
ही रिक्षा रोजगाराची नवी संधी देणारी आणि प्रदूषणविरहित वाहन असल्याचे प्रतिपादन
मुंबई: इलेक्ट्रिक रिक्षा ही प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक असून बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी देणारी असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे इलेक्ट्रिक रिक्षा चे उदघाटन केल्यानंतर रामदास आठवले पत्रकारांशी बोलत होते.
इलेक्ट्रिक रिक्षा घेण्यासाठी बेरोजगारांना बॅंकांद्वारे कर्ज उपलब्ध व्हावे तसेच महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाद्वारे मागासवर्गीय बेरोजगारांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी बैठकीचे आयोजन रामदास आठवले यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. आजच्या स्पर्धात्मक युगात बेरोजगारांना रोजगार म्हणून इलेक्ट्रिक रिक्षा एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. इलेक्ट्रिक रिक्षा हे प्रदूषणविरहित वाहन आहे. बेरोजगारांना रोजगार म्हणून इलेक्ट्रिक रिक्षा, मालवाहतूक करणारी इलेक्ट्रिक रिक्षा या वाहनांचा लाभ घ्यावा असे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले.
सदर कार्यक्रमाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, नेक्स्टजेन क्लीनटेक सोल्युशन कंपनी चे शंकर कन्नन, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस्थापक गेडाम आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.