पुण्यात एटीएस आणि पुणे पोलिसांची संयुक्त कारवाई ; १९ ठिकाणी छापे , संशयित ताब्यात

    09-Oct-2025
Total Views |

पुणे : पुण्यात मध्यरात्री पासून कोंढवा परिसरात महाराष्ट्र एटीएस आणि पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सोसायटीमधून काही संशयित ताब्यात घेतले आहेत. सकाळ पर्यंत चालेल्या कारवाई नंतर दुपारी भोसरी परिसरातून एकाला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्यांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

विद्येचे माहेरघर असणारे पुणे शहर पुन्हा एकदा दहशतवादी कृत्यांमुळे चर्चेत आलं आहे. आज मध्यरात्री पासून सुरु झालेल्या एटीएस आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त सर्च ऑपरेशनमुळे. पुण्यात दहशतवादी लपल्याच्या संशयातून हे ऑपरेशन करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात हे ऑपरेशन राबवण्यात आले आहे. केंद्रीय तपास पथकाचे अधिकारी देखील या ऑपरेशन मध्ये सहभागी असल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यातल्या कोंढवा भागात मध्यरात्री एटीएस आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे सर्च ऑपरेशन राबवले. याप्रकरणामध्ये तब्बल १८ संशयितांना ताब्यात घेण्यासाठी निघालेल्या या संयुक्त पथकाला काही संशयित ताब्यात घेण्यात यश आले आहे. त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पुणे पोलिस व एटीएसची ही कारवाई रात्री उशिरा सुरु झाली. मोठी गुप्तता पाळत ही कारवाई पहाटेपर्यंत सुरु होती. दुपारी भोसरी येथून एकाला अटक करण्यात आली आहे.

गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी पुणे पोलिसांच्या सहाय्याने काही संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. बुधवारी पोलिसांनी सर्व तयारी करून मध्यंतरात्री अचानक कोंढवा भागात पोलीस आले आणि त्यांनी सोसायटीमध्ये शिरून संशयितांना ताब्यात घेतले. सध्या काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे व त्यांची चौकशी सुरु आहे.

महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन सुरू राबवले आहे. या सर्च ऑपरेशनदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या कारवाईमुळे पुण्यासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.कोंढवा परिसरात दहशतवादी संबंधांबद्दल माहिती मिळाल्यानंतर, दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि पुणे पोलिसांनी १९ ठिकाणी छापे टाकले. पुणे पोलिस आणि एटीएसचे जवळपास ३५० कर्मचारी पुण्यातील कोंढवा भागात तैनात करण्यात आले आहेत.

कोंढवा दहशतवादी हॉटस्पॉट

पुण्यात दहशतवादी आढळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दोन वर्षांपूर्वीच पुणे पोलिसांनी बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन जणांना पकडले होते. त्यानंतर देशातील संभाव्य कट उधळला होता. ते दहशतवादीही कोंढव्यात वास्तव्य करत होते. कोंढवा हा परिसर दहशतवाद्यांसाठी लपण्याचे ठिकाण असल्याचे आढळून आले आहे. स्थानिक युवकांना हाताशी धरून लपण्यासाठी मदत मिळवली जाते. रात्रीपासूनच पुण्यातील कोंढवा भागात छावणीचं स्वरूप आलं आहे.