नवी दिल्ली : केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी १ डिसेंबरपासून 'फास्टॅग' अनिवार्य केले होते. मात्र, आता ही मुदत १५ दिवसांनी वाढवली आहे. आता १५ डिसेंबर २०१९ पर्यंत फास्टॅग न लावलेली वाहने टोलनाक्यावरून ये-जा करू शकतात.
काय आहे 'फास्टॅग' ?
'फास्टॅग' ही टोल भरण्याची प्रीपेड सुविधा असलेला पास आहे. यामध्ये वाहनावर लावण्यात आलेल्या स्टीकरमुळे स्वयंचलितपणे टोलचे पैसे घेतले जातात. या सुविधेमुळे वाहनांना टोल भरण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज लागत नाही. वाहनांना फास्टॅग खरेदी करण्यासाठी नागरिकांना वेळ मिळावा, यासाठी फास्टॅगला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने माय फास्टॅग अॅप लाँच केले आहे. वाहनांना १५ डिसेंबरपर्यंत फास्टॅगची मोफत सुविधा देण्यात येणार आहे. जर फास्टॅगचा पास नसतानाही फास्टॅगच्या रांगेतून वाहन नेण्यात आले तर चालकाकडून १५ डिसेंबरनंतर दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे.
फास्टॅग यंत्रणेचे हे आहेत फायदे?
फास्टॅग यंत्रणेमुळे वाहतूकदार, टोल प्लाझा चालक, सरकारला फायदा होईल. फास्टॅग यंत्रणेच्या वापरकर्त्या वाहतूकदाराला प्रत्येक व्यवहारावर २.५% सूट मिळणार आहे. या प्लाझावर विनाथांबा वाहतूक असल्याने वाहतूकदारांच्या वेळेची बचत होईल. ई-पेमेंटमुळे रोख रक्कम बाळगण्याची गरज भासणार नाही. या व्यवहाराची पावती थेट मेलवरच मिळणार असल्याने तसा लेखाजोखा ठेवता येणार आहे.