मुंबई : बुधवारी आरे कारशेड कांजुरमार्ग येथे हलवण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच धक्का दिला. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे कामकाज तात्काळ थांबविण्याचे निर्देश उच्च न्यायालायने एमएमआरडीएने दिले. यावर आता ठाकरे सरकारवर भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड सुरु केली आहे. "गुडघ्यात मेंदू असलेले सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात", अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या निर्णयावर त्यांनी ट्विट केले की, "मेट्रो कारशेडचा प्रकल्प पुन्हा बारगळणार. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे एमएमआरडीएला निर्देश दिले आहेत. गुडघ्यात मेंदू असलेले सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात. जनतेची विटंबना, वेळेचा अपव्यय, पैशाचा चुराडा आणि अब्रूचे खोबरे हीच महाविकास आघाडी सरकारची खरी कमाई." अशी टीका त्यांनी केली आहे.