भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 'आझाद काश्मीर'बद्दल प्रश्न विचारण्यात आलाय. यावर नागरिकांनी आक्षेप व्यक्त केला. भाजपनेदेखील या प्रश्नांवरून सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवलीय. त्यामुळे परीक्षेतविचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मध्यप्रदेश भाजपचे प्रवक्ते हितेश वाजपेई यांनी ही गोष्ट 'निंदनीय' असल्याचे म्हंटले आहे.
'दिग्दिजय सिंहांसारखे काँग्रेस नेते दीर्घकाळापासून देशविरोधी, प्रो पाकिस्तानी वक्तव्य करत आले आहेत. आता ते सरकारमध्ये आहेत तर असे होणारच. या सरकारला लवकरात लवकर सत्तेतून दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, त्यामुळे अशा गोष्टींना प्रतिबंध घालता येऊ शकेल' असे वाजपेई यांनी सांगितले.
मध्य प्रदेशच्या शिक्षण मंडळाच्या दहावीच्या सामाजिक विज्ञान पेपरमध्ये प्रश्न क्रमांक चार योग्य जोड्या जुळवासाठी 'आझाद काश्मीर'चा पर्याय देण्यात आलाय. तर प्रश्न क्रमांक २६ मध्ये भारताच्या मानचित्रात 'आझाद काश्मीर कुठे आहे?' असा प्रश्न विचारण्यात आलाय. या प्रश्नांवरून सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळापर्यंत चर्चेला सुरूवात झालीय. मध्यप्रदेशातील विरोधी पक्ष भाजपच्या म्हणण्यानुसार, फुटीरतावाद्यांना सुरुवातीपासूनच काँग्रेसची साथ मिळत आली आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या काँग्रेसने नेहमीच त्यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे काँग्रेस सरकार असलेल्या राज्यात असे प्रश्न विचारले जाणे आश्चर्याची गोष्ट नाही.