क्षणभंगुर हे जीवन !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2020
Total Views |


क्षणभंगुर हे जीवन !_1&nbs



विषयांच्या मागे धावता आत्मकल्याणासाठी पूर्ण पुरुषार्थ करणे, हेच मानवाचे कर्तव्य आहे. जीवनाची क्षणभंगुरता आणि आत्म्याची अमरता लक्षात घेऊन आत्मोद्धाराकरिता प्रबल पुरुषार्थ करणे इष्ट आहे.

अश्वत्थे वो निषदनं पर्णे

वो वसतिष्कृता ।

गोभाज इत्किलासथ सत्सनवथ पुरूषम्॥

(ऋग्वेद-10.97.5)



अन्वयार्थ


हे मानवांनो
! (व:) तुम्हा सर्वांची (निषदनम्) जीवनस्थिती ही (अश्वत्थे) उद्यापर्यंतसुद्धा न राहणार्‍या शरीरावर आहे आणि (व:) तुमचे (वसति:) वसती, राहणे हे (पर्णे) गळून पडणार्‍या व हलणार्‍या पानांसमान प्राणांवरती (कृता) केली गेली आहे, असे असतानादेखील तुम्ही (किल) खरोखरच (गोभाज:) इंद्रियांच्या भोगांमध्ये का म्हणून संलग्न, तत्पर आहात? म्हणूनच आता सावध होऊन (पुरुषम्) पूर्ण पुरुष अशा परमेश्वराला (सनवथ) प्राप्त करा.



विवेचन


सदरील मंत्रात दोन गोष्टींवर भर दिला आहे
. एकतर ही की, सारे जग क्षणभंगुर व नाशवंत आहे. इथे कोणत्याही गोष्टीची शाश्वती नाही आणि दुसरी म्हणजे पूर्ण पुरुषार्थाने परमेश्वराची प्राप्ती! या दोन बाबी जीवनात ज्याने आचरल्या म्हणजे तो महान झालाच समजा! संसारचक्राचे सुंदर वर्णन या मंत्रात झाले आहे. हे जग आणि या जगातील सर्व वस्तू नष्ट होणार्‍या आहेत. आत्मा व परमात्मा या चेतन तत्त्वांना सोडले तर बाकी प्रकृतीतत्त्वांपासून बनलेल्या सर्व वस्तू व पदार्थ हे संपणारे आहेत. कशाचीही निश्चिती नाही. आज आम्ही उपभोगतो किंवा ज्यांच्यामध्ये राहतो, फिरतो वगैरे क्रिया करतो, काय ते टिकणारे आहे? म्हणूनच तर याला ‘जगत्’ असे म्हटले आहे. ते सतत गतिमान होत आहे. स्थिर नव्हेच! ‘गच्छति इति जगत्।’ जे नेहमी पुढे-पुढे जात आहे. ‘संसार’ हा या जगाकरिता आलेला दुसरा शब्द. ‘संसरति इति संसार!’ जे सदैव पुढे सरकत आहे. थांबायला तयारच नाही. सततच बदलते आहे! निसर्गातील कोणतेही तत्त्व घ्या. त्यांचे जन्म, स्थिती व लय हे चालूच आहे... अगदी ही पूर्वापार ही प्रक्रिया घडत आली आहे... अशा या परिवर्तनशील जगाकरिता या मंत्रात ‘अ श्व त्थ’ हा शब्द आला आहे.


‘अ+श्व+त्थ’ म्हणजे उद्यापर्यंतसुद्धा ज्यांची स्थिती नाही असा! दीर्घकाळापर्यंत त्याचे थांबणे नाही. सारे काही थोड्याशा कालावधीकरिताच! ‘अश्व’ शब्दाचे बरेच अर्थ होतात! एक तर ‘अ+श्व’ जो उद्यापर्यंत नाही, असा तो क्षणिक! आणि दुसरा म्हणजे ‘घोडा!’ जो नेहमी धावण्यात पटाईत असतो. उद्यापर्यंत थांबायचेच नाही. त्याचबरोबर ‘अश्नाति इति अश्व:।’ म्हणजेच खाण्याच्या बाबतीत घोडा हा सर्वाधिक अग्रभागी आहे. तो चणे खातो आणि धावतो वायुवेगाने! तो स्थिर होण्यास तयारच नाही. म्हणून तो ‘अ+श्व’ आहे. ‘अश्वत्थ’ शब्दाचा तिसरा अर्थ म्हणजे पिंपळवृक्ष! झाडांमध्ये वड व पिंपळ यांसारखे वृक्ष फारच दीर्घकाय, दीर्घायुषी किंवा बलशाली असतात! पण आश्चर्य पाहा... यांचीदेखील शाश्वती नाही. एक ना एक दिवस असे बलाढ्य वृक्षसुद्धा कोसळतातच!


असेच आहे आपल्या शरीर आणि प्राणांचेही
! पिंपळासमान असलेला वृक्षरूपी देह कधी नाहीसा होईल आणि ‘प्राण’रूपी पान कधी गळून पडेल? हे सांगता येत नाही. या जीवनाची काहीही शाश्वती नाही. या जड देहापासून आत्मा आपले संबंध केव्हा तोडून टाकेल? या जगात पाहा... क्षणाक्षणाला इथे जन्मही आहे व मृत्यूही आहे. प्रत्येक स्थूल व सूक्ष्म वस्तूंचा उदय व अस्त होतोच. मानवांसह सर्व लहान-मोठ्या प्राण्यांची जीवननौका मृत्युरूपी सागरात कधी बुडून जाईल याचा नेम नाही. याच संदर्भात हिंदीच्या कवीने याचे समर्पक शब्दात वर्णन केले आहे -

क्या भरोसा जिंदगानी का !

आदमी बुलबुला है पानी का!


अशा या संसारस्थितीचे वर्णन करताना महाभारतात व्यास महर्षी म्हणतात
-


सर्वे क्षयान्ता निचया
: पतनान्ता:

समुच्छृया:।

संयोगा: विप्रयोगान्ता: मरणान्त

हि जीवितम्॥

म्हणजेच या जगात जितका वस्तुसंग्रह आहे, त्या सर्वांचा क्षय होतो. जितकी पर्वत इत्यादी उंच-उंच ठिकाणे आहेत, त्यांचे पतन होणारच! जेवढे संयोग आहेत, त्यांचा वियोग निश्चित आहेच आणि जीवन धारण करणार्‍या सर्व प्राण्यांचा शेवटी मृत्यू हादेखील अवश्य होणारच!



गीतरामायणात
महाराष्ट्र वाल्मिकी’देखील म्हणतात -

जरामरण यातून सुटला

कोण प्राणिजात?

दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात?

वर्धमान तें तें चालू मार्ग रे क्षयाचा,

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा,

दोष ना कुणाचा!

नीतिशास्त्रकारांनी अशा या चंचल जीवनाचे वर्णन करताना म्हटले आहे.

नलिनीदलगतजलमतितरलम्, तद्वज्जीवितमतिशयचपलम्।

विद्धि व्याधिकालग्रस्तम्,

लोकं शोकहतं च समस्तम् ॥

म्हणजेच हे सारे जग कमळाच्या पानावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे चंचल व अस्थिर आहे, तसेच मानवी जीवनदेखील अत्यंत चपल, चंचल आणि दु:ख रोगरूपी सापांनी घेरलेले आहे. म्हणूनच हे सारे जग शोकग्रस्त झालेले आहे, असे समजून मानवाने जगावे. अशी ही जीवनाची अवस्था! मग आम्ही इंद्रियांच्या मागे का धावावे? ‘गोभाज:’ म्हणजेच इंद्रियांना बळी पडलेला! ‘गो’ म्हणजे ‘गाय’देखील अर्थ होतो. पण, या शब्दाचा अर्थ इथे ‘गाय’ न घेता ‘इंद्रिय’ असा घ्यायचा आहे. जशी गाय पिकांकडे उत्कटपणे धाव घेते, थांबता थांबत नाही, तशीच ही इंद्रियेदेखील बाह्य विषयांकडे आकृष्ट होतात आणि आत्म्याच्या उन्नती-अवनतीचा विचार न करता अधोगतीला प्राप्त होतात! म्हणून संतांनी म्हटले आहे-



इंद्रिय जे
-जे म्हणती ।

ते ते मनुष्य आचरती।

ते तरले न चि तरले। विषयसिंधु॥

याकरिता विषयांच्या मागे धावता आत्मकल्याणासाठी पूर्ण पुरुषार्थ करणे, हेच मानवाचे कर्तव्य आहे. जीवनाची क्षणभंगुरता आणि आत्म्याची अमरता लक्षात घेऊन आत्मोद्धाराकरिता प्रबल पुरुषार्थ करणे इष्ट आहे. सांख्यकार कपिल मुनी म्हणतात-‘त्रिविध दु:खात्यन्तनिवृत्तिरत्यन्त पुरुषार्थ:।’ त्रिविध दु:खाच्या निवृत्तीकरिता अत्यधिक प्रयत्न करणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे. मानवी जीवनाच्या या क्षणभंगुरतेचा विचार करून मानवाने अध्यात्ममार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा.


-
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

@@AUTHORINFO_V1@@