
इंडोनेशियातील मादुरा बेटावर सध्या खसरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रोगामुळे २ हजार, ६०० हून अधिक मुले बाधित झाली असून, किमान २० मुलांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या परिस्थितीच्या नियंत्रणासाठी सरकारने लसीकरण मोहीम राबवायला सुरुवात केली असली, तरी मुस्लीम समाजातील एका मोठ्या वर्गाचा लस घेण्यास विरोध आहे. त्यांच्या मते, या लसींमध्ये जिलेटिन वापरले गेले असून, त्याची निर्मिती डुकरापासून केली गेली आहे. इस्लाममध्ये डुकराचे मांस व त्यापासून बनविलेली कोणतीही वस्तू हराम मानली जाते. त्यामुळे अनेक मुस्लीम लस घेण्यास नकार देत आहेत. अर्थात त्यांना आता लसही हलाल म्हणजेच, इस्लामी कायद्यानुसार तयार झालेली हवी आहे. वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे की, खसराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हाच शाश्वत पर्याय आहे. या रोगाच्या प्रसाराचा वेग अधिक असून, लस हेच त्यावरील प्रभावी शस्त्र आहे.इंडोनेशियामध्ये हा प्रश्न नवीन नाही. २०१८ मध्ये गोवर आणि रुबेला या आजारांचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी सरकारने एम आर लसीकरण मोहीम राबवली होती, पण काही इस्लामी संघटनांनी ती लसही इस्लाममध्ये हराम असल्याचे म्हटले होते.
मादुरा बेटावर काम करणाऱ्या सुननेप पूजियाती वह्युनी नावाच्या परिचारिकेने सांगितले की, मी माझ्या मुलीला ही लस दिली आहे, कारण तिचे आरोग्य माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. पण अनेक कुटुंबे अजूनही लसीकरण टाळत आहेत. लोकांना पटवून देणे हीच आमच्यासमोरची मोठी परीक्षा आहे. आरोग्याच्या हितासाठी लस आवश्यक असल्याचे सांगितल्यावरही धार्मिक शंका लोकांच्या मनातून सहज जात नाहीत.सरकार आणि आरोग्यकर्मी आता मौलवींशी संवाद साधत असून, त्यामुळे तरी नागरिक लसीकरणाला सहकार्य करतील अशी इंडोनेशिया सरकारला आशा आहे. त्यामुळे या लसीकरण मोहिमेचे यश सर्वार्थाने इस्लामिक विद्वान आणि मौलवींवरच अवलंबून आहे.
इस्लाममध्ये ‘शरिया’ कायदा, हलाल-हराम यांसारख्या धार्मिक नियमांचे पालन महत्त्वाचे मानले जाते. या नियमांचा अव्हेर करणार्यांवर धार्मिक बहिष्कार टाकला जातो. कोविडचा प्रादुर्भाव जगभर पसरत होता, तेव्हा भारतातही त्याचा प्रसार वेगाने झाला होता. परिणामी केंद्र सरकारने जमावबंदी केली होती. तरी देखील दिल्लीतील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये हजारो लोकांचा धार्मिक मेळावा भरविण्यात आला. जेव्हा पोलीस व आरोग्य विभागाने कारवाई केली, तेव्हा तेथे दोन हजारांहून अधिक सहभागी असल्याचे समोर आले. यातील अनेकांना पुढे कोविड झाल्याचे वेगळे सांगयाला नकोच.
जगातील प्रत्येक धर्माचे नियम, संस्कार, पूजापद्धती वेगवेगळ्या आहेत. पण जे धर्म काळाप्रमाणे स्वतःमध्ये लवचिकतेने बदल स्वीकारत नाहीत, ते कट्टरतेच्या दिशेने जातात. इंडोनेशियामधील घटनेमागे हीच कट्टरता अधोरेखित होते. धर्म हा उन्नत जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरतो, पण इंडोनेशियातील मुस्लीम समाज धर्मातील नियमांना कवटाळून स्वत:च्याच जीवनाशी खेळत आहे.
इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबिआंतो यांनी अलीकडेच संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८०व्या अधिवेशनात, ‘वस्सलमुअलाइकुम’, ‘शालोम’, ‘नमो बुद्धाय’, ‘ओम शांती’ असे म्हणत भाषणाची समाप्ती केली. इंडोनेशिया मुस्लीम राष्ट्र असूनही तिथं सर्व धर्मांचा आदर राखला जातो, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. परंतु, याच राष्ट्राध्यक्षांना तिथल्या मुस्लिमांची कट्टरता मात्र झाकता येत नाही हे सत्यच आहे.
एकच धर्म, एकच धर्मगुरू आणि एकच धर्मग्रंथ असा भाव ज्याठिकाणी असतो, तिथूनच अनेक समस्यांचा जन्म होतो. यामुळेच कट्टरता, द्वेष आणि हिंसा यांचा उद्रेक होतो. हीच मानसिकता सृजनापेक्षा विद्ध्वंसालाच कारणीभूत ठरते. आजमितीला युरोपमधील अनेक देशातील स्थानिकांना, याच कट्टरतेमुळे मुक्त जीवनशैलीसाठी झगडावे लागत आहे. फ्रान्स, बेल्जियम, डेन्मार्कसारख्या देशांनी सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि हिजाबवर बंदी घातली आहे. युरोपमध्ये धर्म ही खासगी बाब आहे मात्र, मुस्लीम समाजाने ही बंदी धार्मिक स्वातंत्र्यावरचा आघात मानत रस्त्यांवर आंदोलनं करण्यास सुरुवात केली आहे. भारतातही ‘आय लव्ह मोहम्मद’च्या नावाने रस्त्यावर हिंसाचार सुरु झाला आहे. जोपर्यंत काळानुसार बदल स्वीकारून ‘माझे’ नाही ‘आपले’ हा भाव जागृत होणार नाही, तोपर्यंत या समस्या संपणार नाहीत.
चारुदत्त टिळेकर