ठाणे जिल्ह्यात प्रथमच 'हारिण' पक्ष्याचे दुर्मीळ दर्शन

    12-Mar-2020
Total Views | 876
bird _1  H x W:
 
 

पहिलाच छायाचित्रित पुरावा

 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - डोंबिवली-कल्याण दरम्यान असणाऱ्या मलंग रस्त्याच्या परिसरात 'हारिण' (Pied harrier) या शिकारी पक्ष्याचे दुर्मीळ दर्शन घडले आहे. ठाणे जिल्ह्यात हा पक्षी दिसल्याची ही पहिलीच नोंद असून पहिलाच छायाचित्रित पुरावा आहे. 'हारिण' पक्षी रशिया, चायना आणि उत्तर कोरियामधून हिवाळ्यात स्थलांतर करतो. 
 
 
 
 
डोंबिवली-कल्याण दरम्यानचे काही परिसर या पक्षीनिरीक्षणासाठी प्रसिद्ध आहेत. या परिसरात हौशी आणि अभ्यासक पक्षीनिरीक्षकांचा राबता असतो. सध्या मुंबई महानगर प्रदेशातून स्थलांतरित पक्ष्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत डोंबिवली नजीकच्या मलंग रस्त्यावर 'हारिण' या स्थलांतरित शिकारी पक्ष्याचे दर्शन घडले आहे. पक्षीनिरीक्षक मनिष श्रीकांत केरकर यांना शनिवारी मलंग रस्त्याच्या परिसरात हा पक्षी आढळून आला. पक्ष्यांच्या नोंदणीसाठी आॅनलाईन संकेतस्थळ असणाऱ्या 'इ-बर्ड'नुसार या पक्ष्याचे शेवटचे दर्शन २००९ मध्ये उरणमध्ये झाल्याची माहिती केरकर यांनी दिली. ठाणे जिल्ह्यात हा पक्षी आढळल्याचा छायाचित्रित पुरावा आपल्याकडे नव्हता. त्यामुळे जिल्ह्यात या पक्ष्याचे प्रथमच दर्शन घडल्याचे त्यांनी सांगितले.
 
 

bird _1  H x W: 
 
 
 
मलंग रस्त्याच्या परिसरात शिकारी पक्ष्यांसाठी उत्तम अधिवास आहे. यापू्र्वी या परिसरात शाही गरुड, छोट्या कानाचे घुबड अशा सहजा न दिसणाऱ्या पक्ष्यांचे दर्शन घडले आहे. 'हरिण' हा पक्षी रशिया, चायना आणि उत्तर कोरिया या देशांमध्ये प्रजनन करतो. त्यानंतर हिवाळ्यात तो भारत-पाकिस्तान पासून फिलीपिन्सपर्यंत स्थलांतर करतो. काळ्या आणि चांदेरी रंगाच्या नर 'हारिणा'चे डोके काळ्या रंगाचे असते. पिवळ्या रंगाचे डोळे असतात. तर मादीच्या वरचा भाग पांढऱ्या-तपकिरी रंगाचा आणि खालील भाग हलक्या गुलाबी रंगाचा असतो. हा पक्षी लहान सस्तन प्राणी, उभयचर, सरपटणारे प्राणी आणि किटक खातो.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121