‘नवा काळ’ आणणारा संपादक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2019
Total Views |




पत्रकारितेत भवितव्य घडविण्याची स्वप्ने पाहणार्‍यांनी आणि मजकुराच्या नावाखाली भरपूर रद्दी मिळविणार्‍या वाचकांनी पुन्हा एकदा ताडून पाहावे, असे निळूभाऊंचे व्यक्तिमत्त्व होते. दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली...!

निळूभाऊ गेले. वयोपरत्वे हे कधीतरी होणार होतेच, पण निळूभाऊंच्या पुढच्या दोन पिढ्या स्मरणात राहतील त्या त्यांच्या कर्तृत्वामुळे. नीळकंठ खाडीलकर ‘नवाकाळ’चे संपादक’ ही त्यांची खरी ओळख आणि ‘अग्रलेखांचा बादशाह’ ही निळूभाऊंना येऊन बिलगलेली बिरुदावली. ही बिरुदावली निळूभाऊंना सहज येऊन मिळालेली नाही. सर्वसामान्यांना समजेल असे सातत्याचे लिखाण, आक्रमक भाषा, त्याला गोळीबंद तर्काची जोड ही निळूभाऊंच्या लिखाणाची खासियत होती. मराठी पत्रकारितेला एक अधिष्ठान आहे. हे अधिष्ठान स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात साहजिकच माध्यमांचा उद्देश अत्यंत सरळ होता आणि तो म्हणजे, देशाला स्वातंत्र्य मिळविणे. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र मराठी पत्रकारितेला वेगळे वळण मिळाले.

नेहरूंच्या समाजवादी धोरणांचे चांगले आणि वाईट अनुभव भारतीयांना मिळायला सुरुवात झाली होती
. वाढणारे शहरीकरण एक नवा वर्ग निर्माण करीत होते आणि त्यातून एक भावविश्व आकाराला येत होते. मध्यम व उच्च मध्यम वर्ग आकाराला येत होता, तसा कनिष्ठ मध्यमवर्गही आकाराला येत होता. या दोन्ही वर्गांची सामाजिक, राजकीय भूक भागवणारी दैनिकेही आकाराला येत होती. जिथे ‘मटा’, ‘लोकसत्ता’सारखी अभिजनांची दैनिके आकाराला येत होती, तिथेच त्याच मातीत ‘नवाकाळ’सारखे बहुजनांचे दैनिक आकाराला आले. दैनिकांच्या माध्यमातून संपादकांनी समाजाला दिशा देण्याचा हा काळ. अत्रे-ठाकरे या गाजलेल्या वादांच्या पार्श्वभूमीचा हा काळ! खरेतर यावेळी काळाच्या पोटात अनेक घडामोडी घडत होत्या. तथाकथित मुख्य प्रवाहात त्याचे प्रतिबिंब मात्र पडत नव्हते. समाजात निरनिराळ्या सामाजिक श्रेणी तयार होत होत्या आणि त्याच्या आधारावर त्यांचे भावविश्वही आकाराला येत होते. लहान-मोठी दैनिके, पाक्षिके निघत होतीच. पण, यातून वाचकाला केंद्रस्थानी ठेवून सजग मजकूर निर्माण करणारे मात्र काही घडत नव्हते. निळूभाऊंनी ‘नवाकाळ’ याच काळात आला आणि नाणावला.

गिरणी कामगारांसमोर येऊन ठेपलेले बेरोजगारीचे संकट हा मोठा विचित्र काळ होता. तिथून निळूभाऊंच्या पत्रकारितेला सुरुवात झाली. ‘नवाकाळ’ रंगात आला तो मात्र या नंतरच्याच कालखंडात! गिरणी कामगारांची पहिली पिढी उद्ध्वस्त झाली होती. दलित-सवर्ण दंगली, शिवसेनेचा संघर्षमय काळ, कनिष्ठ-मध्यमवर्गाची मुंबईविषयीची असुरक्षिततेची भावना अशा या कोलाहलात निळूभाऊंचे विचार मराठी माणसाला आधार वाटायला लागले. निळूभाऊ लिहायचेही तसे. दहावी उत्तीर्ण झालेला माणूस हा त्यांचा वाचक होता. त्याला कळेल, पटेल, भावेल आणि त्याच्या भावविश्वाचा भाग होऊ शकेल, असे लिखाण त्यांनी केले. त्यामुळे बलाढ्य वर्तमानपत्राच्या भाऊगर्दीत ‘नवाकाळ’ने स्वत:चा विशिष्ट असा वाचकवर्ग तयार केला. त्यांनी लेख लिहिले, अग्रलेख लिहिले, मुलाखती घेतल्या आणि त्यातून पुढे जे काही आकाराला आले, त्याचा आपले संपादकत्व अधोरेखित करून घेण्यासाठी पुरेपूर वापरही करून घेतला.

रंगीत पुरवण्या, रंगीत पूर्ण पाने असा ‘मसालेदार’ दैनिके देण्याचा हा काळ! पण, प्रचंड खपाचे हे दैनिक कितीतरी वर्ष कृष्णधवल आणि साध्या कागदावर छपाई होत असलेलेच होते. याचे कारण सरळ होते, आपले दैनिक लोक मजकुरासाठी घेतात, यावर निळूभाऊंचा ठाम विश्वास होता. आपल्या पत्रकारितेवर, लिखाणावर प्रेम असणे निराळे आणि त्याच्या आधारावर आपण समाजमनावर अधिराज्य गाजवू शकतो, असा आत्मविश्वास असणे निराळे. निळूभाऊंकडे हा आत्मविश्वास ठासून भरलेला होता. ‘आम्हाला वाटते’ असे वाक्य अग्रलेखात वापरण्याचे धाडस त्यांना याच आत्मविश्वासातून आले होते. या काळात अनेक संपादक होते. कोणी नव्हते असे नाही. पण, केवळ आपल्या मजकुराच्या जीवावर आपले माध्यम मोठे करण्याचा आत्मविश्वास बहुदा त्यावेळीही फक्त निळूभाऊंमध्येच होता.

समाजात काय घडते आहे
, याचा विचार आणि त्याचे प्रतिबिंब टिपण्यातला वाकबगारपणा ही निळूभाऊंची खासियत रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी लक्षात आली. सगळीच्या सगळी माध्यमे नव्वदीच्या दशकात रामजन्मभूमीच्या विरोधात उभी ठाकलेली असताना ‘नवाकाळ’ या आंदोलनाचा समर्थक झाला; नव्हे तर या आंदोलनाच्या मुखपत्राचीच भूमिका ‘नवाकाळ’ने स्वीकारली. जमिनीवरचे आंदोलन समजून घेण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नव्हते. त्यावेळचे तथाकथित विद्वान संपादक आपल्या तथाकथित सेक्युलर चष्म्यातून या सगळ्याकडे एक धार्मिक दंगा अशा स्वरूपात पाहत होते. हे आंदोलन कोणत्या प्रकारच्या सामाजिक राजकीय परिवर्तनाची नांदी आहे, याची कल्पनाही या मंडळींना येत नव्हती. निळूभाऊंनी समाजाची ही नस बरोबर ओळखली आणि तशा भूमिका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात माध्यम म्हणून ‘नवाकाळ’ मराठीतले सगळ्यात ‘रससशीत दैनिक’ म्हणून ओळखले जात होते.

‘पँथर’च्या काळात आंबेडकरी विचारांसाठी संघर्ष करायला तयार होणारे अनेक चेहरे समोर आले. प्रकाश आंबडेकरांना ‘नेतृत्व’ म्हणून उभे करण्याचे सारे श्रेय निळूभाऊंचे. प्रकाश आंबेडकरांचे आजचे राजकारण जे काही असेल, मात्र त्यांचा उदय ‘नवाकाळ’ म्हणून झाला.

आजच्या पत्रकारितेसमोर अनेक आव्हाने आहेत. आर्थिक संकटे आहेत, तशीच संपादकांनी त्यांचा लौकिक टिकवण्याचीही आव्हाने आहेत. अग्रलेख मागे घेणार्‍या संपादकाला निर्भत्सनेचा धनी होण्याची भीती असते. परंतु, तसे असताना आज मराठीत हे सहज होताना दिसते. निळूभाऊ या सगळ्याच्या पलीकडे गेले. कारण, त्यांना या मातीतले प्रश्न समजत होते. भाषिक अस्मितांपेक्षा ‘स्थानिक अस्मिता’ हा त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य गाभा होता आणि त्यांनी तो उत्तम जोपासला. वाचकाला गरज वाटेल तेव्हा अंक प्रकाशित करण्याची लकब ही खास निळूभाऊंची. रात्री गिरगावमधील ‘नवाकाळ’च्या मुद्रणालयाबाहेर ‘नवाकाळ’ विकायची संधी मिळण्याची वाट पाहणारे वृत्तपत्रविक्रेते आणि झणझणीत वाचायला मिळेल म्हणून वाट पाहत असलेले वाचक एकाच ठिकाणी पाहायला मिळालेले लोक आजही आहेत. पत्रकारितेत भवितव्य घडविण्याची स्वप्ने पाहणार्‍यांनी आणि मजकुराच्या नावाखाली भरपूर रद्दी मिळविणार्‍या वाचकांनी पुन्हा एकदा ताडून पाहावे, असे निळूभाऊंचे व्यक्तिमत्त्व होते. दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली...!

@@AUTHORINFO_V1@@