पुरस्कारार्थींच्या परिश्रमाचा युवापिढीने आदर्श घ्यावा: लक्ष्मीकांत उपाध्याय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2019   
Total Views |

1_1  H x W: 0 x


दि कल्याण जनता सहकारी बँक लि. संचालक समाजसेवा पुरस्कार निधी न्यास’ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून २०१७ साली लक्ष्मीकांत उपाध्याय यांनी जबाबदारी स्वीकारली. गेली तीन वर्षे त्यांनी ही धुरा लीलया पेलली. संस्थेच्या अनेक उपक्रमांना त्यांच्या नेतृत्वात दिशा मिळाली. यंदाच्या ‘संचालक समाजसेवा पुरस्कार निधी’ सोहळ्याच्या निमित्ताने दै. मुंबई तरुण भारतशी त्यांनी केलेली ही खास बातचित...


  • गेली तीन वर्षे संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा तुमच्या खांद्यावर आहे. तेव्हा संस्थेच्या आजवरच्या प्रवासाविषयी काय सांगाल?

 

२०१७ साली मीदि कल्याण जनता सहकारी बँके’च्या संचालक पदावरून निवृत्त झालो होतो. मात्र, या परिवारातील एक सदस्य म्हणून मी कायम राहावे, अशी संचालक मंडळाची इच्छा होती. त्यानुसार मंडळाने त्याच वर्षी माझ्यावर ‘संचालक समाजसेवा पुरस्कार निधी’ या विश्वस्त संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. जेव्हापासून संस्थेची स्थापना झाली होती, त्या वर्षीपासूनच संस्थेचा एक सदस्य म्हणून माझा सक्रीय सहभाग होता. त्या त्या वेळच्या संस्थेच्या अधिकारी, संचालकांनी दिलेल्या जबाबदार्‍या मी वेळोवेळी पार पाडल्या. त्यामुळे संस्था आणि तिचे उपक्रम माझ्यासाठी नवे नव्हते. परंतु, संचालकांनी त्यावेळी माझी अध्यक्षपदी नेमणूक करायचे ठरवले. ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्यावेळी मीच जरा कचरत होतो. ही जबाबदारी आपण पेलू का, सर्व कामातून संस्थेची कामे आपल्याला जमतील का, अशा काही शंका माझ्या मनात होत्या. पण, संचालकांनी जबाबदारी दिल्यानंतर मी ती नाकारूही शकलो नाही. संस्थेच्या संचालकांचा मी मनापासून आदर करतो. त्यामुळे त्यांनी दिलेल्या वडीलकीच्या सल्ल्याचा मान राखत, मी ही जबाबदारी स्वीकारली आणि यशस्वीपणे पारही पाडली.



  • संस्थेचे अध्यक्ष म्हणून कधी या जबाबदार्‍यांचे आपल्याला दडपण जाणवले का?

 

संस्थेच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारण्यापूर्वीही जबाबदार्‍या होत्या आणि आताही आहेतच. त्यामुळे जबाबदारी थोडी वाढली असेलही कदाचित, पण त्याचे दडपण जाणवले नाही. एकदा संस्थेच्या कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे तत्कालीन राज्यपाल भाई महावीर यांना निमंत्रण देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. मध्यप्रदेशच्या राज्यपालांना कल्याणमध्ये आणणे ही जबाबदारी तशी फार मोठी होती. मात्र, माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे ठरवले. मनोहर पर्रिकर यांना निमंत्रण देण्याचीही जबाबदारी माझ्याकडेच होती. पर्रिकरांनाही सुरुवातीला नकार दर्शवला होता. मात्र, मी हट्टच धरून बसलो. संस्था आणि तिच्या कामाबद्दल त्यांना माहिती दिली. अखेर विनंतीला मान देऊन ते कार्यक्रमाला आले. पण, माझचं दुर्दैव म्हणा, पर्रिकर आल्यानंतरही कार्यक्रमाला काही कारणास्तव मीच उपस्थित राहू शकलो नाही.



  • संस्थेकडे मदतीसाठी येणार्‍या संस्था किंवा व्यक्ती यांच्यापर्यंत योग्य ती मदत पोहोचवण्यापर्यंतच्या प्रवासातील तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल?

 

ही मदत करण्यासाठी नेमून दिलेल्या संबंधित व्यक्तींवर ती जबाबदारी असते. त्यांना ही मदत योग्य ठिकाणी पोहोचवयाची असते. तसेच संस्थेतर्फे राबविल्या जाणार्‍या प्रकल्पाविषयी नियोजित बैठका घेतल्या जातात. त्यावेळी संचालक नेमून देतील ती जबाबदारी मी असो किंवा इतर कुणी असो आपापल्या परीने पार पाडतात.



  • यंदाचा पुरस्कार तीन वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या उद्योजकांना दिला जाणार आहे. हा पुरस्कार सोहळा यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी तशी सर्वांचीच आहे. तेव्हा एकूणच पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनाविषयी काय सांगाल?

 

हे काम माझ्या एकट्याचे नाही. या मागे शेकडो हात राबते असतात. आमची संपूर्ण टीम यामागे असते. पुरस्कार विजेत्यांची निवड असो किंवा कार्यक्रमाचे आयोजन, लहान-मोठी सर्व कामे जबाबदार्‍या वाटून ती पूर्ण करून घेणे ही जबाबदारी प्रत्येकाची असते. त्यामुळे या सोहळ्याच्या आयोजनांत सर्वांचाच सहभाग आणि वावर मला महत्त्वाचा वाटतो. मी नाममात्र आहे. खरे सांगायचे झाले, तर पण दिलेली जबाबदारीही मी पार पाडतो. उर्वरित या दिवसांतील कामे बँकेतील अधिकारी-कर्मचारी आणि इतर सर्वजण जीव ओतून करत असतात. इतका मोठा कार्यक्रम राबविणे ही साधी गोष्ट नाही. त्यामागच्या खटाटोपाची कल्पना आपल्याला येतच असते. त्यामुळे हा सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी टीम वर्क लागतेच. त्यामुळे त्यांच्याशिवाय हे अशक्यच आहे. काही मंडळींनी स्वतःला यात वाहून घेतले आहे. माझी जबाबदारी या सर्व प्रमुख पाहुण्यांना निमंत्रित करणे, ज्यांना पुरस्कार मिळाला आहे, त्यांना प्रत्यक्षात भेटून सन्मानाने त्यांना आपल्या संस्थेबद्दल पुरस्काराबद्दल सांगणे, हे माझे काम होते. याशिवाय अन्य काही लागणारी मदत माझ्याकडून होतच असते.



  • यंदाचासंचालक समाजसेवा पुरस्कार ’उद्योजक कृष्णलाल धवन, भास्कर शेट्टी आणि महेश (खिल्लारी) अगरवाल यांना जाहीर झाला आहे. या तीन पुरस्कारमूर्तींविषयी काय सांगाल?

 

यात एक गंमत आहे. ती अशी की, संस्थेचे संचालक मंडळ, पुरस्कार निवड समिती हा सन्मान कुणाला द्यायचा हे ठरवत असते. ठाणे जिल्ह्यातील अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जातो. पुरस्कार निवड समितीने जी नावे निश्चित केली, त्यांच्याबद्दल मला थेट कल्पना नव्हती. कारण, मी या समितीत यंदा नव्हतो. मात्र, कृष्णलाल धवन, भास्कर शेट्टी आणि महेश (खिल्लारी) अगरवाल ही तीन नावे जाहीर झाली, त्यावेळी माझ्या मनाला एक सुखद धक्का बसला. कारण, या तिन्ही उद्योजकांशी माझा काही ना काही कारणास्तव पूर्वी संबंध आला होता. तिघेही आपापल्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व आहेत. मोठी माणसं आहेत. त्यामुळे हा पुरस्कार त्यांना मिळाला, याबद्दल मला आनंदच आहे. कृष्णलाल धवन यांना मी अगदी लहानपणापासूनच ओळखतो. त्यांच्याशी माझा परिचय त्यांनी सुरु केलेल्या ‘मल्होत्रा स्टील’ या कंपनीपासूनच होता. सचोटी, परिश्रम आणि एकूणच स्वभावामुळे मोठा झालेला माणूस असे धवनभाई. कारण, त्यांच्या कामाचा अनुभव प्रदीर्घ आहेत आणि शिवाय त्यांनी केलेले समाजकार्यही तितकेच मोठे आहे.

भास्कर शेट्टी यांना आम्हीभास्कर शेठ’च म्हणतो. ते कल्याणमधील प्रतिष्ठीत व्यक्तिमत्त्वांपैकी एक. ते मूळचे कर्नाटकचे असून त्यांच्या समाजात त्यांना अत्यंत मान आहे. मात्र, महाराष्ट्रात इतकी वर्षे राहिल्यानंतर त्यांना मानणारा इतर समाजातीलही मोठा वर्ग आहे. पैसा कमावणे हा एकमेव उद्देश न ठेवता त्यांनी समाजाची बांधिलकी जपण्याचे कामही केले. महेशभाई अग्रवाल हे बांधकाम क्षेत्रातील एक मोठे नाव... पण तुम्ही त्यांना भेटलात तर प्रथमदर्शनी तुम्हाला समजणारही नाहीत; इतके सरळ साधे व्यक्तिमत्त्व. कितीही मोठे झालो तरी पाय जमिनीवर राहतील, ही शिकवण कायम जपणारे व्यक्तिमत्त्व... खरेतर इतक्या मोठ्या पदावर कार्यरत असणार्‍या माणसांचा इतरांशी व्यवहार कसा असतो, हे वेगळे सांगायला नको. पण, महेशभाई यांचा याबद्दल आदर्श घ्यावासा वाटतो. मला वाटते, अशी माणसे यामुळेच सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे ही तिन्ही मंडळी निवडण्यामागचा हेतू सरळ, साधा होता आणि जो सर्वार्थाने साध्य झाला, असे मी म्हणेन.



  • संचालक समाजसेवा पुरस्कारार्थींच्या कार्यातून युवावर्ग, नवउद्योजकांनाही निश्चितच प्रेरणा मिळेल. त्याविषयी काय सांगाल?

 

अगदी. याबाबतीत मी पुन्हा महेशभाईंचेच उदाहरण देईन. महेशभाई आज त्यांच्या व्यवसायात यशस्वी असले तरी एकवेळ अशी होती की, त्यांना एका अत्यावश्यक कामासाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्यावेळी ते माझ्या भेटीला आले होते. मी त्यांना बँकेत कर्जासाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला. नंतर त्यांनी रितसर अर्जही भरला. त्यांना बँकेकडून कर्ज मिळाले. कालांतराने महेशभाई यांनी ते फेडले. पण, या काळात दि. कल्याण जनता सहकारी बँक लि.ने केलेली मदत महेशभाई आयुष्यभरासाठी विसरले नाहीत. आजही कुणीही त्यांच्याकडे गेले तर ते आवर्जून ‘दि कल्याण जनता सहकारी बँके’चा उल्लेख करतात. आमच्या संचालकांची आवर्जून नावे सांगतात. यावरुन तरुणांनी खासकरुन नवउद्योजकांनी हाच धडा घ्यावा की, पैसा म्हणजेच सर्वस्व नाही. तुम्ही आयुष्यात किती माणसे कमावलीत, तुम्ही तुमच्या क्षेत्रात कुठवर पोहोचला आहात, ते महत्त्वाचे आहे. भास्कर शेठबद्दलही हेच उदाहरण लागू पडते. मी जेव्हा ‘रॅलीफॅन’ कंपनीत कार्यरत होतो, त्यावेळी भास्करशेठ तिथे कॅन्टिनचे कर्मचारी होते आणि बघा, आज हाच माणूस इतका मोठा व्यावसायिक म्हणून नावारुपाला आला. नुसते भाग्य अथवा नशिबाच्या जोरावर माणसाला मोठे होता येत नाही. त्यामागे त्या व्यक्तीची मेहनत आहे, सचोटी आहे. त्यामुळे अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा तरुणांनी, नवउद्योजकांनी नक्कीच आदर्श घ्यावा.



  • समाजकार्यामुळे अनेक व्यक्ती किंवा संस्था नव्याने दरवर्षी आपल्याशी जोडल्या जातात. तेव्हा, त्यांना भेडसावणार्‍या समस्या कोणत्या आणि एकूणच तुमचा याविषयीचा काय अनुभव आहे?

 

१९८३ साली मी या बँकेत रुजू झालो. ‘दि कल्याण जनता सहकारी बँकज्या तीनशे ठेवीदारांच्या ठेवींवर मुख्यत्वे सुरू झाली, त्यातील मी एक सदस्य आहे. १९८३ साली मी बँकेचा संचालक झालो आणि २००० मी निवृत्त झालो. त्यामुळे गेली ३५ वर्षे माझ्या हातून बँकेची आणि संस्थेची सेवा झाली. या कालखंडात अनेक माणसं भेटली, ज्यांना आम्ही बँकेच्या अथवा संस्थेच्या मार्फत मदत केली. अर्थात, बँकेतर्फे केलेली मदत ही रितसर कर्जपुरवठा किंवा इतर सुविधा असतील, त्या माध्यमातून केली. संस्थेतर्फे आम्हाला शक्य होईल तेवढी आम्ही मदत देऊ केली. त्यामुळे या कालखंडात आम्ही ज्यांना ज्यांना मदत केली, त्यातील बहुतांश माणसं ही आयुष्यभरासाठी आमच्याशी जोडली गेली. त्यामुळे बँक आणि संस्थेशी भावनिक बंध, अगदी जिव्हाळ्याचे नातेच तयार झालेली बरीच मंडळी आजही संपर्कात आहे.



  • नवीन वर्षातील संस्थेचे उपक्रम आणि संस्थेच्या पुढील वाटचालीबद्दल काय सांगाल?

 

खरं तर संस्थेचा अध्यक्ष म्हणून माझे हे शेवटचे वर्ष. मला निवृत्ती खरंतर द्यायला हवी होती. मात्र, संचालकांनी माझ्यावर आणखी काही वर्षे ही जबाबदारी सोपवली आहे. पुढील वर्षांत संस्था ज्या व्यक्तीच्या नेतृत्वात काम करेल, त्याच्या नेतृत्वात नक्कीच नवनवीन उपक्रम राबविले जातील, याची मला खात्री आहे. अध्यक्षांबरोबरच इतर यंत्रणाही यासाठी कार्यरत आहे. त्यामुळे पुढे नक्कीच काहीतरी नवीन करू, अशी ऊर्जा सार्‍यांमध्ये आहे.

भविष्यात संस्थेची वाटचाल अधिकाधिक व्यापक होत जावो, हीच माझी मनस्वी इच्छा. समाजातील विविध क्षेत्रांना आणि घटकांना, व्यक्ती-संस्थांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘दि. कल्याण जनता सहकारी बँक लिमिटेड संचालक समाजसेवा पुरस्कार निधी संस्थे’सोबत माझ्या शुभेच्छा सदैव आहेतच.

 (मुलाखत : तेजस परब)

@@AUTHORINFO_V1@@