वेळीच उपचार न मिळाल्याने पांडुरंग रायकरांचा मृत्यू : आरोग्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2020
Total Views |

Rajesh Tope_1  
 
 
 
मुंबई : रुग्णवाहिका आणि बेड वेळेत न मिळाल्यामुळे पत्रकार पांडुरंग रायकर (४२) यांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना काळात रिपोर्टींग करत असताना पत्रकार रायकर यांचे निधन झाले आहे. बुधवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उपचारात हलगर्जीपणा आणि उशीर झाल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मित्रपरिवाराकडून देण्यात येत होती. आरोग्यमंत्र्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
 
 
 
पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. लॉकडाऊन ते अनलॉकिंग आणि मिशन बिगिन अगेनपर्यंत सर्व महत्त्वाच्या घडामोडी पांडुरंग यांनी जनतेपर्यंत पोहोचवल्या होत्या. मूळचे नगरचे असलेले पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
 
 
 
ई टीव्ही मराठी, एबीपी माझा, टीव्ही 9 मराठी आदी माध्यमांमध्ये त्यांनी आपली सेवा दिली होती. राजकारणापासून ते इतर सर्व प्रकारच्या विषयांवर त्यांनी लिखाणही केले. ऑक्सिजन पातळी कमी होत गेल्याने, पांडुरंग यांची कोरोनाशी झुंज संपली. पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. पण त्यांची ऑक्सिजन पातळी घटल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
 
 
पुण्यात व्हेंटीलेटर उपलब्ध झाला नव्हता. मध्यरात्री पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्हेंटिलेटर असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पांडुरंग यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली केल्या. मात्र धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकाच नव्हती. रुग्णवाहिका मिळेपर्यंत उशीर झाला होता.
 
 
 
फेसबूक लाईव्हद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कितीही आरोग्य यंत्रणा सक्षम असली असा दावा केला असला तरीही अशा प्रकरणांमुळे एका पत्रकाराला व्हेंटीलेटर, रुग्णवाहिका आणि वेळेत उपचारासाठी बेड मिळणे पुण्यासारख्या शहरात कठीण होत असल्याने हे दावे किती फोल आहेत, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
 
 
पांडुरंग रायकर यांच्या कुटूंबियांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. दरम्यान, रायकर यांच्या मृत्यूचा अहवाल मागवला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. श्रीमंत लोक अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार करत असल्याने बेड उपलब्ध होत नाहीत, असा दावाही आरोग्य मंत्र्यांनी केला आहे.
 
 
कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांची चाचणी करणे तसेच संपर्कात आलेल्या ४० व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचे निर्देश आपण दिले असून यामुळे चाचण्याही वाढतील. वेळीच उपचार करता येतील, असे टोपे यांनी सांगितले. ज्यांना कोरोनाची लक्षणे आढळतील त्यांनी वेळीच उपचार करावेत, असे आवाहनही त्यांनी दिले आहे.




@@AUTHORINFO_V1@@