१६ वर्षानंतर 'यांच्या' आयुष्यावर बोलायचं राहूनच गेलं आणि म्हणूनच....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2019   
Total Views |


'आयुष्यावर बोलू काही' असं म्हणता म्हणता आयुष्याची १६ वर्ष कधी सरली ते कळलंच नाही. आपल्या आयुष्याच्या सुरुवातीपासून म्हणजे अगदी बालपणापासून सुरू होणारा हा प्रवास कधी संपूच नये, असं वाटेल अशी ही गाण्याची आणि कवितांची मैफल म्हणजे सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा 'आयुष्यावर बोलू काही' हा कार्यक्रम. काही वेळा आपण आपल्या रोजच्या कामांमध्ये इतके गढून जातो की, आयुष्याची बेरीज-वजाबाकी करायचं राहूनच जाते. अशावेळी ही कविता आणि गाण्यांची मैफल आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देऊन जाते. गेली १६ वर्ष संदीप खरे आणि सलील कुलकर्णी 'आयुष्यावर बोलू काही' हा कार्यक्रम यशस्वीपणे सादर करत आहेत. मात्र 'त्यांच्या' आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी, त्यांच्या 'आयुष्यावर बोलू काही' च्या संपूर्ण प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी महाMTB आणि 'मुंबई तरुण भारत'ने त्यांच्याशी संवा साधला.

- 'आयुष्यावर बोलू काही' कार्यक्रमाला नुकतीच १६ वर्ष पूर्ण झाली. पण या कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली? आणि या प्रवासाविषयी काय सांगा? (सलील कुलकर्णी आणि संदीप खरे)

सलील कुलकर्णी : 'तरीही वसंत फुलताना' या कार्यक्रमादरम्यान २००० साली माझी आणि संदीप खरेची भेट झाली. त्यावेळी त्याचेदेखील 'दिवस असे की' या कार्यक्रमाचे प्रयोग सुरू होते. हळूहळू एकमेकांची ओळख झाली आणि त्यानंतर काही काळ एकत्र काम केल्यानंतर आपलं ट्युनिंग जमतंय, हे आम्हा दोघांच्या लक्षात आलं. त्यातूनच मग सहज म्हणून एक कार्यक्रम एकत्र करून पाहायचा का ? असा विचार आमच्या मनात आला आणि २००३ साली 'आयुष्यावर बोलू काही' कार्यक्रमाला सुरुवात झाली. आम्ही दोघांनी एकमेकांचं काम हा कार्यक्रम करण्यापूर्वीही पाहिलं होतं, त्यामुळे आम्हाला एकमेकांविषयी आदर होता, तितकाच विश्वासही. त्या विश्वासाच्या बळावर आजपर्यंत आम्ही १६०० प्रयोग केले.

संदीप खरे : खरं तर 'आयुष्यावर बोलू काही' हा कार्यक्रम १६ वर्ष काय, पण पुढचा कार्यक्रमसुद्धा आम्ही करू का, हे आम्हाला माहीत नव्हतं. पहिला कार्यक्रम आम्ही अतिशय प्रायोगिक तत्त्वावर केला. तेव्हा दुसरा कार्यक्रम करू की नाही, याविषयी विचारच केला नव्हता. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होणं म्हणजे आमच्यासाठी एक सरप्राईज होतं. पण, या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतके वर्ष रसिकांशी थेट संवाद साधता आला, हा आमच्यासाठी एक खूप चांगला अनुभव होता.


 

- २००३ साली कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर 'आयुष्यावर बोलू काही' ची टीम कशी वाढत गेली ? (सलील कुलकर्णी)

कार्यक्रमाचं कवितेसारखंच सगळं जुळून यावं लागतं. जेव्हा कार्यक्रमाला सुरुवात केली, तेव्हा असं काहीच मनात नव्हतं की इतके प्रयोग करायचे. त्यामुळे माझ्या कार्यक्रमांचं ध्वनिसंयोजन करणाऱ्यांनाच आम्ही विचारायचं ठरवलं. कलाकारांविषयी सांगायचं झालं तर हृषिकेश रानडे नुकताच माझ्या कार्यक्रमांमध्ये गायला लागला होता आणि त्याचा तबला वाजवणारा मित्र म्हणून आदित्य आठल्ये माहीत होता, त्याला विचारल्यावर त्याने कार्यक्रमासाठी तयारी दर्शवली. अशी सगळी जुळवाजुळव केल्यानंतर झालेल्या पहिल्याच कार्यक्रमाला आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तो कार्यक्रम हाऊसफुल झाला. त्या पहिल्याच कार्यक्रमाची आमची सरळ साधी पद्धत प्रेक्षकांना भावली. त्यानंतरसुद्धा कोणतीही गोष्ट आम्ही मुद्दाम घडवून आणली नाही किंवा ठरवून केली नाही. मग आजकालच्या ट्रेंडसारखे आम्ही कुठेही फोटो टाकले नाहीत ना प्रमाणाबाहेर प्रसिद्धी केली. त्यामुळे "बाप रखुमा देवीवरु सहज नेटू झाला" या ज्ञानेश्वरांच्या उक्तीनुसार सगळ्या गोष्टी अशा सहज जुळून आल्या आणि हा कार्यक्रम सुरू झाला.

- गेल्या १६ वर्षात कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला, कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव झाला. त्याविषयी काय सांगाल ? (संदीप खरे)

असे अनेक क्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या आयुष्यात आले. एकप्रकारे प्रेक्षकांनी आमच्या गाण्यांच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात सामावून घेतलं. जेव्हा कार्यक्रम सुरू केला, तेव्हा जी कॉलेजमधली मुलं कार्यक्रमाला यायची, ते आता आईवडील झालेत आणि आपल्या आईवडिलांबरोबर लहानपणी येणारी मुलं आता कॉलेजमध्ये गेली आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाबरोबर अक्षरशः एक पिढी मोठी झाली, असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच हा कार्यक्रम त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनला, ही एक जपून ठेवण्यासारखी आणि कृतज्ञ राहण्यासारखी गोष्टं आहे, असं वाटतं.

- कविता करताना त्या कवितेला चाल लावायची की कवितावाचन करायचं, हे कसं ठरवलं जायचं ? आणि जेव्हा कोरा कागद समोर येतो तेव्हा गोंधळायला होतं की एवढ्या वर्षाच्या अनुभवामुळे असं होत नाही? (संदीप खरे)

'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमामध्ये ज्या कविता आहेत, त्यातील काही कवितांना मी चाली दिल्या, काहींना सलीलने दिल्या. काही वेळा तर कविता आणि चाल एकत्रसुद्धा सुचली. त्यामुळे असं कधी ठरवून केलं नाही की या कवितेला चाल द्यायची, ही कविता गद्यामध्येच ठेवायची आणि कोऱ्या कागदाविषयी बोलायचं झाल्यास, लिहावंसं वाटल्याशिवाय मी पेपर हातातच घेत नाही. कारण ४ थीत असल्यापासून मी कविता करायचो पण तेव्हा असं कधी मनात नव्हतं की, यामध्ये करिअर करायचं किंवा प्रसिद्धी मिळवायची आहे. कविता करणं हा खरं तर एक खूप व्यक्तिगत विषय आहे, कारण कविता लिहिणं ही कवीची गरज असते. त्यामुळे ती करताना मनात काही उद्देश नसतो. त्यात सादरीकरणाच्या कविता आणि वाचायच्या कविता यामध्ये फरक असतो, हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आधीच असे ठरवले जात नाही.

 


-
काही गाणी अशी असतात, जी थोड्या काळानंतर विस्मृतीत जातात. पण १६ वर्ष होऊनही 'आयुष्यावर बोलू काही' मधील गाणी तितकीच फ्रेश वाटतात आणि तोंडवर खिळून आहेत याचं काय कारण असावं असं वाटतं ? (
सलील कुलकर्णी)

'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमाप्रमाणेच यातील गाणीसुद्धा आम्ही ठरवून केली नाही. जी गाणी ओघाने मला आणि संदीपला सुचली, जी भावली, ती गाणी आम्ही कार्यक्रमात गायला सुरुवात केली आणि म्हणूनच ती गाणी जास्त काळ टिकली. त्यामुळे गाणं चांगलं करायचं म्हटलं की, गाणं हिट होऊ शकतं. मग त्या दरम्यान एका चित्रपटासाठी संगीत दिलं, त्यातून 'राणी माझ्या मळ्यामंदी' हे गाणं आलं आणि अशीच गाणी सातत्याने कार्यक्रमात अॅड होत गेली. गाणं पोहोचणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी शब्द समजून गाणं गायलं तरच ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतं.

- 'आयुष्यावर बोलू काही' कार्यक्रम देशातच नाही तर देशाबाहेरसुद्धा लोकप्रिय झाला. त्यामुळे बाहेरच्या देशातील प्रेक्षकांचा अनुभव कसा होता ? (सलील कुलकर्णी)

कार्यक्रम लंडनमध्ये असो किंवा मँचेस्टरमध्ये, प्रेक्षकांचा सहभाग तेवढाच असतो, तितकंच प्रेम ते कार्यक्रमावर आणि कलाकारांवर करतात. सध्याच्या काळात याचं एक कारण म्हणजे युट्युबसुद्धा असू शकतं, ज्या कारणाने गाणी जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. भारताप्रमाणेच परदेशातील प्रेक्षकांनासुद्धा 'आयुष्यावर बोलू काही' मधली गाणी पाठ आहेत आणि ते त्यातील गाण्यांची फर्माईशसुद्धा करतात. त्यामुळे खरं सांगायचं तर एकदा थिएटरचा दरवाजा बंद झाला की मँचेस्टर काय किंवा पुणे काय, प्रेक्षकांचा उत्साह तेवढाच असतो.

- आयुष्यावर बोलू काही, स्टोरीटेल, इर्शाद अशा मनोरंजनाच्या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांसमोर आला आहात. यापैकी तुम्हाला भावलेलं माध्यम कोणतं? (संदीप खरे)

कलेच्या माध्यमातून मला व्यक्त होणं आवडतं, मग तो कोणताही प्लॅटफॉर्म असू दे. कारण प्रत्येक माध्यमाची एक वेगळी मजा आहे. अगदी शाळेत असल्यापासून गोष्टी वाचून दाखवणं, हा माझा आवडीचा विषय, आत्तासुद्धा माझ्या मुलीला मी गोष्टी वाचून दाखवत असतो. त्यामुळे गेल्या काही वर्षात मी वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये जयवंत दळवी यांची कादंबरी वाचली, 'माझा प्रवास' तसंच 'मी आणि माझा आवाज' हा जितेंद्र जोशीबरोबर एक प्रोजेक्ट केला. 'इर्षाद'चे सुद्धा भारतातच नाही त बाहेरच्या देशांमध्येसुद्धा अनेक कार्यक्रम केले. तर भविष्यात ना. धों. ताम्हनकर यांची गोट्या नावाची कादंबरी वाचण्याचा तसंच दासबोधदेखील करण्याचा विचार आहे.

- 'वेडिंगचा शिनेमा' नंतर पुन्हा चित्रपट करण्याचा प्लॅन आहे का ? (सलील कुलकर्णी)

'वेडिंगचा शिनेमा' ने मला हा आत्मविश्वास दिला की, माझ्या मनातली गोष्ट प्रेक्षकांना आवडत आहे. निखळ विनोद हे माझ्या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे, जे माझ्या यापुढील चित्रपटांमध्येसुद्धा असेल. चित्रपटासाठी काही कथा माझ्या डोक्यात आहेत. त्यामुळे आयुष्यावर बोलू काही आणि 'बाकीबाब आणि मी' बरोबरच भविष्यात चित्रपट तर सुरूच राहतील, कारण चित्रपट हा मला आवडलेला आणखी एक प्लॅटफॉर्म आहे.

- आजकालच्या तरुण पिढीला एक कवी म्हणून काय सल्ला द्यावासा वाटतो ? (संदीप खरे)

कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असलात, तरी वाचन हे खूप महत्त्वाचं आहे. वाचनामुळे समृद्ध व्हायला होतं, लिखाणात प्रगल्भता येते, चांगलं आणि वाईटात पारख करण्यासाठी वाचनाची मदत होऊ शकते, विचार करण्याची शक्ती येते. वाचनाबरोबरच खूप ऐकलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. नवीन काहीतरी करण्यासाठी आपल्या क्षेत्रात जुनं काय काय झालं आहे, हे आपल्याला माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक कलाकाराची एक व्यक्तिगत ओळख असते. त्यामुळे स्वतःचं स्वतः लिहीत राहणं महत्त्वाचं आहेच, पण त्या लिखाणातला प्रामाणिकपणा, आपण जे लिहीत आहोत त्यातून मिळणारं समाधान हे देखील तितकंच महत्त्वाचं. म्हणून कलेच्या प्रत्येक प्रकारामध्ये आपण आपल्यालाच शोधायचं असतं आणि जर एखाद्या वेळी नाही जमलं तर अपयश स्वीकारून नव्याने सुरुवात करायची असते.

 
@@AUTHORINFO_V1@@