उसातील 'बिबट्या'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2019
Total Views |




 

‘बिबट्या’ परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी असल्याने त्याने आपल्या वर्तनामध्ये परिस्थितीनुरूप बदल करुन घेतला आहे. शहरी अधिवासाबरोबरच उसाच्या क्षेत्रात गूढावस्थेत ‘बिबट्या’ पोसतोय. उद्यापासून सुरू होणार्‍या ’वन्यजीव सप्ताहा’च्या निमित्ताने उसाच्या शेतात अधिवास करणाऱ्या बिबट्यांविषयीच्या काही समजुती आणि गैरसमजुतींचा डाॅ. अजय देशमुख यांनी केलेला उलगडा.....

 
बिबट्या जंगलातून उसाच्या किंवा चहाच्या मळ्यात कसा ?

बिबट्या हा पूर्वीपासूनच जंगल व मानवी वस्ती यामधील दुवा धरून राहणारा प्राणी आहे. या प्राण्याचा इतिहास पाहिला, तर हा प्राणी मनुष्यवस्ती व जंगल दोघांच्या सीमारेषेवर अधिवास करत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे आपल्याला हा प्राणी आपल्या क्षेत्रात आल्यासारखा वाटतो. मुळात आपण केलेल्या जंगलतोडीमुळे व आपल्याकडून हरितपट्ट्यांमध्ये झालेल्या हस्तक्षेपामुळे आपणच त्याच्या क्षेत्रात एका अर्थी घुसखोरी केली आहे. जंगल नष्ट होऊन मानवाने शेती व घरे बांधण्यास सुरुवात केली. त्यातच उसाचे पीक हे दाट व भरगच्च असते. तसेच हे पीक एक ते दीड वर्ष राहत असल्याने बिबट्याने उसातच राहणे पसंत केले. राहण्याचा प्रश्न सुटला आणि शेताला पाणी सोडले जात असल्याने पाण्याचाही प्रश्न मार्गी लागला. शिवाय उसाच्या शेताबाहेर पडल्यावर त्याच शेतकर्‍यांची शेळी, मेंढी, कुत्रा इ. प्राणी खाद्य म्हणून मिळाले. याच कारणामुळे हा बिबट्या आता आपल्या क्षेत्रात नांदतोय.

 
 

 
 
 

बिबट्याचे खाद्य

बिबट्याच्या आहारामध्ये छोट्या प्राण्यांपासून ते मोठ्या प्राण्यांपर्यंत समावेश आहे. जसे की, लहान खेकडा ते सांबरापर्यंत. शहरी अधिवासाच्या नजीक राहणारे बिबटे जंगलांमधील खाद्यांसोबतच मानवी वस्ती जवळ आढळणारे कुत्रे, मांजर आणि उंदीर यांचीही शिकार करतात. याचा अर्थ जंगलातील खाद्य संपुष्टात आल्यामुळे त्यांच्या खाद्यात बदल झाला, असे मुळीच नाही. कुत्रे आणि मांजर यांची शिकार करणे हरिण किंवा सांबराची शिकार करण्यापेक्षा सोपी असते. त्यास अधिक मेहनत करावी लागत नाही. त्यामुळे बिबट्यांनी लोकवस्तीनजीक आढळणार्‍या प्राण्यांचाही आपल्या आहारात समावेश केला आहे.

 
 

बिबट्या आपल्या घराकडे किंवा वस्तीकडे का येतो ? त्याला परावृत्त करण्यासाठी काय करावे ?

बिबट्या मानवी वस्तीकडे वर नमूद केल्याप्रमाणेच सहज खाद्याच्या शोधार्थ येतो. यामध्ये कुत्री-मांजरांपासून शेळ्या-मेढ्यांचा समावेश आहे. त्यामुळे बिबट्या आपल्या घराकडे येण्यापासून मज्जाव करण्याकरिता आपणच काही उपाययोजना आखणे आवश्यक आहेत. यामध्ये पाळीव प्राण्यांसाठी बंदिस्त गोठा किंवा पिंजरा तयार करावा. जेणेकरुन त्याला भक्ष सहजपणे मिळणार नाही. असे केल्यास बिबट्याला तुम्ही केलेल्या या कृतीची जाणीव होते. त्याला खाद्य मिळणे बंद झाल्याने काही दिवसांमध्ये तो घराकडे येणे बंद करतो.

 
 

 
 
 
 
 बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात काम करताना किंवा वावरताना घेण्याची दक्षता

  • बिबट्या वावर क्षेत्रात वावरताना हातात घुंगराची काठी, टॉर्च आणि मोबाईल किंवा रेडिओवर मोठ्या आवाजात गाणी वाजवावीत. जेणेकरून बिबट्याला तुम्ही येण्याची चाहूल लागेल व त्याचा मार्ग बदलून जाईल. यातून संघर्ष होणार नाही. 
  • बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात उन्हाळ्यात घराबाहेर, उघड्यावर किंवा अंगणात झोपू नये. (पांघरुणावरून जाळीचे बंदिस्त कुंपण घालणे योग्य)
  • बिबट्या वावर क्षेत्रात उघड्यावर शौचास जाऊ नये. शौचालयाचा वापर करावा.
  • उसाची लागवड करताना ऊस हा घराला अगदी खेटून लावू नये. घर ते ऊस हे अंतर कमीत कमी 50 ते 100 फूट असावे.
  • बिबट्याच्या वावर क्षेत्रात लहान मुलांवर विशेष लक्ष द्यावे. मुलाला एकटे अंगणात किंवा बाहेर सोडू नये. मुलांसोबत कोणीतरी नेहमी असावे.
  • घरासमोरील अंगणाला चारीही बाजूने बंदिस्त जाळीचे कुंपण घालावे. त्यामुळे मुलांना खेळता येईल.
  • बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रातील घराच्या अवती भोवती वाढलेले गवत व इतर झुडुपे कापावीत. त्यामुळे बिबट्याला वाढलेल्या गवतामध्ये लपून राहण्यास वाव मिळणार नाही.
  • परिसर स्वच्छ ठेवावा. घाणीवर कुत्रे, डुकरे, उंदीर, घुशी, इत्यादी प्राणी येतात व त्यामागे त्यांना खाण्यासाठी बिबट्या येतो.
  • लहान मुलांनी शाळेत ये-जा करताना समूहाने राहावे. तसेच गाणी किंवा मोठ्याने बडबड करत जावे.
  • बिबट्या वावरत असलेल्या घराच्या आजूबाजूस दिवे असावे.
  • बिबट्या दिसल्यास पाठलाग करू नये. त्वरित वन विभागाला कळवावे. पाठलाग केल्यास तो परत फिरून हल्ला करू शकतो.
  • शेतीची कामे करताना खाली बसून करावी लागतात. बिबट्या बर्‍याच वेळा खाली बसलेल्या माणसांवर हल्ला करतो. त्यामुळे शेतीची कामे करताना विशेष काळजी घ्यावी.
  • बिबट्या संदर्भात अफवा किंवा चुकीच्या बातम्या पसरवू नका.
  • बिबट्या वावर क्षेत्रात येणारे मेंढपाळ आणि ऊसतोडणी कामगार यांनीसुद्धा विशेष दक्षता घ्यावी.
 
 

 

बिबट्याचे जीवशास्त्र

बिबट्या हा मांजरकुळातील प्राणी आहे. तो निशाचर म्हणजेच रात्रीला जास्तीत जास्त सतर्क राहणारा, रात्री बाहेर पडून शिकार करणारा प्राणी आहे. मादी बिबट्याच्या गर्भधारणेचा काळ 90 ते 105 दिवसांचा आहे. मादी बिबट्या एका वेळेला एक ते चार पिल्लांना जन्म देते. यांचा जीवनकाळ 15 ते 17 वर्षांचा असतो. दुधाचे दात 26 आणि पक्के दात 30 असतात. या प्राण्याची पूर्णत: वाढ तीन वयोमर्यादेपर्यंत होते. जन्मास आल्यानंतर पिल्लू साधारण 9 ते 11 दिवसानंतर डोळे उघडते. 45 ते 60 दिवसापर्यंत रांगण्यास सुरुवात करते व नंतर चालायला लागते. आईच्या दुधावर ही पिल्ले साधारण 80 ते 90 दिवसांपर्यंत अवलंबून असतात. त्यानंतर ते खाद्य (मांस) खाण्यास सुरुवात करतात. त्यांच्या अंगावर पोकळ ठिपके असतात त्याला ’रोस्टेस् पॅटर्न’ म्हणतात. प्रत्येक वैयक्तिक बिबट्यामध्ये हे ठिपके वेगवेगळ्या आकाराचे असतात. बिबट्याला पुढील पायाला प्रत्येकी पाच, तर मागील पायाला चार अशी मिळून एकूण 18 नखे असतात.

 

 
 
 

 

बिबट्याविषयीच्या अंधश्रद्धा

या प्राण्याविषयी लोकांच्या मनात बर्‍याच अंधश्रद्धा आहेत. त्याची नखे, लघवी आणि चामडे या सर्व गोष्टींना धरून अनेक अयोग्य बाबी घडतात. परंतु, ही सर्व भोंदूबाबांची भोंदूगिरी आहेत. फक्त लोकांना लुबडण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अशा भोंदूबाबांना बळी पडू नये.

 
 

लोकवस्तीनजीक आढळणार्‍या बिबट्याला पकडून लांब सोडणे, हा उपाय नाही का ?

बिबट्याला पकडून त्याला कुठेतरी लांब सोडणे हा उपाय असता, तर तोच उपाय शासनाने केला असता. परंतु, हा काही उपाय नाही. बिबट्याला एका जागेवरून पकडून दुसर्‍या ठिकाणी सोडल्यास जिथे सोडणार तिकडे उलटपक्षी संघर्ष वाढतो. जिथून पकडले त्याची जागा दुसरा बिबट्या घेतो. आपल्या भागात आढळणार्या बिबट्याने एकाअर्थी आपल्याशी मैत्री केलेली असते. त्याला आपल्याबद्दल सर्व काही माहीत असते. भक्ष्य कुठे मिळते, कुठे पाणी आहे, कोणत्या जागी लपायचे इत्यादी. एवढेच काय तर त्याला शेतकर्‍याच्या जाण्या-येण्याच्या वेळांच्या माहितीचीही जाण असते. आपल्याला जाणणारा, ओळखणारा बिबट्या आपण पकडला, तर त्याची जागा घेणार्‍या बिबट्या आपल्या भागाबद्दल व आपल्या बदल अनोळखी असतो. त्यामुळे संघर्ष कमी होण्यापेक्षा तो अधिक वाढतो. त्यामुळे त्याला पकडून दुसर्‍या जागी सोडणे, हा उपाय होऊ शकत नाही.

 
 

 
 
 

बिबट्याच्या इतर स्वभाव व सवयी

बिबट्या उत्तमरित्या झाडावर चढू शकतो. तसेच या प्राण्याला पोहणेसुद्धा चांगले जमते. पाळीव मांजराप्रमाणेच लोळणे, अंग घासणे, लपून बसणे इ. त्याच्या सवयी असतात. हा प्राणी परिस्थितीशी खूप जुळवून घेणारा आहे. त्यामुळेच तो मानवासोबत इतक्या सहजगत्या सहजीवन करतो. तो घाबरट प्राणी आहे. ऐकायला अजब वाटत असेल. परंतु, तो घाबरट नसता तर रोज एक मानवी हल्ला झाला असता.

 
 

 
 
 

बिबट्या आपत्कालीन परिस्थितीत अडकल्यास काय करावे ?

हा प्राणी आपत्कालीन परिस्थितीत अडकण्याच्या घटनेत हल्ली वाढ झाली आहे. यामध्ये बिबट्या विहिरीत पडणे, चुकून घरात अडकणे, फाश्यात अडकणे, कोंबड्याच्या खुराड्यात अडकणे अशा घटना घडतात. अशावेळी लोकांनी गर्दी, गोंधळ करू नये. बघ्यांच्या गर्दीला त्या ठिकाणापासून दूर करावे. त्वरित वन विभागाला आणि पोलीस यंत्रणेला कळवावे. अतिउत्साह किंवा विनाकारण धाडस दाखवू नये.

 

ऊस तोडताना बिबट्याची पिल्ले सापडल्यास काय करावे ?

ऊस तोडताना बिबट्याचे पिल्लू आढळून आल्यास त्वरित त्याची माहिती वन विभागाला द्यावी. विभागाचे कर्मचारी ती पिल्लं त्याच ठिकाणी परत ठेवतील. असे केल्याने त्या मादी बिबट्याला आपली पिल्ले मिळतील व ती चिडून हल्ले करणार नाही. यामुळे संघर्ष कमी होईल.

 

 
 
 
 
मानव- बिबट्या संघर्ष कमी करण्याच्या उपाययोजना

मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे. बिबट्या वावर क्षेत्रात जाऊन शाळा, विद्यालये, महाविद्यालये, ग्रामपंचायती, बचत गट इ. लोकांना काय करावे व काय करू नये याबद्दल सूचना द्याव्यात. तसेच रस्त्यावर, चौकात जनजागृतीपर फलके लावावेत. त्यासंदर्भातील माहितीपट दाखवून घरोघरी खबरदारीचे परिपत्रके वाटावीत. बिबट्यासोबत सहजीवन जगणे हे कटू सत्य आहे. त्यामुळे काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. ती काळजी घेणे आपली जबाबदारी आहे.

 
 

माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात किती बिबटे आहेत व त्यांची काळजी कशी घेतली जाते ?

माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रा’त सद्यस्थितीत 32 बिबटे आहेत. काही कारणास्तव जे बिबटे पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाऊ शकत नाहीत असेच बिबटे या ठिकाणी आहेत. केंद्रामध्ये जखमी किंवा आजारी बिबट्या दाखल झाल्यास त्याच्यावर उपचार करून परत सोडले जाते. या केंद्रात एका बिबट्याला वावरण्याकरिता जवळपास 250 चौ.फूट एवढी जागा देण्यात आली आहे. एका बिबट्याला तीन किलोपर्यंत मांसाहार देण्यात येतो. तसेच जंतनिवरण व लसीकरण केले जाते. त्यांच्या दैनंदिन हालचालीवर लक्ष ठेवण्यात येते. पिंजर्‍यात नैसर्गिक वातावरण तयार करून त्यांच्या नैसर्गिक सवयी कायम ठेवण्याची व्यवस्था केली जाते.

 

(लेखक जुन्नर येथील ’माणिडोह बिबट्या निवारा केंद्रा’त पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)




@@AUTHORINFO_V1@@