भिवंडी : विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी भिवंडी तालुक्यातील १४ गावांमधील शेतकऱ्यांची जमीन जाणार असून, या जमिनीला योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. `एमएसआरडीसी'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांची मंगळवारी भेट घेतल्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांना नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता मिळेल, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी तयारी दर्शविली आहे. मात्र, या जमिनीचा मोबदला देण्याबाबत एकाच गावात गुणांक १ व गुणांक २ ठेवले गेले आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांवर अन्याय होत होता. जमिनीच्या किंमतीत मोठा फरक पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. यापूर्वी भिवंडी तालुक्यात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीही जमीन घेण्यात आली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार भाव देण्यात आला होता. त्यानुसार बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या धर्तीवर विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पातही गुणांक २ नुसार मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी होती.
या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी `एमएसआरडीसी'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांची भेट घेतली. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, उपमहाव्यवस्थापक श्रीमंत पाटोळे उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील १४ गावांमधील शेतकऱ्यांच्या गुणांक २ नुसार जमिनी देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना भिवंडी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता घेऊन गुणांक २ नुसार मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.