गंभीर नको, तू खंबीर हो!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2020
Total Views |
1_1  H x W: 0 x



दुसर्‍यांच्या मूल्यांचा आणि भावनांचासुद्धा या व्यक्तीला साजेसा आदर असल्यामुळे बाह्य द्वंद्वसुद्धा फारशी होत नाहीत. काही कारणांमुळे अशी बाह्य द्वंद्व झालीच, तर अशा व्यक्ती ते द्वंद्व सोडविण्यासाठी तत्परता दाखवितात. काही व्यक्ती उपजतच खंबीर प्रवृत्तीच्या व स्पष्ट स्वभावाच्या असतात.



मानवी जीवनात सर्वसामान्यपणे आयुष्य निसर्गाच्या अनुभूतीने आणि सांस्कृतिक मार्गदर्शन यांच्या सहयोगाने पुढे जात असते. अनेक गोष्टी आपल्या नकळत घडत जातात. आपण बर्‍याच वेळा आयुष्यातील घडणार्‍या प्रसंगाबद्दल, जुळणार्‍या नात्याबद्दल वा मिळणार्‍या यशापयशाबद्दल खूप काही चर्चा करत नाही. आपल्या जीवनाचा प्रवाह ठरल्यासारखा वाहत जातो. पण, तरीही आयुष्यात अशा काही घटना असतात, जिथे आपल्याला एखादा महत्त्वाचा आयुष्याचा मार्ग बदलणारा निर्णय घेणे गरजेचे असते. या निर्णयात आपल्याला आपल्या तत्त्वासाठी, हक्कांसाठी व जीवनमूल्यांसाठी खंबीरपणे उभे राहावेच लागते. ही वेळ अशी असते की, आपण जर या मोक्याच्या क्षणी आपल्या आत्मिक अस्तित्वाची साथ दिली नाही, तर आपण बेचिराख होतो. आपल्या आयुष्याचा डोलारा पार कोसळतो वा डळमळतो. अशा दोलायमान क्षणी आपण खंबीर असणे आणि खंबीर निर्णय घेणे, हे आपल्याला प्राणवायूइतके गरजेचे असते. आपण आपल्या आयुष्यात लोक काय म्हणतील, या विचारात आपल्या मनाला भिडलेल्या अनेक गोष्टी करायचे टाळतो आणि आयुष्यभर निर्जीव जीवन जगायला लागतो.


आपण आयुष्यात खंबीरपणे जगायचा निर्णय घेतो, तेव्हा खर्‍या अर्थाने तणावरहित व स्वस्थचित्त राहण्याचा निर्णय घेतो. खंबीर असणे हा आपल्या संवादातील गाभा आहे. खंबीरपणे बोलताना वा संवाद साधताना व्यक्ती स्वत:चा मुद्दा परिणामकारक व्यक्त तर करतेच, स्वत:च्या दृष्टिकोनाला ठामपणे व्यक्त करते. शिवाय इतर व्यक्तींच्या विचारांचा आदर करते. स्वत:चा आत्मसन्मान ठेवत, खंबीर व्यक्ती इतरांचा मान ठेवायला हवा हे विसरत नाही. ‘खंबीर संवाद’ हे अधिक प्रभावी असतात. याची अनेक कारणे आहेत. एखादी व्यक्ती जेव्हा खंबीर व्यक्तिमत्त्वाची असते, तेव्हा ती स्वत:ची कदर करत स्वत:च्या मूल्यांचे योग्य जतन करत असते. बाह्य जगाच्या लखलखाटात स्वत:ला जोखत न बसता, स्वत:चे विचार परखडपणे व्यक्त करीत असते. यामुळे त्या व्यक्तीच्या मनात अंतर्गत द्वंद्व होत नाही. भावनिक उद्रेक होत नाही. शिवाय दुसर्‍यांच्या मूल्यांचा आणि भावनांचासुद्धा या व्यक्तीला साजेसा आदर असल्यामुळे बाह्य द्वंद्वसुद्धा फारशी होत नाहीत. काही कारणांमुळे अशी बाह्य द्वंद्व झालीच, तर अशा व्यक्ती ते द्वंद्व सोडविण्यासाठी तत्परता दाखवितात. काही व्यक्ती उपजतच खंबीर प्रवृत्तीच्या व स्पष्ट स्वभावाच्या असतात. पण, जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे खंबीर प्रवृत्ती नसेल, तर ती शिकता येते. तिचा विकास करता येतो. खंबीर शैलीचे काय महत्त्व आहे? व्यक्तीच्या नात्यांमध्ये आणि संवाद कौशल्यात खंबीरपणामुळे एक प्रभावी परिणाम तर दिसतोच, पण शिवाय मुत्सद्देगिरीही दिसून येते. एखाद्या गोष्टीबद्दल व्यक्ती जेव्हा आग्रही असते, तेव्हा ती स्वत:चा योग्य आत्मसन्मान ठेवतेच, पण शिवाय आपले विचार आणि भावनासुद्धा योग्य पद्धतीने व्यक्त करु शकते. त्यांना दुसर्‍यांच्या हक्कांची साजेशी जाणीव तर असतेच, पण शिवाय दुसर्‍याबाबतीत जर काही संघर्ष असतील, तर त्यातून मार्ग काढायचीदेखील त्यांची सकारात्मक तयारी असते. यामुळे लोकांच्या मनात या व्यक्तीबद्दलचा विश्वास व आदर वाढतो.


अर्थात, आग्रही प्रवृत्तीचे लोक सकारात्मक प्रवृत्तीचे असतात. दुराग्रही लोकांसारखे हिंसक वा नकारात्मक नसतात. त्यामुळेच आपला कुठलाही संदेश या व्यक्ती यशस्वी पद्धतीने व्यक्त करतात. कारण, दुसर्‍यांना न पचणारा संदेश जरा दुराग्रहाने म्हणा किंवा निष्क्रियतेने व्यक्त केला, तर लोकांचे लक्ष संदेशापर्यंत पोहोचतच नाही, ज्या धाटणीने तो संदेश व्यक्त केला गेला, तिथेच लोकांचे लक्ष वेधले जाते.

बर्‍याच वेळा आपण अनेक लोकांबरोबर असताना काही मतं स्वीकारतो व नाकारतो. तेव्हा काही लोक सांगतात की, तुम्हा सगळ्यांना जे पटते आहे, त्या बाजूलाच मी उभा आहे. मुळात त्या व्यक्तीला आपला स्वत:चा असा स्वतंत्र मुद्दा मांडायचा नसतो, ज्यायोगे त्यांना इतरांबरोबर विरोध किंवा बेबनाव टाळायचा असतो. साहजिकच लोकांना यातून या व्यक्तीला स्वत:ची मते महत्त्वाची वाटत नसावी, असा संदेश मिळतो; जो लोकांना तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याची मोठी संधी देतो. हे व्यक्तीच्या सामाजिक पातळीवर धोक्याचे आहे. यामुळे त्याची सामाजिक उपेक्षा होऊ शकते. काही लोक दुसर्‍यांना खूश ठेवण्यासाठी किंवा लोकांनी आपला विरोध करु नये म्हणून कायम ‘होय महाराजा’ ही वृत्ती ठेवतात. यात अगदी मोठ्या मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या व्यक्तीही असतात. यात तुमचा मानस काहीही असेल, पण त्यात प्रामाणिकपणा नक्कीच नसतो. जेव्हा एखाद्याला खरे तर ‘नाही’ म्हणायचे आहे, पण ती व्यक्ती ‘होय’ म्हणते, तेव्हा त्या व्यक्तीचे स्वत:बरोबर होणारे मानसिक द्वंद्वही त्रासदायक ठरु शकते.
(क्रमश:)


- डॉ. शुभांगी पारकर



@@AUTHORINFO_V1@@