सुरांचा जादुगार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2020   
Total Views |
kishore kumar_1 &nbs






भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहायचा झाल्यास किशोर कुमार या नावाशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही. गायनासोबतच अभिनय क्षेत्रातही मुशाफिरी करणारा, मस्तमौला व्यक्तिमत्त्व असणार्‍या किशोर कुमार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख...



किशोर कुमार ज्या गाण्याला आपला आवाज द्यायचे ते गाणे सुपरहिट व्हायचे. ते फक्त चांगले अभिनेते नव्हते, तर ते संगीतकार, लेखक आणि निर्माता होते. आजही एक सर्वोत्कृष्ट गायक म्हणून त्यांची ओळख कायम आहे. किशोर कुमार त्यांच्या काळातले सर्वात महागडे गायक होते. असेही म्हटले जाते की, बॉलीवूड स्टार फक्त त्यांच्या गाण्यांमुळेच ‘सुपरस्टार’ म्हणून प्रसिद्ध झाले होते. आपल्या फिल्मी करिअरमध्ये किशोरदा यांनी सुमारे १५०० हून जास्त गाणी गायली. आजही त्यांची गाणी लोकांना मंत्रमुग्ध करतात. ६० च्या दशकातील देवानंदपासून ते ८०च्या दशकातील अनिल कपूरपर्यंतच्या अनेक नायकांच्या यशात किशोरदांचा वाटा मोठा आहे.


खांडवा डवामधील एका बंगाली घरात ४ ऑगस्ट १९२९ रोजी किशोर कुमार यांचा जन्म झाला. किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली! त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते, आई गौरीदेवी या एका श्रीमंत घराण्यातील होत्या. चार भावंडांमध्ये किशोर कुमार सर्वांत लहान होते. किशोर कुमार लहान असतानाच त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक बॉलीवूडमध्ये अभिनेते म्हणून प्रसिद्धीस येऊ लागले होते. अशोक यांच्या मदतीने नंतर अनुप यांनीसुद्धा चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. चित्रपटांची कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने लहानपणापासूनच किशोर कुमार यांना चित्रपट आणि संगीतात आवड निर्माण झाली. गायक आणि अभिनेते के. एल. सैगल यांचे ते खूप मोठे चाहते होते. त्यांना ते गुरू मानत होते.


मनोरंजनविश्वात रमणारे, अवघ्या १२ वर्षांचे किशोरदा रेडिओवर गाणे ऐकून स्वत: त्याच्या धूनवर थिरकायचे. तसेच, चित्रपटामधील गीतांची पुस्तके जमा करून त्यातील गीतांना वेगळ्या शैलीत घरी आलेल्या पाहुण्यासमोर अभिनयासह सादर करून, त्यांच्याकडून बक्षीसही मागून घ्यायचे. किशोरदांचे वडीलबंधू दादा मुनी उर्फ अशोक कुमार व अनुप कुमार यांचे बोट धरून स्वत:चे नशीब आजमावण्यासाठी त्यांनी चित्रपटातील अभिनयातून करिअरचा श्रीगणेशा केला. त्यावेळी चित्रपटसृष्टीत अभिनेत्यामधील सर्व गुण तपासले जात होते. त्यात अभिनेत्याला गायनाची कसोटीही यशस्वीपणे पार पाडावी लागत असे.


अशोक कुमार बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर, गांगुली परिवाराचे मुंबई दौरे वाढले. याच दरम्यान आभास कुमार यांनी आपले नाव ‘किशोर कुमार’ ठेवून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. बॉम्बे टॉकीजमध्ये समूहगायक म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. १९४६ साली प्रदर्शित झालेला ‘शिकारी’ हा अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. याच वर्षी संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना ‘जिद्दी’ या चित्रपटात गाण्याची संधी दिली. हे गाणे होते ‘मरने की दुआएँ क्यों मांगूँ’. या गाण्यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बर्‍याच संधी चालून आल्या आणि मुंबईतील वाढत्या कामामुळे १९४९ साली त्यांनी मुंबईत स्थायिक होण्याचे निश्चित केले.


१९५१ साली ‘बॉम्बे टॉकीज’च्या, फणी मजूमदार दिग्दर्शित ‘आंदोलन’ या चित्रपटात त्यांना मुख्य अभिनेता म्हणून काम केले. आपल्या भावाच्या मदतीने किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळत असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्हायचे होते. त्यांनी संगीताचे विशेष शिक्षण घेतलेले नव्हते. सुरुवातीला ते के. एल. सैगल यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.


अभिनय करताना गायन व संगीताच्या तालावर थिरकणे या त्रिवेणी कलांचा संगम असलेल्या किशोरदांनी दर्शकांसह श्रोत्यांवर भुरळ घातली. नायकासह गायक यांच्या भूमिकेने तर दर्शकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर त्यांनी मीना कुमारी, वैजयंती माला, निम्मी, कामिनी कौशल, मधुबाला, नूतन, माला सिन्हा व बीना रॉय यांच्यासारख्या नायिकांसोबत चित्रपट केले.


चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी पार्श्वगायक म्हणून ओळखल्या जाणार्‍या किशोर कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रसिद्ध गाणी गायली. हिंदी भाषेसोबतच त्यांनी मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम अशा विविध भाषांमध्येदेखील गाणी गायली आहेत. ‘माना जनाब ने पुकारा नही’, ‘ओ हंसीनी, मेरी हंसीनी’, ‘रूप तेरा मस्ताना’, ‘एक लडकी भिगी भागी सी’, ‘हाल कैसा है जनाब का’ अशी कितीतरी सुपरहिट गाणी गात रसिकांच्या मनावर राज्य केले.


सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी किशोर कुमार यांना आठ ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाले असून, या श्रेणीमधला त्यांचा हा विक्रम अद्याप कोणीच मोडलेला नाही. मध्य प्रदेश सरकारने ‘लता मंगेशकर पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान केला. १३ ऑक्टोबर, १९८७ रोजी हा सुरांचा जादुगार अनंतात विलीन झाला!




@@AUTHORINFO_V1@@