पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्याच्या तपासणीसाठी गेले असता केली दगडफेक
इंदूर : येथील टाटपट्टी बाखलमध्ये बुधवारी कोरोना संक्रमितांचा तपासणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या चमूवर लोकांनी दगडफेक केली. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन पळ काढावा लागला. उपद्रव्यांनी बॅरिकेड्सशी सुद्धा तोडफोड केली. पोलिसांनी या लोकांविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दुपारी १.१५ वाजता टाटपट्टी बाखल येथे घडली. सिलावटपुरा येथे एका कोरोना पॉझिटिव्हच्या मृत्यूनंतर येथील आरोग्य विभागाची टीम सतत स्क्रीनिंग करत असून संशयितांची तपासणी करत आहे. यादरम्यान येथील लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली.
आरोग्य विभागाच्या एका महिलेने पोलिसांना सांगितले की, बुधवारी एक कोरोनाग्रस्त आढळ्याची माहिती मिळाली होती. त्याची तपासणी करण्याकरिता आम्ही तेथे गेलो होते. आमच्या चमूने त्याच्याबद्दल विचारण्यास सुरवात करताच समोरून आलेल्या काही बदमाशांनी दगडफेक सुरू केली. आम्हाला काही कळायच्या आत चेहऱ्यावर रुमाल बांधलेले अनेक लोकांनी हल्ला केला. यातून बचाव करण्यासाठी महिला आणि पुरुष कर्मचारी तसेच डॉक्टर आपल्या वाहनाकडे पळाले. यावेळी आरोग्य विभागाच्या टीमसोबत तहसीलदार असल्याची माहिती आहे. बदमाश दगडफेक करत गल्लीच्या मुख्य रस्त्याकडे पळाले. आरोग्य कर्मचारी कारने थेट पोलिस स्टेशनकडे पळाले.
टाटपट्टी बाखलमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा चमू आला होता. त्यांच्यासोबत जवानही उपस्थित होते. एका वृद्ध महिलेला उपचारासाठी नेण्यात येणार होते. मात्र काही लोकांनी त्यांनी विरोध केला. बॅरिकेड्सची तोडफोड करत दगडफेक केली. यात २ महिला डॉक्टर जखमी झाल्या आहेत. याप्रकाराची पोलिस स्वतंत्रपणे चौकशी करणार आहे. दरम्यान, तबलिगी ए जमात प्रकरणी पोलिसांनी या भागात शोधमोहीम सुरू केली होती, त्यासाठी आलेल्या पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले.