‘वायु’ चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर धडकणार

    11-Jun-2019
Total Views | 83




नवी दिल्ली : अरबी समुद्रात घोंघावत असलेले वायुचक्रीवादळ उत्तरेकडे ताशी १५ किलोमीटर वेगाने सरकत असून येत्या गुरुवारी सकाळी गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता, भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, जुनागढ, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यांच्या सखल भागात १ ते दीड किलोमीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

सौराष्ट्र आणि कच्छ परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ताशी ११० ते १३५ किमी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. तसेच या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात ताशी ७० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, या काळात समुद्र खवळलेला राहील त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.

 

अमित शाह यांनी घेतली आढावा बैठक

 

वायुचक्रीवादळामुळे उद्‌भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्य आणि केंद्रीय मंत्रालये/संस्थांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी तसेच वीज, दूरसंचार, आरोग्य, पेयजल यासारख्या आवश्यक सेवा पुरवण्यासाठी शक्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. तसेच २४ तास नियंत्रण कक्ष सुरु ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121