एक आवाज शेतकरी महिलांसाठी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2020   
Total Views |
mansa_1  H x W:




शेतकरी महिलांचे जगणे म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्टच. त्या जगण्याचा संदर्भ घेऊन शेतकरी प्रतिमा मोरे यांनी शेतकरी महिलांसाठी कार्य करायचे ठरवले आणि त्यातून उभा राहिला ‘महिला द्राक्ष बागायत गट संघ...’


नाशिकच्या या द्राक्षनगरीतून अव्वल दर्जाची द्राक्षं परदेशात निर्यात होतात. आपल्या शेतात निर्यातक्षम द्राक्षे पिकवणे हा शेतकर्‍यांचा ध्यास असतो. तो एक मोठा सन्मानच असतो. हा मान नाशिकच्या एका शेतकरी कुटुंबाने मिळवला. शेतीतील ९० टक्के द्राक्ष निर्यात झाली. परदेशात गेली. मोठ्यातल्या मोठ्या असणा विशेष श्रेणीत उत्तीर्ण व्हावी अशी ही गोष्ट. हा सन्मान मिळवला तो एका शेतकरी महिलेने, प्रतिमा वसंतराव मोरे यांनी.


निफाड कारसूळ गावच्या निवृत्ती जाधव आणि शंकुतला जाधव यांना पाच अपत्ये. त्यापैकी एक प्रतिमा. निवृत्ती ग्रामसेवक होते. घरची थोडी शेती. लहानपणापासून प्रतिमा आईसोबत शेती करत. पुढे भाऊ शेतीत राबत असताना खत घालण्याचे कामही त्या करत. लहानवयापासूनच प्रतिमा शेतीकामात अत्यंत पारंगत झाल्या. त्यांनी कलाशाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यातही विशेष श्रेणी मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांना बीएड करून प्राध्यापक व्हायचे होते. पण त्याचवेळी त्यांना शिक्षक असलेल्या वसंतराव मोरेंचे स्थळ सांगून आले. वसंतराव त्यांचे ज्येष्ठ बंधू, हे संघ स्वयंसेवक. त्यामुळे घरात वातावरण अत्यंत चांगलेच. ते दिवस सांगताना प्रतिमा म्हणतात, “एक वर्ष तर असे गेले की सरांना म्हणजे पती वसंतराव यांना एक वर्ष पगार मिळालाच नाही. त्यावेळी शेतीसुद्धा दृष्ट लागल्यासारखी जळून गेली. अतिशय हलाखीचे दिवस. काय करावे?”


त्यावेळी प्रतिमा यांचे वडील म्हणाले, “तुला शेतीकाम येते. तू करू शकतेस. तू प्रयत्न कर आणि तू एम.ए. झालीस म्हणून प्रोफेसरच व्हायला हवे का? शेती करायला पण तितकीच बुद्धी आणि मेहनत लागते. काय अडलं नडलं तर आम्ही आहोत.” पती वसंतरावांनीही प्रतिमा यांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर प्रतिमा यांनी हे आवाहन स्वीकारले. द्राक्षबागेच्या शेतीमध्ये पहिलाच नफा झाला तो दीड लाखांचा. कुटुंबीयसुद्धा प्रतिमांना सहकार्य करत होते. पण त्याचवेळी काही लोक म्हणत, “पाहा बुवा, नवरा मास्तर आहे आणि ही शेतात खपते. हिला काय गरज आहे हे सगळे करण्याची. गपगुमान घरी राहायचं.” काही लोक म्हणत, “हे काम बायकांचं आहे का? शेतीला मदत म्हणून काम करणं वेगळे आणि पुरुषासारखी स्वतंत्र शेतीकाम करणे वेगळे.” कधी कधी पिकाला पाणी घालण्यासाठी त्या विहीरीचं इंजिन लावायच्या आणि घरातली काम करायला लागायच्या. ठराविक वेळात इंजिन बंद करायला बाहेर आल्यावर त्यांना दिसे की, कुणीतरी मुद्दाम मध्येच इंजिन बंद केलेले आहे. जेणेकरून त्यांना परत इंजिन लावावे लागे. शेतीत चोरी होणे वगैरे गोष्टीही घडायच्या, पण प्रतिमा यांनी हार मानली नाही. पतीच्या, वडिलांच्या आणि भावाच्या मार्गदर्शन सहकार्याने त्या आणखी पद्धतशीरपणे शेती करू लागल्या. त्या रेडिओ, दूरदर्शनवर शेतीसंदर्भातले कार्यक्रम पाहत असत-ऐकत असत. शेतीसंदर्भातला अभ्यास करत असत. नवनवे प्रयोग करत असत. त्यामुळे त्यांची शेती दृष्ट लागण्यासारखी पिकली. घरात चार पैसे खेळू लागले. आणखीन शेती करता यावी या उद्देशाने प्रतिमा यांनी वसंतरावांच्या मदतीने माहेरच्या गावी शेतजमीन घेतली.



प्रतिमा सकाळी ५ वाजता उठतात, घरचे मुलांबाळांचे सगळे आवरून ७ वाजेपर्यंत शेतावर जातात. तिथे पोहोचताना वाहनांचा अडसर होऊ नये, म्हणून त्या चारचाकी वाहन चालवायला शिकल्या. चारचाकी का? तर शेतीच्या इतर कामांसाठी गावातून आयाबायांना, मजुरांना न्यावे लागले तर त्यांनाही वाहनातून नेता येईल म्हणून. पुढे त्या ट्रॅक्टर चालवायलाही शिकल्या. शेतीसाठी आवश्यक असलेली सर्व उपकरणे, यंत्रे त्या वापरण्यास शिकल्या. असे दिवसभर शेतीकाम करून मग त्या संध्याकाळी घरी परतत. तेथून मग पुन्हा घरची कामे सुरू होतात. एकदा तर असा प्रसंग घडला की, द्राक्षाच्या हंगामात संपूर्ण द्राक्षे घेऊन एक व्यापारी पळून गेला. सगळी मेहनत, लावलेला पैसा वाया गेला. पण प्रतिमा खचल्या नाहीत. पुन्हा जोमाने शेतीकामाला लागल्या. त्यानंतर भाजप सरकारच्या काळात सरकारने या अशा फसवणुकीवर आळा घालण्यासाठी चांगली उपाययोजना केली.


हे सगळे करत असताना प्रतिमांना वाटे की, शेतकरी महिलांचे जगणे म्हणजे कष्टाचा डोह, जो कधीच खाली होत नाही. तिच्यासाठी काही योजना, सवलती आहेत की नाही? या ध्यासातून त्यांनी शेतकरी महिलांचे एकत्रिकरण सुरू केले. त्यातूनच त्यांनी ‘महिला द्राक्ष बागायत गट संघ’ सुरू केला. आज त्या गटात ७५० महिला शेतकरी आहेत. या संघातर्फे महिलांना शेतीसाठी मदत, मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावरही त्यांना सहकार्य केले जाते. शेतकरी आत्महत्या हा मोठा प्रश्न आहे. शेतकरी आत्महत्या करतो पण त्याच्या कुटुंबांचे काय? यावरही हा संघ काम करतो.


महिला शेतकर्‍याने महिला शेतकर्‍यांसाठी चालवलेला हा संघ नाशिक परिसरात अभिमानाचा विषय झाला आहे. या संघाची दखल समाज आवर्जून घेऊ लागला. काही महिन्यापूर्वी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत नाशिकला आले होते. त्यावेळी शेतकर्‍यांशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. २० शेतकर्‍यांशी ते संवाद साधणार होते. त्यामध्ये प्रतिमा मोरेही होत्या. प्रतिमा यांच्यासाठी हा विशेष क्षण होता. या संवादामध्ये त्यांनी शेतकरी महिलांचे प्रश्न, जगणे मांडले. अर्थात, नुसते असे जगणे मांडून त्या थांबल्या नाहीत तर महिला द्राक्ष बागायत गट संघाच्या माध्यमातून पाच हजार महिला शेतकर्‍यांचे एकत्रिकरण करावे यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. महिला शेतकर्‍यांसाठी काम करणार्‍या प्रतिमा मोरे यांचे काम आज समाजाची गरज आहे. प्रतिमा म्हणतात, “शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. त्याला त्याच्या कुटुंबाचे जगणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी काम करायला हवे. बळीराजा सुखी तर समाज आणि देश सुखी होईल.”


@@AUTHORINFO_V1@@