आता गर्दी बघून गरगरु नका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2020   
Total Views |

unlock_1  H x W


रस्त्यांवर वाहनांची, बसथांब्यांवर प्रवाशांची ही गर्दी बघून आता सरकारने गरगरुन आणि गांगरुनही जाऊ नये. खरं तर सरकारने सरकारी कर्मचार्‍यांसाठी एसटी, बेस्ट, तर खासगी कंपन्यांना कर्मचार्‍यांची ने-आण करण्यासाठी त्यांचीच वाहतूक व्यवस्था बंधनकारक केली असती, तर रस्त्यावर एवढी गर्दी कदाचित उसळलीही नसती. तेव्हा, हा सरकारच्याच नियोजनशून्य कारभाराचा परिणाम म्हणावा लागेल.



सोमवारी महाराष्ट्र पहिल्या टप्प्यात ‘अनलॉक’ झाला. सरकारी, खासगी कार्यालये, दुकाने काही नियमांसह खुली केली गेली. शाळेचा पहिला दिवस तसा कार्यालयाचा पहिला दिवस म्हणून कोरोनाच्या या महामारीतही जवळपास तीन महिन्यांनंतर मुंबईकर जनता अखेरीस घराबाहेर पडली. पहिली ‘लाईफलाईन’ बंद म्हणून दुसर्‍या ‘लाईफलाईन’मध्ये प्रवेशासाठी चाकरमान्यांची ‘लाईन’ लागली. त्यातच एका सीटवर एकच जण बसणार आणि केवळ पाच उभे प्रवासी या नव्या नियमामुळे ‘बेस्ट’ही ‘नॉट सो बेस्ट’चाच अनेकांना अनुभव आला. पहिल्या थांब्यावरच बसं भरल्यामुळे नियम म्हणजे नियम म्हणत वाहक-चालकांनी काही थांबेही सुसाट गाळले. बसथांब्यांवर गर्दी वाढली अन् जेव्हा बस थांबली, तेव्हा प्रवाशांनी नेहमीसारखाच कल्ला केला. ‘गर्दीत कसेही करुन घुसायचेच’ ही मुळात जन्मजात सवय असलेल्या मुंबईकरांना कोरोनाबिरोना, ‘सोशल डिस्टन्सिंग’चा एकाएकी विसर पडला. लगोलग त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले. ‘मुंबईकर किती बेअक्कल, त्यांना आपल्या जीवाची पर्वाच नाही, हे कसले मुंबई स्पिरीट’ वगैरे टीकांचा पाऊस पडला. पण, मुंबई म्हटली की गर्दी ही अपरिहार्यच! त्यात राज्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मुंबई रुळावरही हवी. मग जर मुंबई धावायला हवी, अर्थचक्र फिरायला हवे, तर मुंबईकरांनीही घराबाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाहीच. ज्यांना जमतंय त्यांचे सुरुच आहे की, ‘वर्क फ्रॉम होम.’ पण, आता मुख्यमंत्रीच म्हणतात तसे, “कोरोनासोबत जगायला शिका.” त्यात लोकल बंद म्हटल्यावर मुंबईकर बेस्ट, रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांचा आधार घेणे हे अगदी स्वाभाविक. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची, बसथांब्यांवर प्रवाशांची ही गर्दी बघून आता सरकारने गरगरुन आणि गांगरुनही जाऊ नये. खरं तर सरकारने सरकारी कर्मचार्‍यांसाठी एसटी, बेस्ट, तर खासगी कंपन्यांना कर्मचार्‍यांची ने-आण करण्यासाठी त्यांचीच वाहतूक व्यवस्था बंधनकारक केली असती, तर रस्त्यावर एवढी गर्दी कदाचित उसळलीही नसती. तेव्हा, हा सरकारच्याच नियोजनशून्य कारभाराचा परिणाम म्हणावा लागेल. हे म्हणजे शिरा एकदम गोड हवा, पण त्यात साखर मात्र कमी, असा प्रकार. पण, आजवर हजारो लोकं जेव्हा लोकलच्या गर्दीत रुळांवर पडून मेली, तेव्हा याच राज्यकर्त्यांना ती गर्दी ‘जीवघेणी’ वाटली नाही का? की आता ही गर्दी आपलाही जीव घेऊ शकते, म्हणून एवढी धास्ती वाढली?


‘मुंबई’ तुम्हाला कळलीच नाही!


मुंबईची आजची विदारक अवस्था बघितल्यावर सर्वसामान्य मुंबईकरालाही प्रश्न पडावा की, खरंच ज्या शिवसेनेची मुळं मुंबई इतकी वर्षं घट्ट धरुन आहे, ज्या मातीत खरं तर शिवसेना रुजली, बहरली, त्या शिवसेनेला ‘मुंबई’ खरंच कळली का, असे खेदाने विचारावेसे वाटते. एकेकाळी मराठी माणसाचा मान, महाराष्ट्राची अस्मिता, मुंबईचे संरक्षणकवच म्हणून मुंबईकरांनी डोळे मिटून विश्वास टाकलेली शिवसेना! मात्र, याच मुंबईला, मुंबईकरांना या महामारीतून वाचवण्यासाठी हीच शिवसेना सपशेल अपयशी ठरली आहे. ‘मुंबई’ ही फक्त कोट्यवधींची दाटीवाटीने वसलेली वस्ती नाही, ती एक भावना आहे. इथे जन्मलेल्या, रोजीरोटीसाठी दाखल झालेल्या प्रत्येकाची प्रेरणा अन् आधार आहे मुंबई... पण, आज याच मुंबईने मोठी केलेली, पोसलेली शिवसेना सत्तेच्या सर्वोच्च स्थानी असतानाही, तीच मुंबई कोरोनाच्या महामारीने मात्र निपचित पडली आहे. मजुरांच्या व्यवस्थेचा विषय असो वा पालिकेतील रुग्णालयांची दुरवस्था, गैरव्यवस्थापन, त्याचा सर्वाधिक फटका आज मुंबई सहन करतेय. श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेच्या नाड्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेच्या हातात. तरीही मुंबई विकासात्मक सोयीसुविधांच्या बाबतीत मागेच दिसते. वाहतूककोंडी, खड्डे असो पूरस्थिती की दहशतवादी हल्ल्यांचे मुंबईने आजवर सहन केलेले शेकडो आघात, तरीही मुंबई शिवसेनेच्या पाठीशी वेळोेवेळी भक्क्मपणे उभे राहिली. पण, आज मुंबईला, मुंबईकरांना सत्ताधारी शिवसेनेकडून त्यांच्या जीवरक्षणाची अपेक्षा असताना, हीच शिवसेना हतबल झालेली दिसते. आज मुंबईत कोरोनाच काय, तर कुठलाही छोटामोठा आजारही आसपास फिरकू नये, ही देवाचरणी प्रार्थना प्रत्येक मुंबईकर करतोय. हा तोच मुंबईकर आहे, ज्याने शिवसेनेसाठी एकेकाळी रक्त सांडले, मात्र आज त्याचे रक्त वाहिले तरी उपचारांची इथे शाश्वती नाही! ‘आमची मुंबई’ म्हणून दावा करणार्‍या शिवसेनेला खरंच मुंबईची नस कळली असती तर ‘अनलॉक’नंतर मुंबईच्या रस्त्यारस्त्यांवर अशी झुंबड उडाली नसती. शिवसेनेला मुंबई कळली असती तर बाळासाहेबांचेच नाव असलेल्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णांचा प्राणवायूअभावी असा जीव गेला नसता... मुंबईवरील हे घाव सहजासहजी लवकर भरुन येणारे नाहीत. मुंबईकर २०२० विसरणार नाही. कारण, त्याला मात्र खरी शिवसेना आज कळली आहे!

@@AUTHORINFO_V1@@