‘बॉईज लॉकररूम चटॅ’ ग्रुपशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय
दिल्ली : गुरुग्राम येथील डीएलएफ फेज परिसरातील अपस्केल निवासी संकुलातील एका १४ वर्षीय मुलाने मंगळवारी रात्री आत्महत्या केली. संबंधित मुलाने आपल्या ११ मजल्यावरील राहत्या घरातून रात्री उशिरा उडी घेत आत्महत्या केली. त्यानंतर त्वरित पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांना या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरी हा मुलगा ‘बॉईज लॉकररूम चटॅ’ प्रकरणाशी संबंधित असल्याचा त्यांना संशय आहे. त्यानुसार सध्या पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ‘बॉईज लॉकररूम चटॅ’ हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एका मुलीने या मुलावर शोषणाचा आरोप लावला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाने सुसाईड नोट लिहिली नव्हती, तसेच त्याच्या पालकांनी सांगितल्यानुसार, त्याला इतरही काही त्रास नव्हते. त्याच्या सोशल मीडियावरील प्रोफाईल्स बाबत पोलीस तपास करत आहेत. "आम्ही त्याचा मोबाईल फोन ताब्यात घेतला आहे आणि विश्लेषणासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविला आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि त्याने केलेल्या चॅटिंगच्या स्वरूपाची चौकशी सुरु आहे. त्याने हे पाऊल उचलण्याचे संभाव्य कारण समजून घेण्यासाठी आम्ही सायबर क्राइम सेललाही सामील केले आहे,"असे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, ‘बॉईज लॉकररूम चटॅ’ या ग्रुपवरून व्हायरल झालेल्या चॅट्सचे स्क्रिनशॉट सध्या बरेच चर्चेत आहेत. मुलींच्याबाबाबत अश्लील कमेंट्स, मॉर्फ फोटो, गँगरेप सारख्या विषयावरून आक्षेपार्ह्य गप्पा या स्वरूपात हे चॅट्स आहेत. अवघ्या १५ ते १८ वयोगटातील मुलांचे हे चॅट्स असल्याने त्यावरून आणखीन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणातील एकाला पोलिसांनी काल ताब्यात घेतले असून याही प्रकरणाचा तपास सायबर सेल सोबत मिळून केला जात आहे.