नवी दिल्ली : माजी केंद्रीय कायदामंत्री आणि ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे रविवारी प्रदीर्घ आजाराने दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पुत्र आणि प्रसिद्ध वकील महेश जेठमलानी आणि मुलगी असा परिवार आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. या आजारपणातच त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी सकाळी त्यांनी आपल्या राहत्या घरात अंतिम श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहीली. भारतातील सर्वात जास्त फी आकारणारे वकील अशी त्यांची ओळख होती.
जेठमलानी यांचा जन्म सिंध प्रांतातील (सध्या पाकिस्तानमध्ये) शिकारपूर येथे १४ सप्टेंबर, १९२३ साली झाला. १३ व्या वर्षी त्यांनी मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण केली होती. ते वयाच्या १८ व्या वर्षी वकील बनले. वकीलीचे धडे त्यांना घरातूनच मिळाले होते. जेठमलानी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी बचाव पक्षाचे वकील म्हणून मद्रास उच्च न्यायालयात काम पाहिले होते. बहुचर्चित शेअर बाजार घोटाळाप्रकरणी हर्षद मेहता याचीही बाजू त्यांनी लढवली होती. यासोबतच सहाव्या आणि सातव्या लोकसभेत ते भाजपच्या तिकिटावर मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय कायदामंत्री आणि नगरविकास विभागाचे मंत्रिपदही भूषविले होते.