तुम्ही मोदीप्रेमी आहात का? मग 'हे' नक्की वाचा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2019   
Total Views |


 


निवडणूक आयोगाने नुकताच लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ज्या लोकांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने पुन्हा एकदा या देशाचा राज्यकारभार चालवावा असे वाटते ते सर्व मोदींच्या समर्थनार्थ व्यक्तिगत बोलण्यातून, प्रसिद्धीमाध्यमांतून व समाजमाध्यमांतून व्यक्त होताना दिसतात. माझे अनेक नातलग, मित्रमंडळी व दूरस्थ ओळखीचे असे सर्वच नरेंद्र मोदी यांचे समर्थन करताना मी पाहिले आहेत आणि वाचले आहेत. व्यक्तिश: मीदेखील नरेंद्र मोदी हेच २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधानपदी आरूढ व्हावेत, या मताचा आहे. मोदींच्या समर्थनार्थ लिहिताना काही अनुभवाने लक्षात आलेले मुद्दे खाली मांडत आहे. ही यादी वाढूही शकते पण, लगेच लक्षात आलेले महत्त्वाचे मुद्दे लिहीत आहे.

 

1. ही निवडणूक आपल्यासाठी अमूक एक पक्ष/ सरकार नको अशा २०१४ सारख्या स्वरूपाची नसून हेच सरकार हवेअशी मांडणी करणारी निवडणूक आहे, याचे भान सर्वात पहिल्यांदा मनात ठेवले पाहिजे.

 

2. त्यामुळेच संभाव्य विरोधी राजकीय पक्षांच्या विरोधात लिहीत बसण्यापेक्षा मोदी सरकारच्या आपल्याला पटलेल्या विशेष गोष्टी, निर्णय, कामगिरी (achievements) याबद्दल लिहिणे अधिक परिणामकारक ठरते.

 

3. सर्वसाधारणपणे भाजपचे समर्थक हे हिंदुत्ववादी वा हिंदू-हिताबद्दल आग्रही असायचे आणि असतातही. पण अशीही संख्या आहे आणि ती लक्षणीय आहे, जे त्या अर्थाने हिंदुत्ववादी नसूनही नरेंद्र मोदी यांचे समर्थक आहेत, याचेही भान ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे तर मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल लिहिणे अधिक समयोचित ठरेल.

 

4. समाजमाध्यमांवर लिहिणाऱ्या लोकांमध्ये बरेच प्रकार आहेत. आक्रस्ताळी मांडणी करणारे, जातीय लेखन करणारे असेही लोक आहेत. असे लोक काहीवेळा वरकरणी मोदींच्या/सरकारच्या बाजूने वाटावे असे लेखन करतात पण, मांडणी करण्याची पद्धत आक्षेपार्ह शब्द असणारी, अपशब्द असणारी असते, ते टाळावे. आक्षेपार्ह फोटो/चित्रफिती शेअर करणे टाळावे.

 

5. रेल्वे, वीज, सार्वजनिक बांधकाम, दळण-वळण, विदेश नीती, संरक्षण, Direct Beneficiary Transfer वगैरे विषयांत मोदी सरकारचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे, त्याची विशेष दाखल घेत मांडणी करावी.

 

6. जरी मोदी व त्यांचे सरकार हे भाजपचे सरकार असले तरी, आपण भाजपचे प्रवक्ते नाही हे लक्षात ठेवावे. म्हणजे आजच्या परिस्थितीत मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार हेच माझ्या मते योग्य पर्याय आहे,’ या मुद्द्यावर मांडणी करत राहावी. अडवाणी यांना वा अजून कोणाला का संधी दिली नाही? वगैरे चर्चेत पडू नये.

 

7. पाकिस्तानच्या विरोधी केलेली लष्करी कारवाई ही मोदी सरकारची मोठी जमेची बाजू आहे व त्याबद्दल अभिमान असणे स्वाभाविक आहे आणि असायलाही हवा. पण चर्चेच्या ओघात कोणी युद्ध हे अंतिमत: मानवतेच्या हिताचे नसते वगैरे मांडणी केल्यास तो भारत विरोधीच आहे, अशा आवेशात तुटून पडू नये. तसे आदर्शवादी मत असणारे कोणी असू शकतात. तत्त्वत: त्यात चूक नाही.

 

8. एकंदरच आपल्या मताची मांडणी, मोदींना निवडून द्यावे याकरिता केलेले आवाहन नेमक्या शब्दांत व संयमितपणे करावे. चांगल्या व विश्वासार्ह माध्यमात आलेला मजकूरच शेअर करावा. आपला हेतू मते व माणसेही जोडण्याचा आहे, याचा विसर पडू देऊ नये. विशेषत: समोरून केले गेलेले जातीय वा अर्वाच्च लेखन आपल्याला चिथावण्यासाठी केले जाते. त्यामुळे असल्या सापळ्यात चालत जाऊ नये.

 

9. महाराष्ट्रात...

अ) नेहरूवादी विचारांची वा तसे म्हणवणारी,

ब) गांधीवादी/सर्वोदयी विचारांची वा तसे म्हणवणारी,

क) समाजवादी वा सोशल डेमोक्रेट्स वा डावे म्हणवणारी वा

ड) समतावादी वा आंबेडकरी विचारांची म्हणवणारी

 

अशी चार प्रकारची माणसे समाजमाध्यमांत वादावादी करताना दिसतात. त्यातील तिशीच्या आतील कोणी असेल, तरच त्यांच्याशी चर्चा करावी आणि फार तर दोन-तीन चर्चेच्या फेऱ्या कराव्यात. बाकी ४०-५० वर्षीय वा पुढील ज्ञानी मंडळींशी, सध्या तरी हुज्जत घालू नये. राजकीयदृष्ट्या त्या चारांपैकी कोणीच, राजकीय पक्ष म्हणून गांभीर्याने निवडणूक लढवणारे नाहीत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जनसंपर्क म्हणून वा वैचारिक आदान-प्रदान म्हणून त्यांच्याशी गप्पा मारायला भरपूर वेळ मिळेल.

 

10. लोकमाध्यमातील लेखन हा फील्ड-वर्कला पर्याय नाही. त्यामुळे आपल्या परिसरातील, परिचयाचे, नातेवाईक, जाता-येता हाय-हॅलोच्या यादीत असणारे असे सर्व मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदानाला जातील यासाठीदेखील मतदानाचा दिवस अवश्य राखून ठेवावा. अशा सर्वांची नावे मतदार यादीत आहेत ना याची खात्री ऑनलाईन करावी.

 

- शरदमणी मराठे

[email protected]

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@