अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर, गूगल प्ले स्टोअरचा टिकटॉकला राम राम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2020
Total Views |

Tiktok_1  H x W


बंदीनंतर टिकटॉक सरकारसमोर मांडणार आपली बाजू!

मुंबई : भारतामध्ये काल केंद्र सरकारने ५९ चीनी अ‍ॅप्सवर बंदी जाहीर केल्यानंतर आज अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर आणि गूगल प्ले स्टोअरमधून टिकटॉक हटवण्यात आले आहे. दरम्यान काल जाहीर केलेल्या ५९ अ‍ॅप्सच्या यादी मध्ये ‘Helo’, ‘Likee’ सह TikTok या व्हिडिओ अ‍ॅपचादेखील समावेश आहे. अ‍ॅपल, गूगल अ‍ॅप स्टोअरवरून टिकटॉक हटवल्याची माहिती प्रसिद्ध होताच काही वेळातच टिक टॉक इंडियाकडून देखील आपली बाजू मांडण्यात आली आहे. युजर्सचा डाटा सुरक्षित असून आम्ही काही वेळातच सरकार सोबत चर्चा करणार आहोत. आम्हांला आमची बाजू मांडायला वेळ देण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले आहे.


चीनशी वाढत्या तणावादरम्यान भारत सरकारने सोमवारी रात्री टिकटॉक, यूसी ब्राऊझर आणि शेअरइटसारख्या ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी आणली. सरकार म्हणाले, या अ‍ॅप्सद्वारे युजर्सची माहिती गोळा केली जात आहे. ती राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व व अखंडतेसाठी धोकादायक आहे. यातील टिकटॉक प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरमधून हटवण्यात आले आहेत. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने आयटी अ‍ॅक्ट-२००९ च्या कलम-६९अ अंतर्गत चायनीज अ‍ॅपवर बंदीचा निर्णय घेतला. सरकार म्हणाले, भारत प्रमुख डिजिटल बाजार बनला आहे. भारतीयांच्या डेटा सुरक्षेच्या चिंता वाढत आहेत. चिनी अ‍ॅप देशासाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. अँड्रॉइड व आयओएसवर उपलब्ध या अ‍ॅप्सच्या माध्यमातून युजर्सची डेटा चोरी होते किंवा डेटा चुकीच्या मार्गाने भारताबाहेरील सर्व्हरमध्ये ट्रान्स्फर होतो.


चीनमधील प्रत्येक खासगी कंपनीला सर्व डेटा चीन सरकारला द्यावा लागतो, असा नियमच चीनमध्ये आहे. इतकेच नाही तर परदेशातील एखाद्या कंपनीत चीनी कंपनीची गुंतवणूक असेल तर त्या कंपनीचाही डेटा चीन सरकारला द्यावा लागतो. तज्ज्ञांच्या मते, चीनी गुंतवणूक असलेल्या कंपन्याही भारतातील युजर्सचा खासगी डेटा आणि इतर गोष्टींच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकतात.


टिकटॉकवर गतवर्षीही बंदी आणली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला होता. तेव्हा सुप्रीम कोर्टात टिकटॉकने म्हटले होते की, बंदीमुळे रोज ३.५ कोटी रु.चे नुकसान होत आहे. म्हणजेच वर्षभरात १२०० कोटींपेक्षा जास्त. तेव्हा त्यांचे १२ कोटी युजर होते. आता भारतात त्यांचे ६१ कोटी डाऊनलोड झाले आहेत. जगभरातील ३०% टिकटॉक युजर भारतात आहेत. यावरून त्यांच्या नुकसानीचा अंदाज यावा.





@@AUTHORINFO_V1@@