त्यांनी घेतला आध्यात्मिक प्रवचनाचा वसा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2021
Total Views |
mns_1  H x W: 0




वेदांमधील शुद्ध ज्ञानाचे रक्षण करून ते एका पिढीपासून दुसर्‍या पिढीकडे नेण्याचेकाम करणार्‍या अलका मुतालिक यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
 
 
अलका मुतालिक यांचा जन्म बिजापूरमध्ये १७ जानेवारी, १९५६ रोजी झाला. त्यांची मातृभाषा कन्नड होती. घरात गुरूदेव रानडे यांचे अधिष्ठान होते. त्यांचे आजोबा डॉक्टर, तर वडिलांनी ज्योतिषमध्ये जागतिक पातळीवर पीएच.डी केले होते. आई गणितात पारंगत होती. अलका मुतालिक यांच्या घरी आध्यात्माचे संस्कार होते. घरी दररोज सकाळी काकडआरती, दासबोध आणि ज्ञानेश्वरीचे वाचन होत होते. आजीने लहान असतानाच मुतालिक यांच्याकडून तुकारामांचे अभंग, हरिपाठाचे अभंग हे सगळे पाठ करून घेतले होते.
 
 
 
 
वयाच्या तिसर्‍या वर्षी हे सगळे अलका मुतालिक यांना तोंडपाठ होते. त्याकाळी त्यांचा फारसा अर्थ समजत नव्हता. त्यांच्या वडिलांची मामी घरी निरूपण करीत असे. दररोज सकाळी त्या ज्ञानेश्वरी सांगत असत. मुतालिक यांच्या माहेरी सुरुवातीला सगळे एकत्र कुटुंबांत राहत होते. त्यामुळे सगळेच निरूपणाला बसत होते. पण हळूहळू कामानिमित्त सर्वजण बिजापूर सोडून गेले. मुतालिक यांचे वडीलच केवळ बिजापूर येथे वास्तव्यास राहिले होते. मुतालिक यांना निरूपणाला बसणे बंधनकारक होते.
 
 
 
 
१९६० साली अलका मुतालिक यांचे वडील मुंबईला आले, त्यांच्याबरोबर त्याही आल्या. अलका तोपर्यंत कानडी भाषा बोलत होत्या, त्यांना मराठी भाषा अजिबात येत नव्हती. त्यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण कानडी भाषेत झाले होते. शीवला कानडी शाळा नव्हती. वडाळ्याला कन्नड शाळा असली तरी लहान असल्याने त्याठिकाणी एकट्याने जाणे शक्य नव्हते. मुतालिक यांच्या वडिलांनी त्यांना मराठी शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतला. मुतालिक यांचा मराठीतून शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. टिल्लूबाईंची एक शाळा होती.
 
 
 
 
टिल्लूबाई या अलका मुतालिक यांना मराठी शिकवत होत्या. मुतालिक आठवीत असताना त्या डोंबिवलीत राहण्यासाठी आल्या. डीएनसी शाळेत त्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. दहावी आणि अकरावीचे शिक्षण त्यांनी पुरंदरे हायस्कूल, मुलुंडला पूर्ण केले. अकरावीला असतानाच त्यांचे लग्न झाले. त्यांचे वडील आणि सासरे एका कंपनीत काम करीत होते. सासर्‍यांचे निधन झाले आणि सासूबाई शोभना मुतालिक या एकट्या पडल्या. त्यांनी मुतालिक यांच्या आई-वडिलांकडे त्यांचा हात मागितला. शिवाय मुतालिक यांच्या आईला तिचे आम्ही सर्व शिक्षण पूर्ण करू, असा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळला. मुतालिक यांनी एक वर्ष शिक्षणात ‘गॅप’ घेतला. ‘गॅप’नंतर त्यांनी जोमाने शिक्षणासाठी कंबर कसली. बीए, एमए, बीएड, एमएडपर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केले.
 
 
 
१९८८ पासून त्या समर्थ संप्रदायाच्या कार्यात आल्या. शिवथरघळीचे कार्य सुरू केले. विद्यार्थ्यांसाठी समर्थ विद्यापीठच होते. त्यानिमित्ताने त्या समर्थ साहित्याशी जोडल्या गेल्या. अलका मुतालिक आणि त्यांचे पती अशा दोघांनीही पत्रांद्वारे तीन वर्षे अभ्यास केला. शिवथरघळीत दासबोध शिकविण्यासाठी येत असलेले डॉ. देशमुख यांच्याकडे अलका मुतालिक जाऊ लागल्या. प्रभाकर जोशी, मामा गांगल, सुनील चिंचोळकर असे दिग्गज दासबोध शिकविण्यासाठी येत असत. या सगळ्यांच्या सान्निध्यात जीवनाला एक वेगळे वळण लागले. समर्थांच्या संप्रदायाचा अभ्यास खूप झाला होता.
 
 
 
त्यानंतर त्यांनी डॉ. श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांचा अनुग्रह घेतला. डॉ. देशमुख यांनी दहा उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, गीता तसेच, विचार सागर, पंचदशीसारख्या ग्रंथांचा अभ्यास करून घेतला. एमएडला तत्त्वज्ञान विषय होता. त्यांचा पाया पक्का झाल्याने विषय लवकरात लवकर उमगत गेले. गुरूपरंपरेतून सगळे ग्रंथ शिकले. संत वाड्मयांचाही खूप अभ्यास त्यांनी करून घेतला. १९९१ मध्ये त्यांनी अलका मुतालिक यांना प्रवचनाची आज्ञा दिली.
 
 
 
मुतालिक या १९९१ नंतर नियमित प्रवचने देऊ लागल्या. सुरुवातीला त्या विद्यार्थ्यांना शिकवत होत्या. एमएडचा ‘मॅनेजमेंट आणि ऑरगेनायझेशन’ हा विषय होता. मोठ्या कंपनीत सुरक्षेचे नियम काय असतात, यावर त्या व्याख्याने देत. छोट्या-छोट्या नोकर्‍या त्यांनी केल्या. बेकिंग व्यवसायात त्या पारंगत होत्या. मुली लहान असल्याने त्यांनी बाहेर जाण्याचा कधी विचार केला नाही. १९९२ ला सरलाबाई म्हात्रे शाळेत त्यांनी नोकरीला सुरूवात केली. मुतालिक यांनी आपल्या करिअरची सुरूवात उशिराने केली. ३० वर्षे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले.
 
 
 
मुतालिक यांना पहिल्या प्रवचनानिमित्त गुरूपौर्णिमेनिमित्त ‘गुरूभक्ती म्हणजे काय’ असा विषय दिला होता. डॉ. देशमुख यांचा फारसा सहवास त्यावेळी मुतालिक यांना लाभला नव्हता. त्या प्रवचनाला मुतालिक यांच्यासोबत अनेक दिग्गज होते. मुतालिक त्याठिकाणी बोलल्या. श्रोत्यांनाही ते भावले. “ते मी काही बोलत नव्हते. तसा माझा अभ्यासही नव्हता. डॉ. काकांनी मला प्रवचन कर, असे सांगितले होते. प्रवचन म्हणजे मोहमाया आहे. मला प्रवचन करायचे नाही,” असे मुतालिक यांनी काकांना सांगितले होते. पण डॉ. देशमुख काकांनी वेदांतामधील शुद्ध ज्ञानाचे रक्षण कोण करणार? ते पुढच्या पिढीला कोण देणार ? वेदांनी ज्ञानाचे भांडार आपल्यासाठी ठेवले आहे. मुतालिक अभ्यास न करता प्रवचनाला जात होत्या.
 
 
 
 
हे आपले काहीच नाही समजत होते. मग आपण आपल्या सद्गुरूंना त्रास देत आहोत, हे लक्षात आले. मुतालिक त्यानंतर खर्‍या अर्थाने अभ्यास करून प्रवचनाला जाऊ लागल्या. डॉ. काका गणेश मंदिरात वेदांताचा अभ्यास शिकविण्यासाठी येत असत. सात वर्षे तरी तो अभ्यास वर्ग चालत होता. वर्षातील २२ दिवस डॉ. काका हे मुतालिक यांच्या घरी थांबत. त्याकाळातही ते मुतालिक यांना शिकवत. मुतालिक यांनी अशा पद्धतीने डॉ. काकांकडून ज्ञान मिळविले. त्यांची देशात आणि परदेशात खूप प्रवचने झाली. डोंबिवलीत कीर्तन महाविद्यालयात तत्त्वज्ञान शिकवित होते.
 
 
 
योग महाविद्यालयात अजूनही उपनिषदे एमए भाग एक-दोनच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. मुतालिक यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मुतालिक यांनी विपुल लेखन केले आहे. उपनिषदे शिकण्यासाठी सर्व तरूण विद्यार्थी येत आहेत. तरूण पिढीला वेदांचे महत्त्व पटले आहे. वेदांमध्ये विज्ञान आहे. ते समजून घेण्यासाठी बुद्धिमत्ता तीक्ष्ण हवी. बुद्धीचा कस त्यासाठी लागतो, असे मुतालिक सांगतात.



- जान्हवी मोर्ये 
@@AUTHORINFO_V1@@