पोप फ्रान्सिस आणि इतिहास...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2020   
Total Views |

jp_1  H x W: 0



२०२० सालच्या पूर्वसंध्येला व्हॅटिकन चर्चचे पोप फ्रान्सिस हे तमाम श्रद्धाळूंना आशीर्वाद देत होते. पोप यांच्या आशीर्वादाने आपले भले होईल, आपले दुःख दूर होईल, आपल्या जीवनात आनंदी आनंद येईल, यासाठी गर्दीतला प्रत्येक जण त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी धडपडत होता. अर्थात, श्रद्धेला अंत नसतो. ज्याची त्याची श्रद्धा. पोपही अति सुहास्य वदनाने अत्यंत करुणामयी दृष्टिकोनातून प्रत्येकाला आशीर्वाद देत पुढे जात होते. पोप पुढे जात असताना, गर्दीतल्या एका महिलेने त्यांना आवाज दिला. पोप यांनी तो ऐकला नसावा, कारण त्या महिलेकडे वळून न पाहता ते पुढे चालू लागले. मग ती महिला पोप यांचा हात खेचून त्यांचा आशीर्वाद मागू लागली. यावर दयाळू करुणानिधी पोप यांनी आशीर्वाद स्वरूपात त्या महिलेच्या हातावर जोरदार चापटी मारली. हे कृत्य करताना त्यांच्या चेहर्‍यावरचे सुहास्य, करुणा, दया वगैरे वगैरे भाव लुप्त झाले होते. कुण्याही खुनशी व्यक्तीने आपल्या शत्रूवर हल्ला करावा, तसा त्यांचा आविर्भाव होता.(युट्युबवर व्हिडिओ पाहू शकता) त्यांच्या या कृत्यावर सगळे जग अचंबित आहे. जगातल्या बहुसंख्य लोकांचे म्हणणे आहे की, क्रूसावर चढवल्यानंतरही येशूने म्हणे त्याच्या गुन्हेगारांसाठी माफी मागितली होती. देवाला सांगितले होते की, या गुन्हेगारांना माफ कर. या येशूबापाचे दयाळू आणि पापक्षालनाचे अतिमहत्व पटवतच तर जगभर पाद्री ख्रिस्ती धर्माचा प्रसार करते झाले.


या अशा पार्श्वभूमीवर जागतिक दर्जाच्या ख्रिस्ती धर्मगुरूचे
, पोप फ्रान्सिस यांचे असे निर्दयी वागणे कित्येकांना दुःखी करून गेले. अर्थात, त्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी या कृत्याबद्दल ‘सॉरी’ही म्हटले आहे, बरं. पण प्रत्यक्ष पोप फ्रान्सिस यांचे विचार पाहिले तर वाटते की, पोप फ्रान्सिस यांना या घटनेनंतर काय वाटले असेल? वानगीदाखल आपण त्यांचे विधान पाहू. ते म्हणाले होते, “बायबलमध्ये राजा डेव्हिडने दाखविले की, संतांच्या जीवनातदेखील आमिष आणि पाप असते. तसेच पाद्री, बिशप यांनीसुद्धा पाप स्वीकारायला हवे, मी पण पाप स्वीकारण्यासाठी दोन आठवड्यांनंतर चर्चमध्ये माझे पाप कबूल करतो.”


आता पोप फ्रान्सिस यांनी कबूलच केले आहे की
, संतांच्या जीवनातही आमिष आणि पाप असते. हे एकदा त्यांनी पूर्वीच कबूल केले असेल तर त्या आशीर्वाद मागणार्‍या महिलेला रागाने चापटी मारणे, ही पोप फ्रान्सिस यांच्यासाठी सामान्य क्रियाच असावी. संत हे माया, लोभ, राग, द्वेष वगैरेंच्या पलीकडे गेलेली विभूती असते, अशी आपल्या भारतीय संस्कृतीची धारणा. या पार्श्वभूमीवर पोप, पाद्री आणि बिशपने पापाचा स्वीकार करायलाच हवा, असे जेव्हा पोप फ्रान्सिस म्हणतात, तेव्हा आपल्याला नवल वाटते. पण एकदा का पोपने कबूल केले की, पाप स्वीकारायला हवे की तो दयाळू येशू माफी देणारच, मग पोपला सर्वेसर्वा मानणार्‍या अनुयायाला ‘पाप’ या संकल्पनेबद्दल काय वाटत असेल? कारण, नव्या जगाच्या संकल्पनेत चर्चबाबत अनेक घडामोडी जगासमोर आल्या. पाद्य्रांनी ननवर केलेले अत्याचार, बालकांचे यौन शोषण आणि बरेच काही. त्यामुळे व्यथित होऊन या पोपनी हे उद्गार काढले होते. असो, पण हे काही आताच घडते आहे का? अगदी पोप स्टिफन vi, या पोपच्या अनैतिक कृत्यांनी त्यांची पोपशाही गाजली. तर पोप जॉन xii यांचा खून एका स्त्रीसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करत असताना झाला. या स्त्रीच्या पतीने पोपला आणि पत्नीला रंगेहाथ पकडले आणि त्याने पोपचा खून केला. पोप बेनेडिक्ट ix याने तर आपले पोपपदच विकले.


अर्थात याचा अर्थ सगळीच चर्च संस्था वाईट असे म्हणायचे नाही
. पण तरीसुद्धा गॅलिलिओ आणि इतर अनेक वैज्ञानिकांना उगीचच सजा देणारी चर्चसंस्था, १५व्या शतकापासून आता आतापर्यंत आपल्यापेक्षा वेगळे दिसणार्‍या आणि वागणार्‍या निष्पापांना चेटकीण, चेटके ठरवत जिवंत जाळून मारणारी क्रूर पद्धती हे सगळे पाहिले की वाटते, हे काय आहे? यावर एक घटना चटकन आठवते की, २००५ मध्ये पोप जॉन पॉल द्वितीयचे निधन झाले आणि चर्चमध्ये पियानो वाजवणारे ७८ वर्षांचे प्रोफेसर कार्डिनल योसेफ रात्सिंगर यांना पोप बनवले गेले. त्यावेळी त्यांचे एक वाक्य होते की, “चर्चच्या आत किती पाप (मैल) आहे. अगदी चर्चमधील पाद्रींच्यामध्येही.” हे सगळे सविस्तर लिहिण्याचे कारण म्हणजे कोणताही धर्म जर मानवी जीवनाच्या उद्धारासाठी असेल, तर मग मानवाला पीडित करण्याचे पाप त्या धर्माच्या ठेकेदारांनी करू नये, हीच सर्व पामर श्रद्धाळूंची इच्छा आहे. पोप फ्रान्सिस यांची चापटी खाणार्‍या श्रद्धाळू महिलेचीही हीच इच्छा असावी. आमेन.

@@AUTHORINFO_V1@@