विविध खंडांची प्राकृतिक वैशिष्ट्ये अंक दुसरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2019   
Total Views |


 


गेल्या वेळेस प्रकाशित झालेल्या खास लेखात आपण आपल्या लेखमालेपासून दूर जाऊन जम्मू-काश्मीरमधील नद्यांमधील आपले पाणी कसे वाचवता येईल हे पाहिले. लेख प्रकाशित झाल्यानंतर मला बरेच फोन आले. अर्थात, मी स्वत: भारताबाहेर असल्यामुळे मला एकही फोन उचलता आला नाही. त्यामुळे वाचकांपैकी कोणी फोन केला असल्यास (आणि मला खात्री आहे की काही फोन तरी नक्कीच आपले असतील!) प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आता या लेखात आपण आपली लेखमाला परत सुरू करूया. लेखमालेच्या मागच्या भागात आपण विविध खंडांच्या प्राकृतिक वैशिष्ट्यांची माहिती करून घेण्याचा संकल्प करुन आकारानुसार जगातील पहिल्या तीन खंडांची माहिती घेतली होती. या वेळी आपण तोच संकल्प पुढे चालू ठेवून उरलेल्या खंडांची माहिती घेऊ.


आकारानुसार दक्षिण अमेरिका (South America) खंड हे जगात चौथ्या क्रमांकावर आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे १ कोटी, ७८ लाख, ४० हजार चौरस किलोमीटर आहे. हे खंड दक्षिण गोलार्धात जास्त पसरलेले आहे. खंडाच्या पूर्वेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला प्रशांत महासागर, तर उत्तरेला कॅरेबियन समुद्र आणि उत्तर अमेरिका खंड आहे. दक्षिणेला ‘ड्रेक’चा मार्ग (Drake Passage) हा समुद्राचा अगदी अरूंद पट्टा या खंडाला अंटार्क्टिका खंडापासून वेगळे करतो. खंडाचा पश्चिम किनारा हा प्रशांत अग्निचक्राचा (Pacific Ring of Fire) पूर्व भाग आहे, म्हणजेच ‘सबडक्शन झोन’ आहे. त्यामुळे हा भाग भूकंपशील असणे स्वाभाविकच असून अनेक सक्रिय व निष्क्रिय ज्वालामुखी या किनाऱ्याजवळ आहेत. अनेक मोठ्या भूकंपांच्या व ज्वालामुखी उद्रेकांच्या नोंदी इतिहासात सापडतात. १९६० साली चिली देशात झालेला सुमारे ९.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा आणि ज्ञात इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूकंपही याच पश्चिम किनाऱ्यावर झाला, हे वाक्यच येथील अस्थिर भूभागाची कल्पना देण्यास पुरेसे आहे. आत्ता गुरुवारी सकाळीच या खंडातील पेरू देशात ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. गेल्या आठवड्यातसुद्धा ७.३० रिश्टर स्केल तीव्रतेपेक्षा जास्त तीव्रतेचे दोन भूकंप चिली देशात झाले.

 

भूकंप व ज्वालामुखींशिवाय अनेक मनोरंजक प्राकृतिक वैशिष्ट्ये या खंडामध्ये आहेत. अँडीज (Andes) ही आशिया खंडाबाहेर असलेली सर्वांत उंच आणि जगातली सर्वात लांब खंडीय पर्वतरांग या खंडात आहे. संपूर्ण पश्चिम गोलार्ध (Western Hemisphere) आणि दक्षिण गोलार्ध (Southern Hemisphere) यांच्यात सर्वात उंच असलेले अकोनकागुआ (Aconcagua) हे पर्वतशिखरही याच पर्वतरांगेत आहे. जगातले सर्वात कोरडे हवामान असलेल्या ठिकाणांपैकी एक असे अटाकामाचे वाळवंटही (Atacama Desert) याच खंडात अँडीज पर्वतांच्या पश्चिम भागात आहे. आशिया खंडातील तिबेट सोडले, तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच आणि मोठ्या आकाराचे पठार म्हणजे अल्टिप्लानोचे पठार (Altiplano) याच अँडीज पर्वतात आहे. अॅमेझॉन (Amazon) ही जगातली सर्वात मोठी नदी आणि जगातले सर्वात मोठे वर्षावनही या खंडात आहे. एंजल फॉल्स (Angel Falls) हा जगातला सर्वात उंच धबधबाही याच खंडात आहे. टिटिकाका (Titicaca) नावाचे जगातील सर्वात उंच नौकानयनयोग्य सरोवरही या खंडात आहे. या सरोवराच्या आसपास इन्का (Inca) संस्कृतीचे पुरातत्त्व अवशेष सापडलेले आहेत. इगुआझू (Iguazu) या नदीवर असलेल्या इगुआझू धबधब्यांचा (Iguazu Falls) संच हा जगातील सर्वांत मोठा धबधब्यांचा संच (Waterfall System) आहे. ‘सलार दे उयुनी’ (Salar de Uyuni) नावाचे जगातले सर्वात मोठे मिठाचे वाळवंट (Salt plain) याच खंडात आहे. सुमारे १०.३० हजार चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या वाळवंटाच्या मिठामध्ये लिथियम (Lithium) हा धातू एवढ्या जास्त प्रमाणात आहे की, जगातील लिथियमच्या ज्ञात स्रोतांपैकी सुमारे ५० ते ७० टक्के लिथियम या एकट्या ठिकाणी सापडते. या खंडात सोने, चांदी, तांबे, लोह तसेच जीवाश्म इंधनाचेही साठे आहेत.


 
 

आकारानुसार जगातले पाचवे मोठे खंड आहे अंटार्क्टिका (Antarctica). हे जगातील सर्वात दक्षिणेकडील खंड आहे. हे जवळजवळ पूर्णपणे अंटार्क्टिक वृत्ताच्या दक्षिणेला आहे. हे खंड सर्व बाजूंनी दक्षिण महासागराने (Southern Ocean) वेढलेले आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे १ कोटी, ४० लाख चौरस किलोमीटर आहे. खंडाचा ९८ टक्के भाग हा जवळजवळ दोन किलोमीटर जाड बर्फाच्या लादीने झाकलेला आहे. बहुतांश खंड हे जगातील सर्वात थंड, कोरडे आहे. तसेच, या खंडाची सरासरी उंची ही इतर कोणत्याही खंडापेक्षा जास्त आहे. या खंडामध्येच दक्षिण ध्रुव (South Pole) देखील आहे. या ध्रुवाची गंमत म्हणजे हे एकच नसून सात आहेत! या सातपैकी पहिले आहे भौगोलिक दक्षिण ध्रुव (Geographical South Pole). हे ध्रुव बरोब्बर ९० अंश सेल्सिअस दक्षिणेला आहे.. दुसरे आहे चुंबकीय दक्षिण ध्रुव (Magnetic South Pole). या बिंदूवर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र (Magnetic Field) पृष्ठभागाला ९० अंश सेल्सिअस म्हणजेच बरोबर लंब असते. हे ध्रुव अस्थिर असून सौरवाऱ्यांच्या स्थितीवर दररोज स्वत:ची जागा बदलते. तिसरे आहे भूचुंबकीय दक्षिण ध्रुव (Geomagnetic South Pole). जर आपण असे मानले की, पृथ्वीच्या गाभ्यात अगदी आत केंद्रामध्ये आपण एक पट्टीचुंबक अगदी स्थिर ठेवले आहे, तर त्या पट्टीचुंबकाची दोन्ही ध्रुवे जी दिशा दाखवतील, त्या पट्टीचुंबकाच्या दक्षिण दिशेकडील पृथ्वीच्या पृष्ठभागावरचा बिंदू म्हणजेच भूचुंबकीय दक्षिण ध्रुव होय. याचाच अर्थ म्हणजे दिशादर्शक या बिंदूच्या दिशेकडे दक्षिण दिशा म्हणून बोट दाखवते. त्यानंतर येते अतिदुर्गमतेचे दक्षिण ध्रुव (South Pole of Inaccessibility). हे ध्रुव किंवा हा बिंदू हा दक्षिण महासागरापासून सर्वात दूरचा म्हणजेच अंटार्क्टिका खंडावरील सर्वात आतील बिंदू आहे आणि म्हणूनच अतिदुर्गम. यानंतर येते परिवलनीय दक्षिण ध्रुव (South Pole of Rotation). या ध्रुवाभोवती पृथ्वी स्वतःभोवती फिरते.

 
 

हे पाच ध्रुव सोडले, तर खगोलीय दक्षिण ध्रुव (Celestial South Pole) आणि शीततेचे दक्षिण ध्रुव (South Pole of Cold) अशी दोन भूशास्त्रीय नसलेली ध्रुवही आहेत. ध्रुवांखेरीज खंडावर मोठमोठ्या हिमलाद्या आहेत. तसेच ट्रान्स-अंटार्क्टिक पर्वतरांग (Trans Antarctic Range) ही आहे. ही पर्वतरांग खंडाला पूर्व अंटार्क्टिक आणि पश्चिम अंटार्क्टिक अशी विभागते. विन्सन मॅस्सिफ (Vinson Massif) नावाचा पर्वतशिखरांचा समुदायही आहे. यातच माऊंट विन्सन हे या खंडावरील सर्वात उंच शिखरही (सुमारे ४ हजार ८९२ मीटर) आहे. तसेच एल्सवर्थ पर्वतरांग (Ellsworth Mountains) नावाची खंडावरील सर्वात उंच पर्वतरांगही इथे आहे. हे खंड अतिथंड असले आणि खंडाचा बहुतांश भाग हा बर्फाच्छादित असला तरी, काही अशा जागा आहेत, ज्यांच्यात फार म्हणजे फार कमी बर्फ पडतो. मॅकमुर्डो खिंड (mcMurdo Valley) ही त्यांपैकीच एक. या खिंडीमध्ये फार कमी आर्द्रता असल्यामुळे इथे बर्फवृष्टी जवळजवळ होतच नाही. त्यामुळे कितीही थंड असली तरी, ही जागा बरीचशी कोरडीच आहे. या खिंडीची गणती जगातील सर्वात कोरड्या जागांमध्ये केली जाते. इथे माऊंट इरेबस (Mt. Erabus) हा मोठा जागृत ज्वालामुखी पर्वत आहे. हा ज्वालामुखी गेल्या १३ लाख वर्षांपासून जागृत आहे. याशिवाय माऊंट मोलबोर्न (Mt. Melbourne) सारखे इतरही जागृत ज्वालामुखी इथे आहेत. या सर्व प्राकृतिक घटकांचा, तसेच जैविक घटकांचा अभ्यास करण्यासाठी इथे अनेक वैज्ञानिक तळ उभारण्यात आले आहेत. भारतीय शास्त्रज्ञही या खंडावर आहेत. भारताने मैत्री, भारती, दक्षिण गंगोत्री यांसारखे तळ येथे उभारले आहेत. तर, आपली एकूण पाच खंडांची माहिती घेऊन झालेली आहे. पुढील लेखात आपण उरलेल्या दोन खंडांची माहिती घेऊ.

 

संदर्भ - www.wikipedia.com आणि https://antarcticguide.com/about-antarctica/antarctic-geography/how-many-south-poles-are-there/)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@