मुंबई : कोरोनाबाधित डायलिसिस रुग्णांना वेळीच उपचार मिळावे, तसेच नवीन कोरोनाबाधित व संशयित रुग्णांची माहिती ठेवणे यासाठी आयआयटी व मूत्रविकार तज्ज्ञांच्या मदतीने 'प्रोजेक्ट व्हिक्टरी' हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता व कोरोनाबाधित व संशयित रुग्णांची माहिती 'प्रोजेक्ट व्हिक्टरी' या तंत्रज्ञानात समाविष्ट करणे डायलिसिस केंद्रांना बंधनकारक करण्यात आले आहे.
कोरोना महामारीचे संकट सुरुवातीला ओढावले त्यावेळी मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त रुग्णांना सतत डायलिसिस करावे लागत होते. परंतु वेळेत डायलिसिसचा उपचार न मिळाल्याने काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डायलिसिसच्या सुविधा अपुऱ्या असल्याने मृत्यू होण्याचे प्रकार घडत होते. डायलिसिस रुग्णांवर वेळीच उपचार व्हावा यासाठी नायर, सेव्हन हिल्स, जोगेश्वरी येथील बाळासाहेब ट्राॅमा केअर रुग्णालय अशा काही रुग्णालयात डायलिसिस संयंत्राची संख्या वाढवण्यात आली आहे. तरीही डायलिसिस रुग्णांवर अधिक प्रभावी उपचार करता यावे यासाठी मूत्र विकार तज्ज्ञ आणि आयआयटीचे अभियंता यांनी मिळून प्रोजेक्ट व्हिक्टरी' तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
या प्रणालीअंतर्गत डायलिसिस उपचाराची गरज असलेल्या रुग्णांसाठी खाट उपलब्ध करणे, महापालिकेने निर्देशित केलेल्या विशेष स्शरुपाच्या वाहनातून उपचार केंद्रापर्यंत पोहोचवणे या गोष्टींचा या प्रणालीत समावेश करण्यात आला असून डायलिसिस केंद्रांनी या नव्या 'प्रोजेक्ट व्हिक्टरी' द्वारे कोरोना बाधित व संशयीत रुग्णांची माहीती नोंद करण्याचे आदेश डायलिसिस केंद्रांना पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिले आहेत. मुंबई नोंदणीकृत १६८ डायलिसिस केंद्र असून कोरोना बाधित रुग्णांवर डायलिसिस करणाऱ्या केंद्रांची संख्या १७ आहे. तर कोरोना संशयीत डायलिसिस रुग्णांवर उपचार करणाऱ्या डायलिसिस केंद्रांची संख्या २ आहे. कोरोना बाधित व कोरोना संशयीत रुग्णांवर डायलिसिस करणाऱ्या संयंत्राची संख्या १०५ असून यामध्ये पालिकेची ८० व राज्य सरकारची २५ असल्याचे पालिका आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.