८० टक्के रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा
नवी दिल्ली : देशात कोरोना वाढण्याचे प्रमाण ४० टक्क्यांनी घटले आहे. देशभरात आतापर्यंत १३.६ टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ते ठणठणीत बरे झाले आहेत. तर ८० टक्के कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे होण्याचा मार्गावर आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.
“देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १३,३८७ वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ४३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात २३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात १००७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, “कोरोनामुळे होणारा प्रत्येक मृत्यू चिंतेचा विषय आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचा पराभव करायचा आहे. त्यामुळे वेगाने आम्ही प्रयत्न करत आहोत. देशभरात अँटी बॉडीजवर काम केलं जात आहे. प्लाझ्माच्या माध्यमातून उपचार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत”, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.