ऑलिम्पिक : शक्ती, शिस्त आणि समर्पण करणाऱ्यांचे..

    03-Aug-2025
Total Views |

खेळ म्हटले की, त्यात सानथोर सारेच रमतात. मानवाला खेळामधून जीवन जगण्यासाठीची ऊर्जा मिळते. साधारणत: खेळ म्हटले की, विशिष्ट पद्धतीचे खेळाडू आपल्या नजरेसमोर येतात. मात्र, पोलीस किंवा अग्निशमन दलांच्याही एका जागतिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा, तिचे स्वरूप, इतिहास आणि भविष्य याचा घेतलेला हा आढावा...

गांधीनगरचे लोकसभा खासदार, सहकारमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, २०२९ सालच्या प्रतिष्ठित ‘जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धे’साठी भारताला यजमान देश म्हणून नियुक्त केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि हा प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा क्षण असल्याच्या भावना ‘एस’वरील संदेशातून व्यक्त केल्या होत्या. अमित शाह यांनी त्यांच्या संदेशात म्हटले की, ’२०२९ सालच्या प्रतिष्ठित जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांसाठी, भारताला यजमान देश म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हा प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मान मिळवणे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बांधलेल्या आमच्या विस्तीर्ण क्रीडा पायाभूत सुविधांची जागतिक ओळख आहे. अहमदाबादची या कार्यक्रमाचे ठिकाण म्हणून निवड झाली आहे; जे ५० हून अधिक खेळांमध्ये स्पर्धा करण्यासाठी पोलीस, अग्निशमन आणि आपत्ती सेवांना एकत्र आणते. क्रीडा स्थळ म्हणून शहराच्या वाढत्या प्रतिष्ठेचा हा पुरावा आहे.

जून महिन्याच्या दि. २७ तारखेला अमित शाह यांचे हे विचार देशाने वाचले. दि. २७ जूननंतर एका महिन्यांनी, भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या क्रीडा स्पर्धांचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान मोदी यांनी दि. २७ जुलै रोजीच्या ‘मन की बात’ मध्ये, जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांसमवेत क्रीडाविश्वाशी संबंधित विचार मांडताना म्हटले होते की, ”ऑलिम्पिकनंतरची सर्वांत मोठी क्रीडा स्पर्धा कोणती हे माहीत आहे का तुम्हाला? याचे उत्तर आहे, ‘जागतिक पोलीस आणि अग्निशमन स्पर्धा.’ जगभरातले पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि सुरक्षा कर्मचार्यांसाठी होणारी ही क्रीडा स्पर्धा. यावेळी ही स्पर्धा अमेरिकेत झाली आणि भारताने त्यात इतिहास रचला. भारताने सुमारे ६०० पदके जिंकली. आपण ७१ देशांच्या यादीत अव्वल तीनमध्ये पोहोचलो. देशासाठी दिवसरात्र उभ्या राहणार्या या गणवेशधारी जवानांना कष्टाचे फळ मिळाले. आमचे हे मित्र आता क्रीडा क्षेत्रातही झेंडा फडकवत आहेत. मी सर्व खेळाडूंचे आणि प्रशिक्षक संघाचे अभिनंदन करतो. तसे तर तुम्हाला हेही जाणून घ्यायला आवडेल की, २०२९ साली या स्पर्धा भारतात होणार आहेत. जगभरातले खेळाडू आपल्या देशात येतील. आपण त्यांना भारतीय आदरातिथ्याचा अनुभव देऊ आणि त्यांना आपल्या क्रीडा संस्कृतीची ओळख करून देऊ.” पंतप्रधान पुढे नुकत्याच जाहीर झालेल्या ‘खेलो भारत नीती’चा उल्लेख करत म्हणतात की, "मित्रांनो, गेल्या काही दिवसांत मला अनेक तरुण खेळाडू आणि त्यांच्या पालकांचे संदेश मिळाले आहेत. यात ‘खेलो भारत नीती २०२५’चे खूप कौतुक झाले. या धोरणाचे उद्दिष्ट स्पष्ट आहे, भारताला क्रीडा महासत्ता बनवणे. गावं, गरीब आणि मुली ही या धोरणाची प्राथमिकता आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्य्ये खेळ हा दैनंदिन जीवनाचा एक भाग होईल.”

पंतप्रधान मोदी यांनी क्रीडाविश्वातील ‘स्टार्टअप्स’चाही उल्लेख ‘मन की बात’मध्ये केला. ते म्हणाले की, "खेळांशी निगडित स्टार्टअप्स मग ते क्रीडा व्यवस्थापनाशी निगडित असोत किंवा उत्पादनाशी, त्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल. जेव्हा देशातले तरुण स्वतः बनवलेल्या रॅकेट, बॅट आणि बॉलने खेळतील, तेव्हा आत्मनिर्भरतेच्या मोहिमेला किती बळ मिळेल? याची कल्पना करा. मित्रांनो, खेळ सांघिक भावना निर्माण करतात. हा तंदुरुस्ती, आत्मविश्वास आणि एक मजबूत भारताच्या निर्माणाचा मार्ग आहे. म्हणून भरपूर खेळा आणि भरपूर फुलून-उमलून या.”

भारत २०२९ गुजरातमधल्या अहमदाबाद, गांधीनगर आणि एकता नगर, येथे होणार्या ‘जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धां’च्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे. जून २०२५ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही अभिमानाने घोषणा केली की, गुजरातने या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान मिळवला आहे. ही केवळ यजमानपदाची संधी नाही; तर जागतिक स्तरावर ओळख मिळवण्याचाही क्षण आहे. ही घोषणा जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी भारताचा वाढता प्रभाव आणि क्षमता दर्शवते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ‘एस’वरील त्यांच्या संदेशामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दूरदर्शी नेतृत्वालाही याचे श्रेय दिले आहे. २०३६ सालचे ऑलिम्पिकचे यजमानपद भारताने भूषवावे, यासाठी भारत सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. हे १४० कोटी देशवासीयांचे स्वप्न असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या ऑलिम्पिक समितीच्या वार्षिक सत्रात सांगितले होते.

भारत आता २०३६ सालच्या ऑलिम्पिकचे भारतात आणि त्यातही खासकरून गुजरातमध्ये आयोजन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी या स्पर्धांचा अनुभव उपयोगी पडणार आहे. या स्पर्धा म्हणजे, ऑलिम्पिकची एक स्वल्पशी रंगीत तालीम असेल असे आपण म्हणू शकतो. तसेच, या स्पर्धेतील अनुभवातून आयोजकही बरेच काही शिकू शकतात.

शक्ती, शिस्त आणि अटल समर्पणाचे अद्भुत प्रदर्शन करत, ‘टीम इंडिया’ने अमेरिकेतील अलाबामा येथील बर्मिंगहॅम येथे झालेल्या, २१व्या ’जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळ २०२५’ मध्ये ५८८ पदके जिंकून, देशाला प्रचंड गौरव मिळवून दिला. या नेत्रदीपक कामगिरीत २८० सुवर्ण, १७८ रौप्य आणि १३० कांस्यपदकांचा समावेश आहे, यामुळे भारतताने जागतिक पटलावर यजमान अमेरिका (१ हजार, ३५४ पदके) आणि ब्राझील (७४३ पदके) यांच्या पाठोपाठ तिसरा क्रमांक पटकावला आहे.

‘वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्स’ या स्पर्धेचे आयोजन, जगभरातील सक्रिय आणि निवृत्त पोलीस आणि अग्निशमन सेवा देणार्या कर्मचार्यांसाठी केले जाते. ‘वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्स’ही ‘कॅलिफोर्निया पोलीस थलेटिक फेडरेशन’ची (सीपीएएफ) एक शाखा असून, ती एक अमेरिकन ना-नफा संस्था आहे.

सन १९८५ पासून दर दोन वर्षांनी एकदा या खेळांचे आयोजन केले जाते. आतापर्यंत या खेळांच्या २० आवृत्या आयोजित केल्या गेल्या आहेत. हे खेळ पोलीस, अग्निशमन, वैद्यकीय, आपत्कालीन, आपत्ती सेवा आणि प्रथम प्रतिसाद दल इत्यादींमधील सेवारत आणि निवृत्त कर्मचार्यांसाठी खुले असतात. सन २००७ मध्ये डलेड जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांमध्ये, भारतीय पोलीस दलाने पहिल्यांदाच या खेळांमध्ये भाग घेतला होता. जागतिक पोलीस आणि अग्निशमन स्पर्धेचे शेवटचे (२०वे संस्करण) आयोजन, दि. २६ जुलै ते दि. ६ ऑगस्ट २०२३ रोजीदरम्यान कॅनडातील विनिपेग येथे करण्यात आले होते. जिथे १३३ भारतीय पोलीस खेळाडूंनी, विक्रमी ३४३ पदके जिंकली. सन २००७ मध्ये सहभागी झाल्यापासून, भारतीय पोलीस दलाने या खेळांच्या आठ आवृत्यांमध्ये १ हजार, ४०० हून अधिक पदके जिंकली आहेत.

जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांसाठी भारतीय पथकाची निवड, त्यावर्षी झालेल्या वार्षिक अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धांमधील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे केली जाते. देशातील पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणारी प्रशासकीय संस्था, अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रण मंडळ असून, यामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), राज्य पोलीस दल आणि इतर सुरक्षा संस्थांच्या ५३ सदस्य संघटना आहेत. दरवर्षी ४० वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. प्रत्येक वर्षीच्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धांमधील सुवर्णपदक विजेत्यांची, जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांसाठीच्या भारतीय संघात निवड होते.

या स्पर्धांमध्ये ऑलिम्पिकमधील जवळपास सगळ्याच क्रीडा प्रकारांचा समावेश असला, तरी काही क्रीडाप्रकार असेही आहेत की, जे ऑलिम्पिकमध्ये नसतात पण, जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धात त्यांचा समावेश होतो. तर काही क्रीडा प्रकार ऑलिम्पिकमध्ये असतात पण, पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धात नसतात. लोकप्रिय बुद्धिबळ हा क्रीडाप्रकार ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट नसतो, तर जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धात तो असतो. ‘जिम्नॅस्टिक ऑलिम्पिक’मध्ये असतो, तर जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धात त्याचा समावेश आढळत नाही.

मुष्टियुद्ध, जिउ जितसु, जुडो, कराटे, तायक्वांडो, कुस्ती, पिस्तूल, रायफल, शॉटगन, कुर्हाड फेक, पोलिसांची मोटारसायकल चालवणे, व्यायाम शाळेतील बेंच प्रेस, बॉडी बिल्डिंग असे क्रीडा प्रकार, बुद्धिबळ, कॉर्नहोल, डार्ट्स, डिस्क गोल्फ, गोल्फ, पिकलबॉल, टेबल टेनिस, टेनिस, धनुर्विद्या असे एक ना अनेक ऑलिम्पिक नॉन-ऑलिम्पिक क्रीडाप्रकारांच्या स्पर्धा, पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धात होतात. ’फायर फायटर स्पोर्टस’ हे अग्निशमनाशी संबंधित खेळ, जागतिक पोलीस आणि अग्निशमन पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धांचे विशेष आकर्षण असतात. पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धेतील ‘मोहरी मस्टर’ हा शब्द वाचणार्या सगळ्यांनाच आश्चर्यचकित करतो. जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धांमधील ‘सज्जता’ किंवा ‘उपस्थिती’ दर्शवण्यासाठी तो वापरला जातो. याचा अर्थ, स्पर्धेत सहभागी होणार्या पोलीस आणि अग्निशमन दलातील कर्मचार्यांची उपस्थिती आणि तयारी तपासणे. ‘मोहरी’ हा आपल्या मिसळणाच्या डब्यातील जिरं, मोहरी यातील मोहरीशी जोडू नये, ’मस्टर’ आणि ‘मोहरी’ हे दोन वेगळे शब्द आहेत. ‘मस्टर’चा अर्थ सज्जता! स्पर्धेसाठी तयार असणे, उपस्थित असणे, हजर असणे, उपस्थिती आणि तयारीची तपासणी करणे असा होतो. उदाहरणार्थ, ‘मस्टर’ मध्ये स्पर्धकांनी त्यांचे ओळखपत्र, गणवेश आणि आवश्यक साहित्य सोबत आणले आहे की नाही, हे तपासले जाते.

’फायर फायटर चॅलेंज’ अग्निशामक आव्हान रक्षक सन्मान,जिन्यातील शर्यती, अल्टिमेट अग्निशामक सेनानी असे यातील क्रीडाप्रकार. तसेच, मनगट कुस्ती, लढाऊ खेळांच्या क्रीडा स्पर्धा, फिटनेसशी संबंधित क्रीडा स्पर्धा, रेसिंग, सायकलिंग क्रीडा स्पर्धा, कौशल्यावर आधारित क्रीडा स्पर्धा, जलक्रीडा, अग्निशामक क्रीडा स्पर्धा, पोलीस क्रीडा स्पर्धा, शूटिंग स्पर्धा, सांघिक स्पर्धा, के-नाईन स्पर्धा, असे खेळ या स्पर्धेत असतात. के-नाईन स्पर्धांमधील ’के-९’ हा शब्द ‘केनाईन’ या शब्दाचा लघुरूप आहे, ज्याचा अर्थ ‘कुत्रा’ किंवा ‘श्वान’ असा होतो. त्यामुळे, के-९ स्पोटर्स म्हणजे, श्वानांसाठी असलेल्या खेळांची एक स्पर्धा. यामध्ये विविध प्रकारच्या श्वानांच्या क्षमता आणि प्रशिक्षण तपासले जाते, जसे की आज्ञापालन, अडथळ्यांची शर्यत, शोध आणि बचाव कार्य इत्यादी.

जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धात, अंदाजे दहा हजार क्रीडापटू सहभागी होतात. हे उन्हाळी ऑलिम्पिक खेळांपेक्षा कमी असून, तिसर्या क्रमांकाच्या राष्ट्रकुल खेळांपेक्षा जास्त आहेत. २०१७ साली खेळ मॉन्ट्रियल शहरात आयोजित करण्याचे नियोजित होते. तथापि, शहर आणि त्याच्या अग्निशमन विभागातील कामगार यांच्यातील वादानंतर, मॉन्ट्रियलने त्यांच्या यजमानपदातून माघार घेतली. खेळांचे वेळापत्रक बदलण्यात आले आणि त्याचे लॉस एंजेलिसमध्ये यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. २०१९ साली यजमान शहर चेंगडू होते. ‘कोविड-१९’ साथीच्या आजारामुळे, ’पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धा २०२१’ पुढे ढकलण्यात आली. २०२२ साली यजमान शहर रॉटरडॅम होते. कॅलिफोर्निया पोलीस ऑलिम्पिक पहिल्यांदा, १९६७ साली आयोजित करण्यात आले होते. ही संकल्पना कालांतराने विकसित झाली आणि १९८३ साली ‘कॅलिफोर्निया पोलीस अॅथलेटिस फेडरेशन’द्वारे चालवल्या जाणार्या ,‘वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्स फेडरेशन’ ही एक ना नफा संस्थेची निर्मिती झाली. दोन वर्षांनंतर १९८५ साली, अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे पहिले ‘वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्स’ आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये जवळजवळ पाच हजार स्पर्धक सहभागी झाले होते.

आतापर्यंतचे सर्वांत मोठे ‘डब्ल्युपीएफजी’ खेळ अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आले होते, ज्यात ५९ देशांमधील १६ हजारांहून अधिक खेळाडू उपस्थित होते. २०१३ साली उत्तर आयर्लंडमधील बेलफास्ट येथे या स्पर्धांचे सर्वांत यशस्वी आणि सर्वोत्तम आयोजन झाले होते. जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळ महासंघाचे अध्यक्ष माईक ग्राहम यांनी त्याचे वर्णन, सर्वांत मैत्रीपूर्ण आणि सर्वोत्तम खेळ असे केले होते. सामूहिक करार आणि पेन्शन निधीमध्ये सक्तीने केलेल्या बदलांच्या निषेधार्थ, मॉन्ट्रियल अग्निशमन दलाच्या संघटनेने २०१७ सालच्या खेळांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. तेव्हा या स्पर्धांचे आयोजन त्यांच शहरात झाले होते. एक लाखाहून अधिक अग्निशमन दलाचे आणि नागरी सेवकांचे प्रतिनिधित्व करणार्या कामगार संघटना , या बहिष्कारात सामील झाल्या होत्या. तर असे हे शक्ती, शिस्त आणि समर्पण करणार्यांचे २०२७ सालचे ऑलिम्पिक आता ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे होईल. या स्पर्धेत भारतीय पथक मागील आवृत्तीपेक्षा जास्त पदकांची कमाई करत, द्वितीय क्रमांकावर जावो त्यानंतर २०२९ साली अहमदाबादमधील स्पर्धेचे यजमान असल्याने, मिळणारे फायदे उठवत आपले पथक प्रथम क्रमांकावर जावो.

श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४