'व्यापक कटा'ची अंमलबजावणी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2019   
Total Views |


saf_1  H x W: 0


भारतात अशा सेवाभावी संस्थांना मोकळीक असल्यानेच 'व्यापक कटा'ची कार्यवाही लोकशाहीचा मुखवटा पांघरून होऊ शकते. पुतीन, ट्रम्प त्यांना दाद देत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. पण, भारतात मोदी सरकार आल्यापासून त्यांची मोठी फौज निकामी झालेली आहे. त्यातून मग इथले जिहादी, नक्षली व चर्चसहीत सेवाभावी यांनी 'चळवळी' म्हणून नाचणाऱ्या डाव्या उदारमतवादी टोळीला हाताशी धरले आहे. अशी या ताज्या हिंसाचाराची खरी पार्श्वभूमी आहे.


तसे बघितल्यास ताज्या 'नागरिकत्व सुधारणा विधेयका'च्या संमतीनंतर उठलेला गदारोळ अपेक्षितच होता. किंबहुना, हे विधेयक आणले नसते तरीही अशा दंगली करून त्यालाच 'एल्गार' ठरवण्याचे कारस्थान खूप आधीपासून शिजलेले होते. काँग्रेस खासदार व ज्येष्ठ संपादक कुमार केतकर ज्याला 'व्यापक कटाचा भाग' म्हणतात, त्याचाच हा एक अंक आहे. त्यामुळे या नव्या विधेयकात काय तरतुदी आहेत वा काय आक्षेपार्ह आहे, त्याचा ऊहापोह आताच करण्याची काहीही गरज नाही. जो काही हिंसाचार घडतो वा घडवला जातो आहे, त्याला 'असंतोषा'चे लेबल लावायची घाई त्यामागचा हेतू साफ करणारी आहे. खरे तर हे सर्व लोकसभेच्या निकालानंतरच करायचे ठरलेले होते. पण, त्याला इतका प्रतिसाद मिळण्याची शक्यता नसल्याने विलंब झाला. राम मंदिराचा विषय निकालात काढला गेला किंवा '३७० कलम' रद्दबातल करण्याचा प्रस्ताव संसदेत मंजूर झाला, तेव्हाही असे घडू शकले असते. त्यासाठी चिथावण्या दिल्याही गेलेल्या होत्या. पण, त्यातून प्रचंड प्रमाणात हिंसाचार होण्याची शक्यता नसल्याने त्या चिथावण्या निकामी ठरल्या. म्हणून विषय गुंडाळला गेला होता. कारण, नवा कायदा वा अन्य बाबी दुय्यम असून भारतात हिंसाचार माजवून मोदी सरकारला बदनाम करणे; हेच मुळात कारस्थान आहे आणि त्याचे हवे तितके पुरावे आताही उपलब्ध आहेत; अन्यथा आयआयटी वा आयआयएम संस्थातही आंदोलन पेटल्याचा खोटारडेपणा सोनियांनी केला नसता. मुद्दा मोदींच्या वा भाजपच्या सरकारला अपयशी वा पक्षपाती ठरवून भारतात हिंसाचार माजवण्याचा आहे. जसे नाटक अमेरिकेतही डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या मुहूर्तावर रंगवण्यात आले होतेच. त्याचीच पुनरावृत्ती २०१९च्या लोकसभेत मोदींचा विजय झाल्यानंतर इथे केली जाईल; अशी काही जाणकारांची अपेक्षा होती. तिथे वॉशिंग्टन डीसीमध्ये २०१५च्या जानेवारीत काय घडले होते?

 

इथे आपल्याकडे निवडणूक पद्धत व मतदान यंत्रावर संशय व्यक्त करण्यात आला आणि तिकडे त्यांच्याच मतदान पद्धतीविषयी संशय घेऊन ट्रम्प कसे हरलेले आहेत, त्याचा डंका पिटला गेला होता. पण, त्याला न्यायालयामध्ये आव्हान देणे शक्य नसल्याने 'नॉट माय प्रेसिडेन्ट' अशी एक टूम काढली गेली. त्याच घोषणेचा गजर करीत देशाच्या प्रमुख शहरात धुमाकूळ घातला गेला होता. त्याला सामान्य लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. मग असले तथाकथित निदर्शक राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे जमा करण्यात आले व शपथविधीमध्ये धुडगूस घालण्यापर्यंत मजल गेली होती. ट्रम्प त्याला पुरून उरले आणि आठ वर्षे राष्ट्राध्यक्षपदी बसलेल्या ओबामांना आपल्या सहकारी निर्लज्ज लोकांना साथ देणे शक्य झाले नाही. म्हणून त्यावर लवकरच पांघरूण पडलेले होते. जगभरच्या सहिष्णुता समर्थक उदारमतवादी लोकांचा तो पराभव होता. इजिप्त असो वा अन्य कुठल्याही प्रगत मागास देशात कुठेही केव्हाही हिंसाचार माजवून सामान्य जनतेत संभ्रमाचे वादळ निर्माण करणारी एक जागतिक व्यवस्था 'उदारमतवाद' या मुखवट्याखाली उभारण्यात आलेली आहे. एका बाजूला असे लोक घटना व लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा हवाला देऊन विरोधाचा आवाज म्हणून पुढे येतात. पण व्यवहारात बहुसंख्य मतांमधून ज्यांना सत्ता मिळाली आहे, तो खराखुरा जनतेचा आवाज दडपून टाकण्यासाठी हिंसाचार करतात. हिंसाचारालाच 'आंदोलन' वा 'चळवळ' असे नवे नामाधिकरण देण्यात आलेले आहे. त्याचाच एक प्रकार 2017च्या अखेरीस पुण्यात 'एल्गार परिषदे'चे नाव घेऊन करण्यात आला होता. आताही 'नागरिकत्व सुधारणा विधेयका'ची मांडणी संसदेत होत असताना भारतात फारसा आवाज उमटलेला नव्हता. पण, त्यासाठी अमेरिकेत थेट भारताच्या गृहमंत्री अमित शाहांना वर्णभेदी ठरवून प्रतिबंधित करण्याची धमकी देण्यात आली. ती इथे पेटलेल्या हिंसाचारासाठी पहिली चिथावणी होती.

 

भारताच्या संसदेत १० डिसेंबर रोजी गृहमंत्री अमित शाहांनी हे विधेयक मांडले व दीर्घ चर्चेनंतर ते संमत करण्यात आले. त्याच दिवशी अमेरिकेतील धार्मिक स्वातंत्र्याच्या संबंधातील एका आयोगाने त्यावर सर्वप्रथम आक्षेप घेतला. त्यासाठी या विधेयकाला धार्मिक पक्षपात करणारा कायदा आणणारे म्हणून गृहमंत्री अमित शाहांवर प्रतिबंध लागू करण्याचे आवाहन अमेरिकेतील ट्रम्प सरकारला करण्यात आले. तेव्हा भारतात या विधेयकावर फारशी चर्चासुद्धा सुरू झालेली नव्हती. उलटसुलट मतप्रदर्शन मात्र सुरू झालेले होते. इतक्यात अमेरिकेतील आयोगाने भारताच्या गृहमंत्र्याला 'गुन्हेगार'ही ठरवून टाकलेले होते. अलीकडेच गुजरात दंगलीचा चौकशी अहवाल सरकारला सादर झाला आहे आणि त्यात नरेंद्र मोदींवर कुठलाही आरोप होऊ शकत नसल्याचा निर्वाळा देण्यात आलेला आहे. पण, १६ वर्षांपूर्वीच त्या दंगलीसाठी मुख्यमंत्र्यांना 'धार्मिक अत्याचार करणारा' म्हणून व्हिसा नाकारण्याचा अट्टाहास करणाऱ्यांत हेच बुद्धिजीवी लोक पुढे होते. ज्यांचा भरणा तिथल्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून केलेला असतो. आताही त्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे. पण, याची चर्चा इथल्या माध्यमांत कुठे होणार नाही. तशी चर्चा केल्यास भारतात उसळलेल्या हिंसाचारामागे कुठली प्रेरणा व साधनसामग्री सामावलेली आहे, त्याचा बोभाटा होऊन जाईल याची भीती आहे ना? म्हणून सोनिया गांधी आता बोलत आहेत. पण, सुरुवात त्यांनी केली नाही. इथल्या मुस्लीम वा धार्मिक संघटना किंवा विद्यापीठातही झालेली नाही. त्याची चिथावणी व प्रेरणा अमेरिकेतील प्रसिद्ध उदारमतवादी भडभुंज्यांकडून आलेली आहे. ज्यांच्या इशाऱ्यावर इथल्या अनेक सेवाभावी संस्था चालत असतात. तिथून मिळणारे पैसे घेऊन त्यांच्या इशाऱ्यावर पर्यावरणापासून कुठल्याही लहानसहान बाबतीत धुमाकूळ घालणे, इतकेच आता या सेवाभावी लोकांचे काम झालेले आहे. मोदींच्या कारकिर्दीत अशा लोकांना अमेरिकेतून मिळणारी रसद तोडली गेली, हे विसरता कामा नये.

 

ब्रुकिंग्स, हॉवर्ड वा तत्सम विद्यापीठे आणि संस्थांनी जगाची रचना कशी असावी आणि त्यात कशाला सत्य म्हणावे किंवा पुण्य ठरवावे, याचे अधिकार आपल्या हाती घेतलेले आहेत. ते राबवण्यासाठी त्यांनी 'सेवाभावी संस्था' नावाची एक मायावी राक्षसी यंत्रणा जगभर विस्तारलेली आहे. त्यांना लागणारा खर्च व पैसे पुरवणारी फाऊंडेशन्स इत्यादी उभी केलेली आहेत. त्यांच्याशी संलग्न असलेल्या लोकांकरवी ते आपले अघोषित निर्णय जगावर लादत असतात. यापैकी कोणी कधी इराक, सीरियातून युरोपात पळवून लावलेल्या मुस्लिमांविषयी आस्था दाखवलेली नाही किंवा त्यांना सामावून घेण्यासाठी अमेरिकेवर दबाव आणला नाही. त्यांच्या असल्या तत्वांना सौदी अरेबिया वा मुस्लीम देशात होणाऱ्या धार्मिक छळवणुकीने बाधा येत नसते. पण, श्रीलंका, भारत वा म्यानमार अशा देशातील कुठल्याही बाबतीत नाक खुपसायला ते तत्पर दिसतील. याचे खरे कारण जिथे सेवाभावी संस्थांचा विस्तार नाही, तिथे त्यांचे प्रशासन नाही, इतकेच आहे. भारतात अशा सेवाभावी संस्थांना मोकळीक असल्यानेच 'व्यापक कटा'ची कार्यवाही लोकशाहीचा मुखवटा पांघरून होऊ शकते. पुतीन, ट्रम्प त्यांना दाद देत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. पण, भारतात मोदी सरकार आल्यापासून त्यांची मोठी फौज निकामी झालेली आहे. त्यातून मग इथले जिहादी, नक्षली व चर्चसहीत सेवाभावी यांनी 'चळवळी' म्हणून नाचणाऱ्या डाव्या उदारमतवादी टोळीला हाताशी धरले आहे. अशी या ताज्या हिंसाचाराची खरी पार्श्वभूमी आहे. तो हिंसाचार काही काळ चालणार आहे. त्यातून भारतात अधिकाधिक धार्मिक धु्रवीकरणच होणार आहे. सध्या माजलेल्या हिंसाचारी घटनांच्या पुढला घटनाक्रम गोध्रानंतरचा असेल. त्या घटनेनंतर जे काहूर माजले, त्यातून भारताचा राजकीय चेहराच बदलून गेला, हे विसरून चालणार नाही. गुजरात दंगलीचे अवडंबर माजवणाऱ्यांनी हिंदुत्वाचा खोळंबलेला प्रवाह मोकळा करायला हातभार लावला होता. आता त्याची व्याप्ती किती व कुठवर असेल?

@@AUTHORINFO_V1@@