बांधकाम व्यावसायिकांची झाडाझडती; वाशीमध्येही कारवाई
नवी दिल्ली : ‘टॉप्स’ समूहाच्या कथित आर्थिक गैरव्यहारप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु केल्याचे ऐकिवात असतानाच प्राप्तिकर विभागानेही (आयटी) पनवेल, वाशीसह सभोवतालच्या विविध भागांत छापेमारी सुरू केल्याचे खळबळजनक वृत्त आहे. आपल्या छापेमारीदरम्यान प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्यांनी काही बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांवर छापेमारी करत झाडाझडती सुरु केली आहे. प्राप्तिकर विभागाने गेल्या काही दिवसांपूर्वी नामवंत बांधकाम व्यावसायिक आणि एन्ट्री ऑपरेटर्स यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये पनवेल भागात छापे घातले.
पनवेल आणि वाशीतील २९ ठिकाणी शोध आणि सर्वेक्षणाची कारवाई करण्यात आली. या समूहावर केलेल्या कारवाईमध्ये फ्लॅट आणि जमिनीच्या विक्रीतून मिळालेली बेहिशोबी उत्पन्नाची तसेच विशिष्ट बनावट कंपन्यांच्या नावाने विनातारण कर्जाची माहिती उघड झाली. छाप्यातील शोध आणि सर्वेक्षण कारवाईदरम्यान या समूहाच्या लेखापरिक्षण पुस्तकांमध्ये ५८ कोटी रुपयांच्या व्याजासह विनातारण कर्जांच्या बनावट नोंदी सापडल्या. तसेच जमीन खरेदी व्यवहारात ५ कोटी रुपयांच्या बेहिशोबी खर्चासह १० कोटी रुपयांच्या बनावट सबकॉन्ट्रॅक्ट खर्चाचे तपशीलही सापडले.
त्याशिवाय या समूहाने मिळवलेल्या ५९ कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाचे पुरावे सापडले. जमिनीच्या खरेदीसाठी दिलेली आगाऊ रक्कम म्हणून हे उत्पन्न दाखवण्यात आले होते. जमिनीच्या खरेदीसाठी पाच कोटी रुपयांची गुंतवणूक त्याचबरोबर ११ कोटी रुपयांची विविध लाभार्थ्यांनी दिलेल्या रकमेची नोंद सापडली. या माहितीची छाननी करण्याचे काम सुरू आहे. त्याशिवाय १३.९३ कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड देखील या छाप्यामध्ये सापडली आणि प्राप्तिकर विभागाकडून ती जप्त करण्यात आली. त्यामुळे या समूहाकडे आतापर्यंत रोख रकमेसह १६३ कोटी रुपयांचे बेहिशोबी उत्पन्न आढळले आहे. सदनिका आणि जमिनींच्या विक्रीसाठी ऑन मनी घेऊन त्याची कागदोपत्री कोणतीही नोंद न ठेवण्याचे पुरावे देखील जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.