‘कोरोना’ व्हायरस आणि पोप

    19-Mar-2020   
Total Views | 151


italy_1  H x W:



कोरोनाने इटलीमध्ये कहर माजवला आहे. जग बंदच पडले आहे. एकमेकांच्या जास्त जवळ जाऊ नका, अनावश्यक स्पर्श करू नका, विनाकारण घराबाहेर पडणे आणि लोकांमध्ये मिसळणे टाळा, अशी जागृती सर्वत्र केली जाते. या पार्श्वभूमीवर पोप यांचे म्हणणे की, एकमेकांची गळाभेट घ्या, हे मात्र अजिबात पटणारे नाही.



पॉलो रोड्री
, या पत्रकाराने ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची मुलाखत घेतली आणि ती नुकतीच ‘ला रिपब्लिका’ मध्ये प्रसिद्धही झाली. अर्थात, ही मुलाखत ‘कोरोना’ व्हायरस आणि त्याचा हाहाकार याविषयीच होती. पोप या मुलाखतीमध्ये म्हणतात, “मी ईश्वराला हे संकट दूर करण्यासाठी प्रार्थना केली, परमेश्वर हे संकट तुमच्या हाताने थांबवणार आहे.” अर्थात, पोप आहेत, त्यांनी कोरोना व्हायरसपासून जग मुक्त व्हावे, यासाठी प्रार्थना करणे याला विशेष महत्त्व आहे. जगातील करोडो लोक असे आहेत की, पोप यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांच्यात विश्वास निर्माण झाला असेल. आपल्या धर्मगुरूंनी प्रार्थना केली म्हणजे आता येशू नक्की ऐकणार आणि कोरोना व्हायरस या जगातून हद्दपार होणार, असे ठामपणे मानणारे करोडो लोक जगात आहेत, हे खात्रीने सांगू शकते. अर्थात, जग कितीही पुढे गेले तरी श्रद्धेचा किनारा ओलांडला नाही. या न त्यावर मानवी श्रद्धा कायम असते. अगदी अश्रद्ध माणसाची श्रद्धाही त्याच्या अंधश्रध्दा असतेच की!



असो
, तर पोप यांची प्रार्थना आणि त्यानंतरची मुलाखत सध्या खूप गाजते आहे. कारण, त्यात पोप यांनी कोरोनाच्या हाहाकारामध्ये लोकांनी कसे वागावे, याबद्दल वाच्यता केली आहे. त्यात दया, सहकार्य, स्नेह वगैरे भावना आहेतच. पोप म्हणतात, “या अशा परिस्थितीमध्ये माणसांवर प्रेम करा, एकमेकांची ख्यालीखुशाली विचारा, नाहीच जमले तर फोन करा. इतकेच नव्हे तर कोरोनाबाधित किंवा कोरोनाग्रस्त संशयितांचीही फोनवरून आपुलकीने चौकशी करा. त्यांच्यासाठी नाश्त्याला छानसे पदार्थ बनवा.” इथपर्यंत तर ठीकच आहे. पोप यांचे म्हणणे योग्यच वाटते. पण, या मुलाखतीमध्ये पोप यांनी लोकांना असेही आवाहन केले आहे की, “लोकांची गळाभेट घ्या.” कोरोनाने इटलीमध्ये कहर माजवला आहे. जग बंदच पडले आहे. एकमेकांच्या जास्त जवळ जाऊ नका, अनावश्यक स्पर्श करू नका, विनाकारण घराबाहेर पडणे आणि लोकांमध्ये मिसळणे टाळा, अशी जागृती सर्वत्र केली जाते. या पार्श्वभूमीवर पोप यांचे म्हणणे की, एकमेकांची गळाभेट घ्या, हे मात्र अजिबात पटणारे नाही.



आता कोणी म्हणेल की लोकांवरचे प्रेम
, स्नेह हे माणसाला धैर्य देईल, तर प्रश्न असा आहे की, कोरोना व्हायरसच्या बाबतीत हे सगळे शक्य आहे का? जगभरच्या कोरोनाग्रस्तांबद्दल विचार करून वाटते की, अनावश्यक स्पर्श, संपर्क यामुळे बाधित होणार्‍यांची संख्या यात जास्त आहे. गळाभेट घेतल्याने समोरच्या व्यक्तीला बरेही वाटेल, पण कोरोना व्हायरसचे संक्रमण यामुळे थांबेल का? तर नाही. दुसरीकडे पोप फ्रान्सिस यांनी जगभरच्या पाद्य्रांना आवाहन केले आहे की, तुम्ही थांबू नका, बाहेर पडा, लोकांमध्ये जा, सेवा करा. मात्र, पाद्य्रांना सेवेचे आवाहन करताना पोप स्वत: कुठे आहेत? ते काय करताहेत? लोकांना गळाभेट घेण्यासाठीचा उपदेश करताना पोप काय करीत आहेत? याबद्दल कुतूहल असणे साहजिकच आहे. तर हे असे आवाहन जनतेला आणि पाद्य्रांना करताना पोप स्वत: कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे एकांतवासात आहेत. ते कुणालाही भेटत नाहीत. प्रार्थनाही एकट्याने करतात.लोकांना भेटायचे तर घराच्या खिडकीतून दुरून हात दाखवून आशीर्वाद देतात. थोडक्यात, ‘मिरॅकलचे दूत’ असणारे पोप कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी स्वत: इतकी काळजी घेत आहेत. थोडक्यात, ‘आधी केले मग सांगितले,’ असे इथे होताना दिसत नाही, तर, पोप फक्त आवाहन करत आहेत. हेच चित्र जगभर आहे. सर्व धर्मातील धर्मगुरूंची थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे. मोठ्या धर्मगुरूंचे सोडा, आजाराबिजारावर मात करण्यासाठी गल्लीबोळात प्रार्थना, चमत्कार करणारे, ताविज, गंडेदोरे, विभूती वाटणारे मौलवी, बुवाबाबा कुठेही दिसत नाहीत.



यात एक मात्र समाधान आहे की
, कुणीही बुवाबाबांनी आपल्या भक्तांना आवाहन केले नाही की मेळावे घ्या, सत्संग घ्या. ज्यांना लोक मानतात, ज्यांना लोकांनी धार्मिक नेतृत्व बहाल केले आहे, त्या सर्वांकडे लोकजागृती करण्यासाठी एक विलक्षण ताकद असते. त्या ताकदीचा वापर करण्याची ही वेळ आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही धर्माच्या धर्मगुरूने जबाबदारीने विधाने करायलाच हवीत. त्यामुळेच पोप फ्रान्सिस यांचे कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमध्ये लोकांनी एकमेकांची गळाभेट घ्या, हे म्हणणे अजिबात पटणारे नाही.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121