अमेरिकेत पार पडली संयुक्त राष्ट्राची ७५ वी महासभा!
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताची पुन्हा ‘Asia-Pacific Category’ मधून तात्पुरत्या सदस्यपदी निवड करण्यात आली. २०२१-२२ या वर्षभरासाठी ही निवड असणार आहे. दरम्यान भारतासोबतच आयर्लंड, मॅक्सिको आणि नॉर्वे या देशांचीही सुरक्षा परिषदेमध्ये निवड झाली आहे. भारताला १९२ पैकी १८४ मते मिळाली असून भारत आठव्यांदा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये तात्पुरता सदस्य देश बनला आहे. दरम्यान कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटामध्येही पुरेशी खबरदारी घेत अमेरिकेमध्ये संयुक्त राष्ट्राची ७५ वी महासभा पार पडली.
भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांनी भारताला बहुमताने मंजुरी दिल्याने आशिया कालखंडातून भारत बिनविरोध निवडून आला. याबद्दल अमेरिकेकडून जोरदार स्वागत करण्यात आले, तर या गोष्टीमुळे पाकिस्तानच्या पोटात दुखल्याचे पाहायला मिळाले.
भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवडल्याबद्दल अमेरिकेने जोरदार स्वागत केले. “संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या विजयाबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. आम्ही आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रश्नांवर एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत”, असे ट्वीट करुन अमेरिकेने भारताला शुभेच्छा दिल्या.
भारताचे संयुक्त राष्ट्रामधील प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी देखील भारताच्या विजयानंतर आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान भारत नेतृत्त्व कायम ठेवत नव्या दिशेने काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच याप्रसंगी त्यांनी समर्थक देशांचे, सदस्यांचेही आभार मानले आहेत. तर भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचं नेतृत्त्व आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनचे हे यश आहे. कोरोनाच्या काळात त्यांच्या भक्कम नेतृत्त्वामुळे हा विजय सुकर झाल्याची भावना व्यक्त केली.