मुंबई : महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची (सीआयडी) वेबसाइट हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॅकर्सने दिल्लीतील हिंसाचारादरम्यान मुस्लिमांवर हल्ले होत असल्याचा दावा करतानाच, मोदी सरकार आणि पोलीस विभागाला इशारा दिला आहे. हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हॅकर्सकडून केला जात असल्याचे यातून स्पष्ट होते. या प्रकरणाची सीआयडी आणि सायबर सेलकडून चौकशी केली जात आहे. ही वेबसाइट हॅक करणारे कोण आहेत हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, लवकरच हे स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे.
गुगल सर्च इंजिनवर mahacid.gov.in टाकल्यानंतर हॅकर्सचा संदेश दिसत होता. कालपासून वेबसाइट हॅक करण्यात आल्याचे कळते. 'हिंदू जमावाकडून मुस्लिमांच्या हत्या केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांत उसळलेल्या दंगलीत ४५ हून अधिक जण मारले गेले आहेत. त्यात बहुतांश मुस्लीम आहेत. तर किमान दीडशे जखमी झाले आहेत, ' असा संदेश त्यावर दिसतो. तसंच भारत सरकारसाठी एक संदेश दिला असून, त्यात मुस्लिमांवरील हल्ले थांबवा, असा इशारा मोदी सरकार आणि पोलिसांनाही देण्यात आला आहे होता. दरम्यान, सीआयडीची वेबसाइट पूर्ववत सुरू झाली आहे.
अलीकडेच उत्तराखंड पर्यटन विभागाची वेबसाइट हॅक करत दिल्लीतील हिंसाचारात मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्याचा उल्लेख करत भारत सरकारला इशारा दिला होता. मुस्लिमांवर हल्ले केले तर आम्ही गप्प बसणार नाही, असा संदेश ही वेबसाइट उघडल्यावर दिसत होता. भारतातील आणखी वेबसाइट हॅक करू, असाही इशारा दिला होता. त्यानंतर आज महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची वेबसाइट हॅक केल्याचे उघड झाले.