उद्धव ठाकरेंना आता ‘संजया’ची साथ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2020
Total Views |

sanjiv kumar_1  



राज्यावरील ‘कोरोना’ संकटाचा सामना करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता प्रशासकीय अधिकारी संजय कुमार यांची साथ मिळणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेले संजय कुमार यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...



कौरव आणि पांडव यांच्यात झालेल्या ‘महाभारता’चा रणसंग्राम धृतराष्ट्राला कथन केला तो संजय याने. द्वापारयुगातील हा इतिहास आपल्या सर्वांनाच माहीत आहे. सध्याच्या कलियुगात राज्यासह संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट ओढवले आहे. कोरोना हा रणसंग्राम सुरु असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये सध्या प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाले. या मुद्द्यावरून सत्ताधरी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी विविध अधिकार्‍यांच्या एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी बदल्या होत आहेत, हे ही तितकेच खरे. असोे, हा मुद्दा महत्त्वाचा नाही. महत्त्वाचे म्हणजे, येत्या ३० जून रोजी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे निवृत्त होत असून त्यांच्या जागी संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्य सरकारने तसा निर्णयच घेतला असून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव बहुमताने मंजूरदेखील केला. राज्याच्या मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत संजय कुमार यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकार्‍यांची नावे चर्चेत होती. मुंबई महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळणारे प्रवीणसिंह परदेशी, माजी आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासह बरीच नावे शर्यतीत होती. इतकेच नव्हे तर या कोरोना महामारीच्या संकट काळात विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता यांना तिसर्‍यांदा मुदतवाढ देण्याचा पर्यायही राज्य सरकारपुढे उपलब्ध होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने संजय कुमार यांची या पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.




मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सेवाज्येष्ठतेनुसार संजय कुमार यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा मंत्रालयात आहे. प्रशासकीय सेवेत सर्वात ज्येष्ठ असलेल्या १९८४च्या तुकडीतील संजय कुमार हे सध्या राज्याच्या गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर अनुभवानेही मोठे असणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे संजय कुमार यांच्याकडे राज्याच्या गृह विभागाचाही अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. दीर्घकाळ प्रशासकीय सेवेचा अनुभव असल्यानेच त्यांच्याकडे या दोन महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सोपविण्यात आली. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे येत्या ३० जून रोजी निवृत्त होत असून संजय कुमार हे त्याचदिवशी या पदाचा कार्यभार स्वीकारतील. संजय कुमार हे फेब्रुवारी २०२१मध्ये निवृत्त होणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे एकूण आठ महिन्यांचा कालावधी त्यांच्याकडे असणार आहे. मुख्य सचिव पदावर कार्यरत असताना पुढील आठ महिन्यांच्या त्यांच्या कार्यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. भारतीय नागरी सेवेंतर्गत ‘आयएएस’ अर्थात भारतीय प्रशासकीय अधिकारी पदाची निवड केली जाते. ही नोकरीसाठी सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ‘आयएएस’ अधिकारी भारतीय नोकरशाहीत सर्वात वरच्या स्तरावर असतो. त्या पदाच्या वर केवळ मंत्री असतात. प्रशासकीय सेवेतील सर्वात वरच्या आणि महत्त्वाच्या अशा पदावर संजय कुमार यांची लागलेली वर्णी ही राज्याच्या विकासाच्या दृष्टीने सरकारने उचलेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.




प्रशासकीय अधिकारी होणे हे मूळातच सोपे काम नाही. प्रशासकीय सेवेतील नोकरी मिळविण्यासाठी अनेक कठीण परीक्षांचा सामना करावा लागतो. ‘भारतीय लोकसेवा आयोगा’ची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून समजली जाते. एकूण तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा पार होते. यातील मुलाखतीचा टप्पा हासुद्धा एक कठीण टप्पा मानला जातो. १९८४ सालच्या बॅचमध्ये या सर्व कठीण परीक्षांचा सामना करत संजय कुमार यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. आजतागायत त्यांनी विविध महत्त्वाच्या विभागांत काम केले असून त्यांना अनेक खात्यांमध्ये कामाचा दीर्घकाळ अनुभव आहे. आतापर्यंत प्रत्येक विभागांत त्यांनी यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळल्याचा त्यांचा इतिहास आहे. आपले काम चोखपणे बजावण्यात त्यांचा हातखंडा आहे, असे त्यांच्यासोबत काम करणारे मंत्रालयातील अनेक अधिकारी सांगतात. आतापर्यंत संजय कुमार यांनी आपली भूमिका व्यवस्थितरित्या पार पाडल्यानेच त्यांची या महत्त्वाच्या पदासाठी नेमणूक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. राज्याच्या गृहनिर्माण विभागात मुख्य सचिव पदावर कार्यरत असल्याने मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरातील गेल्या अनेक वर्षांपासूनचा रेंगाळलेला ‘झोपडपट्टी मुक्ती’चा प्रश्नही सोडवण्यास त्यांची मदत होणार आहे. गृहनिर्माण विभागातील गेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित समस्या सोडवण्यास संजय कुमार यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगण्यात येते. अशा कार्यक्षम अधिकार्‍याची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याने महाराष्ट्राच्या विकासाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. येत्या ३०जून रोजी विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे निवृत्त होतील आणि संजय कुमार हे त्यांची जागा घेतील. कुमार यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘ मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा...!


 - रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@