठा दाखवत त्यातली लहानात लहान बाबही बरोबर लक्षात ठेवली व तसे दाखवलेही. पण, हिंदूंच्या भावनांबद्दल तसे होत नाही व ‘तांडव’ वेबसीरिज हा त्याचाच पुढचा नमुना.
 
 
 
वस्तुतः २०१९ साली सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीप्रकरणी रामलल्लाच्या बाजूने निकाल दिला आणि गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तिथे श्रीराम मंदिर निर्मितीसाठी भूमिपूजन झाले. यंदाच्या 15 जानेवारीपासून विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून भव्य श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलनाचे कार्य हाती घेण्यात आले व ‘तांडव’ वेबसीरिजमध्ये नेमके या मुद्द्यावर रामाच्या लोकप्रियतेशी संबंधित संवादातून भाष्य केले गेले, तेही अचानक, एकाएकी व तुटक तुटक, ज्याचा संबंध वेबसीरिजच्या कथानकाशी लागत नाही, म्हणूनच सदरचे दृश्य आणि संवाद कथानकाची गरज म्हणून नव्हे, तर केवळ हिंदूंना दुखाविण्याच्या व राजकीय हेतूनेच चित्रित केल्याचे स्पष्ट होते. त्यानंतरही मंचावरील कलाकार दर्शकांना तुम्हाला काय पाहिजे, असे विचारतो, तर दर्शकांतून ‘आझादी, आझादी’ असे उत्तर मिळते. इथेच दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील तुकडे तुकडे गँगच्या वादग्रस्त-देशविरोधी मतांना ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’ व ‘तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक-लेखकाने ‘सन्माननीय’ व्यासपीठ दिल्याचे समजते.
 
 
 
इतकेच नव्हे, तर जिशानच्या तोंडच्या ‘जियो’ शब्दाचा उच्चारही देशातील प्रथितयश उद्योगपतीची आठवण करून देण्यासाठीच केल्याचे दिसते, तर शंकराच्या रूपातील जिशानच्या तोंडी शिव्याही दिलेल्या आहेतच. विशेष म्हणजे, सर्व शिव्या स्त्रियांचाच मानभंग करणार्‍या असतात आणि ज्या कळपातल्यांनी ‘तांडव’ची निर्मिती केली, तो कळप स्वतःला महिला अधिकारांचे रक्षकही म्हणवून घेत असतो. पण, त्यांच्या चित्रपट, वेबसीरिजमध्येच सर्वाधिक शिव्या असतात, म्हणूनच हा त्यांचा महिला सन्मानाचा ढोंगीपणाच म्हटला पाहिजे. एकूणच ‘तांडव’ वेबसीरिजमधील सदरचे दृश्य डाव्या राजकीय विचारसरणीची पेरणी करणारे जसे आहे, तसेच हिंदू देवी-देवतांची अवहेलना करणारे, त्यांच्या तोंडी विनाकारण शिव्या घालणारेही आहे. इथेच ‘तांडव’च्या निर्मांत्यांचा हेतू शुद्ध नसल्याचे आणि हिंदू, हिंदुत्व व राष्ट्रवादी विचारांच्या द्वेषाने माखलेला असल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य तर सर्वांना आहेच व असलेही पाहिजे. मात्र, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर भलत्याच कारणासाठी केला जात असेल, तर त्यावर प्रतिक्रियाही तीव्रच उमटणार, हे ‘तांडव’च्या निर्मात्यांनी लक्षात घ्यावे. आतापर्यंत देशात विशिष्ट विचारसरणीचे लोकच वेगवेगळ्या मुद्द्यांवरून तक्रार, आंदोलन, मोर्चे वगैरे करताना दिसत होते. पण, यापुढे जोपर्यंत बहुसंख्य हिंदूंच्या अस्मिता, प्रतीके, श्रद्धास्थाने व भावनांचा अपमान होणे थांबत नाही, तोपर्यंत जे जे असे करतील, त्यांना विरोधाचा सामना करावाच लागेल, तक्रारींचे उत्तर द्यावेच लागेल आणि आक्षेपार्ह भाग हटवावाच लागेल किंवा तसे काही करण्यापासून स्वतःला कोसो मैल लांब ठेवावेच लागेल.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@