छत्रपतीद्रोही संजय राऊत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020
Total Views |

E_1  H x W: 0 x



सत्तेसाठी पवारांच्या दारात पडून राहणार्‍या पट्टेवाल्याकडून आपल्या मालकाचा लाळघोटेपणा आणि शिवरायांच्या वंशजांचा अपमान होणे साहजिकच. कारण त्यावरच तर संजय राऊत व त्यांच्या सवंगड्यांची रोजीरोटी अवलंबून, ती टिकून राहावी, नेहमीनेहमी मिळावी म्हणूनच लोचटपणा करता करता ते असे बरळले.

 

"उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत," असे विकृतीने बरबटलेले वक्तव्य नुकतेच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना 'जाणता राजा' म्हणून संबोधणार्‍या संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागावेत, यासारखा करंटेपणा कुठलाही असू शकत नाही. अर्थात सत्तेसाठी पवारांच्या दारात पडून राहणार्‍या पट्टेवाल्याकडून आपल्या मालकाचा लाळघोटेपणा आणि शिवरायांच्या वंशजांचा अपमान होणे साहजिकच.

 

कारण, त्यावरच तर संजय राऊत व त्यांच्या सवंगड्यांची रोजीरोटी अवलंबून. ती टिकून राहावी, नेहमीनेहमी मिळावी म्हणूनच लोचटपणा करता करता ते असे बरळले. परंतु, संजय राऊत आज जे बोलले, त्याला एका घाणेरड्या विचारसरणीची पार्श्वभूमीदेखील आहे. राज्यात आजही स्वतःला शुद्ध रक्ताचा, अस्सल वा अन्यांहून वरचढ समजणारा गट प्रत्येक जाती-जातीत, समाजा-समाजात अस्तित्वात आहे. आपल्या जातवेडाच्या कट्टरतेपायी ही मंडळी इतरांना आपल्याहून कमअस्सल मानत आले वा आजही मानतात. त्यांची संख्या भलेही कमी असेल, परंतु त्यांनी आपल्यामागे आपल्यासारखीच मानसिकता असणार्‍यांचा एक जमाव गोळा केलेला आहे.
 

अशा टोळक्याचे प्रतिनिधीत्व आतापर्यंत शरद पवार, जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनेने केले. संजय राऊत परवाच्या कार्यक्रमात जे बेताल बडबडले, त्याचे धागेदोरे थेट इथपर्यंत जाऊन पोहोचतात. अशा परिस्थितीत छत्रपतींचे नाव घेऊन पक्षीय राजकारण करणार्‍या शिवसेना नेत्याची भलतेसलते वक्तव्य करताना जीभ कशी रेटली गेली? 'विशिष्ट समाजाचा पक्ष' म्हणून ज्यांनी आपले राजकारण व सत्ताकारण चालवले, त्यांच्या तोंडचे शब्द संजय राऊत यांनी ओढून घेतले का? तसेच उदयनराजे भोसलेंना शिवाजी महाराजांच्या वंशोद्भवाचे पुरावे मागणारे नेमके कोण, राऊत की दुसरा कोणी बोलविता धनी? आणि जे जातद्वेषाचे हीणकस राजकारण इतरांनी केले, तेच शिवसेनाही पुढे नेणार का? जातीयवादी मानसिकतेचे नेतृत्व करण्याची खुमखुमी आता शिवसेनेतही निर्माण झाली का? असे अनेक प्रश्नही उपस्थित होतात. तरीही वस्तुस्थिती काहीही असो, संजय राऊत यांनी आपल्या विधानातून बहुसंख्यांच्या मनातून गाडले गेलेले उच्च-नीचतेचे भूत पुन्हा एकदा जागे करण्याचे काम पद्धतशीरपणे केल्याचे दिसते.

 

शिवाजी महाराजांनी दिल्लीश्वर म्लेंच्छांशी लढताना अठरापगड जातीत विभागलेल्या हिंदू समाजाला एकीच्या धाग्यात गुंफण्याचे महनीय कार्य केले. जो हिंदू समाज शेकडो वर्षांत मुसलमानी राजवटीविरोधात संघटितपणे उभा ठाकला नाही, त्या समाजाला हाती समशेर घेऊन अन्याय-अत्याचाराविरोधात झगडण्याचे बळ छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. असंख्य हिंदूंच्या अस्तित्वाचा आधार झालेल्या शिवरायांवर श्रद्धा ठेवणारे आज महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या कानाकोपर्‍यात कोट्यवधी लोक भेटतील. तशीच निष्ठा शिवाजी महाराजांच्या सातारा व कोल्हापूरच्या गादीवर ठेवणारा अफाट जनसमुदायही इथे विद्यमान आहे. म्हणूनच संजय राऊत यांनी केलेले 'वंशावळीचे पुरावे आणा' हे विधान केवळ उदयनराजेच नव्हे, तर हिंदूंच्या उत्थानाला कारणीभूत ठरणार्‍या शिवाजीराजांवरच प्रश्नचिन्ह लावणारे ठरते.

 

परिणामी, संजय राऊत यांचे वक्तव्य छत्रपती वा भोसले घराणेच नव्हे, तर हिंदूद्रोही असल्याचेही स्पष्ट होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या घरी पाणी भरता भरता संजय राऊत व शिवसेनेने हिंदूविरोधाचेच धोरण पत्करल्याचे या सगळ्या प्रकारातून दिसते. सत्तेच्या मस्तवालपणातून सध्या उदयनराजे भोसलेंबद्दल बरळणारे राऊत उद्या कोल्हापूरची गादी वा बडोद्याच्या गादीच्या वंशजांकडेही 'पुरावे दाखवा'ची मागणी करू शकतात. कारण, कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याची वाईट खोड लागली की, तसल्याच धुंदीत मोकाट तोंड उघडावेसे वाटत राहते. त्यामुळेच संजय राऊत वा ते आता ज्यांच्या पायाशी लोटांगणे घालतात, त्यांच्याकडून अशाप्रकारची विधाने पुढेही येत राहतील. परंतु, राऊत असोत वा शिवसेना दोघांनाही याची किंमत मोजावीच लागेल, त्यापासून त्यांची सुटका नाही. 'औकातीत राहिले की, इज्जत मिळते; अन्यथा थोबाड रंगवले जाते,' अशा आशयाची उक्ती बर्‍याचदा वापरली जाते. त्याचीच प्रचिती आता उंटाचा मुका घेण्याचा प्रयत्न करणार्‍या बोरुबहाद्दर की चपटीबहाद्दर संजय राऊत यांनादेखील येईल!

 

दरम्यान, संजय राऊत उदयनराजे व भोसले घराण्याबद्दल बोलले, त्याची बातमी लगोलग मुख्य प्रवाहातील सगळ्याच माध्यमांनी उचलली. खरे म्हणजे राऊतांसारख्या डोक्यात वारे गेलेल्या व्यक्तीच्या विधानाला किती महत्त्व द्यायचे, याचा विचार माध्यमांनीही करायला हवा होता. परंतु, तसे न होता संजय राऊत यांच्या थिल्लर वक्तव्यावर माध्यमांतून चर्चा रंगवल्या गेल्या, वेबसाईट्स आणि अ‍ॅपवरून ते पसरवले गेले नि ते दुसर्‍या दिवशीचा मथळाही झाले. मराठी वृत्तसृष्टीचे अधःपतन झाल्याचा याहून निराळा नमुना तो कोणता असू शकेल, असा प्रश्न पडतो. कारण राज्यासमोर आजही कितीतरी प्रश्न प्रलंबित आहेत.
 

शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या, कामगारांच्या, स्त्रियांच्या, बालकांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या, पीडितांच्या अडी-अडचणी व समस्यांवर उत्तरे शोधणे गरजेचे आहे. परंतु, मुख्य प्रवाहातील माध्यमांनी त्यावर प्रकाशझोत टाकण्याचे सोडून दिल्याचे वा बाजूला सारल्याचे दिसते. मराठीतील जवळपास सर्वच माध्यमे संजय राऊत आज काय बोलतात, यावर टीआरपी मिळवण्याच्या आशेने टपून बसलेली असल्याचे पाहायला मिळते. माध्यमांची ही अवस्था त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहणार्‍यांसाठी नक्कीच आश्वासक नाही. दुसरीकडे माध्यमे नेतृत्व तयार करतात वा त्यांनी नेतृत्व तयार केल्याची उदाहरणेही आहेत. पण, ते नेतृत्व टिकले किती काळ, याचाही विचार इथे केला पाहिजे. कारण, माध्यमांतून तयार झालेले नेतृत्व क्रांती जशी आपल्याच पिल्लांना खाते, तशी माध्यमेच खाऊन टाकतात. अशा माध्यमांनी मोठ्या केलेल्या वा गाजवलेल्यांत राज ठाकरेंचे नाव प्रामुख्याने घ्यायला हवे.

 

'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नावाच्या पक्षाची स्थापना करणार्‍या, विकासाची ब्ल्यू प्रिंट हातात घेऊन फिरणार्‍या राज ठाकरेंच्या इंजिनाला पळवण्याचे काम माध्यमांनी बरेचदा केले. नंतर मात्र राज ठाकरेंची स्थिती काय झाली, याच्याशी आपण सारेच परिचित आहोत. आता तर राज ठाकरे मुंबई सोडून महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात वा गावात यदाकदाचित गेलेच तर त्या ठिकाणचा लहानसा पत्रकारही 'तुमच्या ब्ल्यू प्रिंटचे काय झाले?' असा विचारताना दिसतो. पण, त्या पत्रकाराच्या प्रश्नावर बोलण्यासारखी परिस्थिती नसल्याने राज ठाकरे निरुत्तर झाल्याचेच पाहायला मिळते.

 

आज माध्यमांना राज ठाकरेंप्रमाणेच संजय राऊत यांच्याकडूनही दाखवण्यासाठी कसला ना कसला मीठ-मसाला मिळत आहे, पण त्यातून राऊतांच्या नेतृत्वाची खिचडी कितपत शिजेल? कारण पुण्यातल्याच कार्यक्रमात फुशारक्या मारता मारता संजय राऊत इंदिरा गांधींचे कारनामेही सांगू लागले. मात्र, माध्यम प्रतिनिधींसमोर वटवट करणार्‍या राऊतांवर दिल्लीच्या आदेशासमोर कुर्निसात करण्याचीच वेळ आली. दाऊदला दम दिल्याचे ठोकून देणार्‍यांचा दम सोनिया मॅडमनी काढला नि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाच्या भेटी-गाठीवरून संजय राऊत यांना शरणागती पत्करावी लागली. अर्थात पत्रकारांसमोर बोलघेवडेपणा करणार्‍या राऊतांच्या माघारीची ही केवळ सुरुवात आहे, असे निरुत्तर होण्याचे प्रसंग त्यांच्यापुढे अजूनही येतीलच. कारण, आता 'हायकमांड' 'मातोश्री'वर नव्हे, तर '१०, जनपथ'वर आहे.



@@AUTHORINFO_V1@@