
सुप्रीम कोर्टाचा स्थगितीस नकार; मराठा समाजाला मोठा दिलासा
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षण याचिकाकर्ते आणि मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. आज सुप्रीम कोर्टात यासंदर्भात सुनावणी झाली. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबतची याचिका फेटाळून लावत २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा केला आहे. इतकेच नव्हेतर, मराठा आरक्षणांतर्गत झालेले प्रवेशही रद्द करण्याची याचिका कोर्टाने तूर्तास फेटाळली आहे. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.
वैद्यकीय आणि नोकरी क्षेत्रात आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाज गेल्या कित्येक वर्षापासून लढा देत आहेत. यातच सुप्रीम कोर्टाने केलेल्या सुनावणीने मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणानुसार प्रवेश दिला जाईल. हे सर्व प्रवेश मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णयाच्या अधीन असतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारने शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला आगोदर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आव्हान देण्यात आले होते. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी झाली आहे.