गाईच्या हृदयाच्या झडपांनी धावणारा मॅरेथॉन प्रशिक्षक

    20-Apr-2019
Total Views | 44



वयाच्या ५३व्या वर्षी ५७ मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केलेल्या शिकागोच्या मार्क बसियाकचे वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या ४०व्या वर्षी त्याचे हृदय निकामी झाले. त्यानंतर शस्त्रक्रियेच्या माध्यमातून त्याच्या हृदयात गाईच्या हृदयाच्या झडपा बसविण्यात आल्या. त्यामुळे त्याच्या हृदयाची क्षमता वाढली. आज तो दररोज दहा किमी पळतो. शिवाय त्याला रक्तदानाचीही आवड आहे. त्याने आजपर्यंत सहा गॅलन म्हणजे २० लीटर रक्तदान केले आहे. वैद्यकशास्त्रात येणारा काळ हा ‘स्टेम सेल’ संशोधनाचा आहे. त्यादृष्टीने वरील घटना महत्त्वाची ठरणार आहे.


मनुष्य आणि गाय या संबंधात सध्या अमेरिकेतीलबोस्टनच्या मॅरेथॉन ट्रॅक’वर एक नवा अध्याय या आठवड्यात दिसून आला. तो म्हणजे हृदयात गाईच्या हृदयाच्या झडपा मानवी हृदयाला शस्त्रक्रियेच्या माध्यमातून बसवून ते हृदय गतिमान केलेल्या मार्क बसियाक या क्रीडापटूने या आठवड्यात ४२ किमी अंतराची ‘बोस्टन मॅरेथॉन’ पूर्ण केली. आत्तापर्यंत २० लीटर रक्तदान केल्याचाही विक्रम त्याच्या नावावर आहे. स्वत: मॅरेथॉन प्रशिक्षक आणि रक्तदान मोहिमेचा प्रचारक असलेल्या शिकागो येथे राहणार्या मार्क बसियाक या ५३ वर्षे वयाच्या माणसाच्या आयुष्यात १३ वर्षांपूर्वी एक गंभीर घटना घडली. यापुढे हृदय नीट काम करणार नाही, असे त्याच्या डॉक्टरनी सांगितले आणि यापुढे जीवंत असेपर्यंत रक्तदान आणि मॅरेथॉन हे दोन्हीही विसरा, असा सल्लाही दिला. काही दिवस तसेच गेल्यावर एका सर्जन डॉक्टरनी त्याला सल्ला दिला की, गाईचे हृदय हे भक्कम असते. जर गाईच्या हृदयाच्या झडपा बसवून घेतल्यास तुमचे हृदय वाचू शकते. त्याचबरोबर मॅरेथॉन आणि रक्तदान हे छंदही थोड्या प्रमाणात चालू ठेवता येऊ शकतात. या सल्ल्याच्या आधारे बसियाकने ओपनहॉर्ट सर्जरी करून गाईच्या हृदयातील झडपा स्वत:च्या हृदयात बसवून घेतल्या.

 

गाईच्या हृदयातील झडपांच्या आधारे मार्क बसियाक हा आता पूर्वीप्रमाणे मॅरेथॉन प्रशिक्षण करू लागला. हळूहळू त्याच्या असे लक्षात आले की, त्याची क्षमता वाढत आहे म्हणून त्याने मॅरेथॉनपटूंना मैदानावर आणि प्रत्यक्ष पळून शिकवण्यास आरंभ केला. त्याच्या पुढच्याच वर्षी त्याने मॅरेथॉनमध्ये पुन्हा भाग घेतला. अर्थात, मुलांना मॅरेथॉन शिकवणे म्हणजे दररोज १० ते १५ किमी पळणे आलेच. आत्तापर्यंत त्याने त्याच्या देशातील आणि परदेशातील मिळून ५७ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्याच्या प्रशिक्षणातून हजारो मॅरेथॉनपटू तयार झाले आहेत. गाईच्या हृदयाच्या झडपांमुळे त्याच्या अजून एका उपक्रमाला चालना मिळाली, ती म्हणजे रक्तदान. गेल्या २० वर्षांत त्याने सहा गॅलन सुमारे २० लीटर रक्तदान केले आहे. या घटनेतील ‘मॅरेथॉन न्यूज’ निश्चितच स्फूर्तिदायक आहे. पण, गाईच्या हृदयाचा झडपा बसविल्या आणि दररोज दहा किमी पळणार्‍या धावपटूच्या हृदयाशी तो अतिशय एकजीव होऊन तेवढाच कृतिशील आहे, ती त्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट. गाईचे रक्त, फुप्फुस, हृदय असे महत्त्वाचे अवयव माणसाला बसविण्याचे प्रयत्न यापूर्वी अनेकवेळा यशस्वी झाले आहेत. पण, अजूनही ते प्रयोग हे स्थानिक संस्था किंवा स्थानिक विद्यापीठांपुरतेच मर्यादित मानले जाते. ‘इंटरनॅशनल मेडिकल कौन्सिल’ने त्याचा स्वीकार करून त्याच्या आधारे जगाला अनुकरणीय असा काही विषय तयार होतो आहे, असे नाही. पण, ओपन हार्ट सर्जरी केलेला खेळाडू दररोज १० ते १५ किमी पळतो आणि प्रत्येक मॅरेथॉनमध्ये भाग घेतो, हे निश्चितच जगातील मेडिकल विश्वाला त्याची दखल घ्यायला लावणारे आहे. यावेळच्या मॅरेथॉनलाइंटरनॅशनल मेडिकल कौन्सिल’चे प्रतिनिधी हजर होते. त्यांची प्रतिक्रिया काय व निष्कर्ष काय हे कळण्यास अजून वेळ लागेल.

 

गाईचा माणसाच्या आरोग्याला उपयोग होतो, ही बाब भारतात अजिबात नवी नाही. आयुर्वेदात गोमूत्र आणि पंचगव्य याचा वापर पदोपदी होतो. त्याचप्रमाणे फक्त गाईचेच पदार्थ म्हणजे म्हणजे दूध, तूप, शेण आणि गोमूत्र यांच्या पदार्थाच्या आधारे मानवीजीवनातील सर्व आजार हाताळणारी स्वतंत्र उपचार पद्धती तयार झाली आहे. त्या पद्धतीने कर्करोग, मूत्रपिंडविकार, रक्तदोष हे बरे करण्याचा विक्रम केला आहे असे म्हटले, तर अतिशयोक्ती ठरु नये. गो पदार्थांचा जेवढा उपयोग शरीरोपचार म्हणून होतो आहे, तेवढाच शेण आणि गोमूत्र यांचा उपयोग शेतीतील समस्या सोडविण्यासाठी होत आहे. त्यावर सध्या गावंच्या गावं उभी राहत आहेत. या पार्श्वभूमीवरही मार्क बसियाकबाबतचा प्रयोग महत्त्वाचा आहे. कारण, येणारा काळ हा स्टेमसेलवरील संशोधनाचा आहे. कोणताही माणूस किंवा प्राणी जन्माला येत असताना बालकाची बेंबी ते आईचे हृदय यांना जोडणार्‍या कॉर्डला ‘प्लॅसेंटा’ म्हणतात. मोठ्या सुपारीच्या आकाराची ती गाठ असते. त्यात त्या त्या प्राण्याला पुढील २०० वर्षे जगायला पुरणारे असे ‘स्टेम सेल्स’ असतात. यावर सध्या जगात संशोधन सुरू आहे. साहजिकच अशा ‘स्टेम सेल’चे प्रमाण हृदयात असते. गाईच्या हृदयातील झडपांवर माणसाची क्षमता वाढल्याचे उदाहरण पुढे येत असेल, तर यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. या विषयाचा सध्याच्या काळात अधिक उपयोग होण्याची शक्यता आहे. कारण, भारतात नव्याने स्थापन झालेल्या ‘कामधेनु आयोगा’ने गाईवरील संशोधनाला नवी दिशा दिली आहे. अवघ्या दहा किलो शेणाच्या आधारे ‘अमृतपाणी’ करून एक एकर शेती होते, हा महाराष्ट्रात सर्वत्र यशस्वी झालेला सिद्धांत आहे. त्याचबरोबर ही नवी दिशा प्रत्यक्षात आली, तर गाय ही मानवी जीवनात अजून प्रभावी भूमिका बजावण्याची शक्यता निर्माण होईल.

 

- मोरेश्वर जोशी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121