नवी दिल्ली : 'रेप इन इंडिया' हे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना भोवणार अशी चिन्हे सध्या दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याविरोधात भाजपच्या महिला खासदारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून राहुल गांधी यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्यामुळे आज दोन्ही सभागृहाचे कामकाज ठप्प करण्यात आले. भाजपच्या केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महिला खासदारांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे जाऊन ही तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर स्मृती इराणी यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. राहुल गांधी यांच्या या विधानाची गंभीर दखल घेऊन त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली असून आयोगानेही कायदेशीर प्रक्रियेनुसारच न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे निवडणूक आयोगाने आश्वासन दिल्याचेही स्मृती इराणी यांनी सांगितले.